फुले-आंबेडकरांचा जातीअंत विचार महत्त्वाचा
समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चा सत्रातील मत
इचलकरंजी ता. १५ महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या विचारांची झेप फार मोठी होती. समाज परिवर्तन का आणि कशासाठी करायचे याबाबतच्या त्यांच्या भूमिका पक्क्या होत्या. आज समाजामध्ये जात जाणिवा पातळ होण्याऐवजी बळकट होताना दिसत आहेत. जाती व धर्माच्या प्रश्नांना जगण्याच्या प्रश्नांपेक्षा महत्वाचे ठरवत त्यावर आधारित राजकारण केले जात आहे.राजकारणापासून नाटक , चित्रपट आदी कलेपर्यंतची सर्व क्षेत्रे आज जात्यंध व धर्मांध विकृतीनी प्रदूषित केली आहेत.हे विकासाचे खचितच लक्षण नाही. जातिव्यवस्थेची दाहकता प्रचंड असल्याने ती नष्ट केली पाहिजे असे फुले म्हणत तर
जातिसंस्था नष्ट करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहाकडे डॉ.आंबेडकर पाहताना दिसतात.म्हणूनच या दोन महामानवांनी जातीअंता बाबत जी भूमिका मांडली ती ध्यानात घेणे आणि तिचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे.या महामानवांचा जन्मदिन साजरा करत असताना तीच त्यांना खरी आदरांजली ठरू शकेल असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. ‘फुले आंबेडकरांचा जातीअंत विचार ‘ हा चर्चासत्राचा विषय होता. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमाना प्रा. रमेश लवटे व अशोक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे, अशोक केसरकर, दयानंद लिपारे,देवदत्त कुंभार, सचिन पाटोळे, शकील मुल्ला , अशोक माने, नारायण लोटके,शहाजी धस्ते , मनोहर जोशी आदींनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रातून असे मत पुढे आले की, आज समाजात जातीअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षत्यापेक्षा धर्मांधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायीभाव , लोकशाही पेक्षा ठोकशाहीचे,हुकूमशाहीचे समर्थन,मिश्रअर्थ व्यवस्थेपेक्षा खाजगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले आहे. तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला , राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरू असताना समाजाची वाटचाल जातीअंताऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसत आहे.आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी काही पक्ष, संघटना जात जाणीवा बळकट करण्याची नियोजनबद्ध कारस्थाने रचत आहेत.त्यासाठी समाजाला वेठीला धरले जात आहे.हे सारे सामाजिक दृष्ट्या अतिशय हानिकारक आहे. असा वर्तन व्यवहार फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या पूर्णतः विरोधी आहे. म्हणूनच महात्मा फुले अणि आंबेडकर यांनी जातसंस्था, धर्मसंस्था, समाज म्हणजे काय, यांचे जे विश्लेषण केले आणि साधार मांडणी केली ती लक्षात घेण्याची गरज आहे.