भाषिक लादलेपण नाकारलेच पाहिजे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय मुलांच्या क्षमतेच्या दृष्टीने अतिशय अव्यवहार्यच आहे. तसेच हिंदी भाषेची सक्ती नाही असे म्हणत मागील दाराने ती लादण्याचा प्रयत्न करणे ही विद्यार्थ्यांची गळचेपीही आहे. आपल्या संकुचित राजकीय भूमिका पुढे रेटण्यासाठी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न अतिशय चूकच. शिवाय अशी सक्ती इतर राज्यात दिसत नाही. प्रत्येक भाषा तिची संस्कृती घेऊन विकसित होत असते.एकीकडे गेल्या काही वर्षात मातृभाषा मराठी या विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे खच्चीकरण करणारा हा निर्णय मराठी समाजासाठी घातक आहे. म्हणूनच या निर्णयाला अनेक मान्यवर शिक्षणतज्ञ, अभ्यासक, विचारवंत, कलावंत विरोध करत होते. राज्य सरकारचे राजकीय विरोधक ही या भूमिकेवर एकत्र येत होते. हे सारे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६ एप्रिल व १७ जून २०२५ रोजी स्वतःच काढलेले शासन निर्णय रद्द केले. आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून याचा अभ्यास केला जाईल व त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संकुचित भूमिका व्यापक समाज मनावर लादण्याचा प्रयत्न केला की अशी माघार अपरिहार्य ठरत असते. दक्षिणेकडील राज्ये अशा सक्तीला भीक घालत नाहीत. पण महाराष्ट्राच्या गळी ती बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे अधोरेखित झाले.
एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला याचे श्रेय घ्यायचे आणि दुसरीकडे मराठी भाषा व संस्कृतीवर आक्रमण करायचे हे अत्यंत चुकीचे आहे. लहान मुलाला त्याची मातृभाषा म्हणजे परिसर भाषा सर्वात प्रथम योग्य पद्धतीने शिकवली पाहिजे. कारण ती भाषा त्याचे पुढील संपूर्ण व्यक्तिमत्व संपन्न करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. विविध क्षेत्रात मान्यवर असलेल्या बहुतांश व्यक्तींचे शिक्षण हे मातृ भाषेतच झालेले असते.त्यांचा मातृभाषेचा पाया बळकट असतो. पण एकाच वेळी तीन भाषा बालवयातच त्याच्यावर लादल्या गेल्या तर त्याच्या विचार विश्वावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. लहान मुलांसाठी इंग्रजीच्या सक्तीचे परिणाम दोन्ही भाषा अर्ध्या कच्च्या होण्यात झाला आहे हे दिसून आलेले आहे.अनेक सर्वेक्षणातून सातवी आठवीच्या इयत्तेतील अनेक विद्यार्थ्याना मराठी योग्य पद्धतीने लिहिता, वाचता येत नाही हे स्पष्ट झालेले आहे. पदवीधरांनी नोकरीसाठी केलेल्या मराठी भाषेतील अर्जाची असंख्य चुका असतात हेही दिसून आले आहे.असे असताना ही तिसऱ्या भाषेची आणि त्यात हिंदीची सक्ती अतिशय अव्यवहार्यच होती व आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे बहुमत मिळाल्यानंतर हिंदीची सक्ती लादण्याचा विचार केंद्र सरकारच्या इच्छेने राज्य सरकारमध्ये सुरू झाला. महाराष्ट्राला राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या उत्तरेशी जोडण्याचा व पर्यायाने गायपट्ट्यात ओढण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळेच इयत्ता पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार असा शासन निर्णय १६ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आला. त्याला विरोध होताच तो मागे घेण्यात आला. त्यानंतर नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच १७ जूनच्या रात्री पुन्हा एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य आहे.त्यामध्ये हिंदी हा एक पर्याय असेल .मात्र ती नको असेल तर वर्गातील किमान वीस विद्यार्थ्यांनी दुसरी भाषा निवडायला हवी नाहीतर त्यांना हिंदी शिकावी लागेल. हा निर्णय तर हिंदीची पूर्णतः सक्ती करणाराच होता. त्यामुळे त्याला वाढता विरोध होऊ लागला. हा विरोध राजकीय दृष्ट्या जड जाईल म्हणून हे निर्णय आता रद्द केले आहेत. मात्र त्याच्या विचारासाठी आयोगाची नेमणूक करून सरकारने हा विचार आम्ही अद्याप सोडलेला नाही हेही अधोरेखित केले आहे. त्यामुळे हा लढा यापुढेही द्यावा लागणार असे दिसत आहे.
हा निर्णय लादण्याचा प्रयत्न का झाला व होतो आहे याचे मूळ लक्षात घेतले पाहिजे.गोळवलकर गुरुजी उर्फ माधव सदाशिव गोळवलकर यांचे ” विचारधन” हे पुस्तक भाजपा आणि तिची मातृसंस्था रास्वसंघ यांचे प्रमुख मार्गदर्शक आहे. या पावणे पाचशे पानी पुस्तकात ४९ प्रकरणे आहेत. त्यातील अकरावे प्रकरण ” पुत्ररूप हिंदू समाज ” या नावाचे आहे. यातील भाषाविषयक विषय लक्षात घेतले की हिंदी भाषेचा धोरणात्मक आग्रह का धरला जातो ? आणि आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही वर्षांनी इंग्रजी बोलण्याची लाज वाटेल असे का म्हणतात हे कळून येते.
या अकराव्या प्रकरणात गोळवलवर गुरुजी नेमके काय म्हणतात हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजी की हिंदी आणि तथाकथित हिंदी साम्राज्यवाद या दोन मुद्यांत ते म्हणतात,”काही जणांना असे वाटते की इंग्रजी हीच नेहमीसाठी जोड भाषा म्हणून रहावी.भाषा ही माणसा माणसातील परस्पर व्यवहाराचे जिवंत माध्यम असल्यामुळे इंग्रजी भाषा स्वतःबरोबरच इंग्रजी संस्कृती व इंग्रजी जीवनपद्धती आणणारच. परक्या जीवनपद्धती येथे रुजू देणे म्हणजे आपल्या संस्कृतीला व धर्माला सुरुंग लावण्यासारखे आहे. शेकडो वर्षाच्या परकीय राजवटी आपले हे महान राष्ट्र नष्ट करू शकल्या नाहीत याचे कारण आपल्या भाषांच्या माध्यमातून आपण आपला संस्कृतीक वारसा जतन करून ठेवला हे आहे.इंग्रजीचा स्वीकार करणे म्हणजे आपल्या सामर्थ्याच्या मूलस्त्रोतांचा शोषण करण्यासारखे आहे. इंग्रजांनी आपल्या सत्तेबरोबर स्वतःची भाषा ही आपल्यावर जबरदस्तीने लागली. आता आपण स्वतंत्र झालो असल्याने इंग्रजांप्रमाणेच इंग्रजीचेही प्रभुत्व झुगारून दिले पाहिजे. परक्यांच्या राजवटीत तिचे जे मनाचे स्थान प्राप्त होते ते आजही तसेच चालू ठेवणे हे मानसिक गुलामीचे लक्षण आहे. जगाच्या दृष्टीने आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेवरचा तो कलंक आहे.
आपल्या देशातून इंग्रजीचे उच्चाटन होणार याविषयी यत्किंचितही संदेह नाही.याची प्रमुख कारणे दोन आहेत. पहिले कारण असे की ब्रिटिशांच्या कारकिर्दीत राज्यकर्त्यांची भाषा शिकण्याकडे व त्या भाषेत प्राविण्य संपादन करून त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत सामना देण्याकडे लोकांचा स्वाभाविक कल होता. परंतु आता ब्रिटिश येथून निघून गेले असल्याने लोकांचा पूर्वीचा तो उत्साहही ओसरला आहे.दुसरे कारण म्हणजे ब्रिटिशांच्या काळात इंग्रजी येत नसणाऱ्यांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणे जवळजवळ अशक्यच असे. इंग्रजी भाषा अवगत नसेल तर अत्यंत बुद्धिमान माणसे देखील केवळ आर्थिक दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक जीवनातूनही दूर फेकली जात. आता ही भीतीही हळूहळू नाहीशी होत आहे. इंग्रजी भाषा ब्रिटिश शासनाचेच एक अंग होती. आता तो मूळ आधारच कोसळल्याने तिला कृत्रिम उपायांनी टिकवून धरण्यासाठी कोणी कितीही धडपड केली तरी ती भाषा फार काळ टिकू शकणार नाही.
इंग्रजी नाही तर मग जोड भाषेचा कसा प्रश्न सोडवायचा ? संस्कृत भाषेला ते स्थान प्राप्त होईपर्यंत त्यातल्या त्यात सोयीची म्हणून हिंदीलाच अग्रस्थान द्यावे लागेल. साहजिक आपण हिंदीचे जे स्वरूप निवडायचे ते इतर सर्व भारतीय भाषांप्रमाणे संस्कृतोत्पन्न असले पाहिजे.आणि त्याचबरोबर तांत्रिक व वैज्ञानिक विषयांसारख्या आधुनिक ज्ञानाच्या सर्व शाखांच्या विकासासाठी आवश्यक असलेले शब्दभांडार संस्कृत भाषेच्या आधारे निर्माण करण्याची क्षमताही त्यामध्ये असली पाहिजे. याचा अर्थ असा मात्र नव्हे की हिंदी हीच एकमेव राष्ट्रभाषा आहे किंवा आमच्या सर्व भाषांमध्ये तीच प्राचीन संपन्न आहे.खरे म्हणजे तमिळ भाषा अधिक प्राचीन व समृद्ध आहे .पण आपल्यापैकी फार मोठ्या जनसमुदायाची बोलीभाषा हिंदी आहे. आणि सर्व भाषांच्या मनात शिकावयास व बोलावयास ती सोपी ही आहे. कुंभमेळा व दुसऱ्या एखाद्या मेळ्याच्या वेळी आपण काशी किंवा प्रयोगला गेलो तर तेथे उत्तर, दक्षिण, पूर्व ,पश्चिम या चारही दिशातून असंख्य लोक पवित्र गंगेच्या स्नानासाठी आलेले पाहायला मिळतात. तो विशाल जनसमूह हिंदी भाषेतच बहुतेक सर्व व्यवहार करीत असतो मोडकी तोडकी असेल पण हिंदीच.
म्हणून हिंदी साम्राज्यवाद किंवा उत्तरेचा वरचष्मा आदी घोषणांच्या कोलाहालात वाहवत न जाता आपण राष्ट्रीय एकता व स्वाभिमान यांच्या जपणुकीसाठी हिंदीचा स्वीकार केला पाहिजे. ब्रिटिशांचे शासन येथे होते तरीही बंगाली ,मराठी व गुजराती भाषांनी फार मोठी प्रगती केली आहे. या भाषेमध्ये असे लोकोत्तर साहित्य निर्माण झाले आहे की साऱ्या जगातील श्रेष्ठतेम साहित्यिकांनी त्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.ज्या भाषांनी आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा गेली अनेक शतके समर्थपणे आविष्कार केला त्या आपल्या विविध सुंदर भाषा केवळ कोणती तरी एकच भाषा शिल्लक रहावी यासाठी नष्ट करून टाकाव्या ही नुसती कल्पना सुद्धा सहन होणारी नाही.इतर भाषांवर हिंदीची कुरघोडी किंवा आक्रमण चालू आहे ही आरोळी म्हणजे तर मतलबी राजकारणांनी रचलेली कपोल कल्पित कथा आहे.
वस्तूतः हिंदीच्या उत्कर्षामुळे आपल्या इतर भाषा भगिनींचाही उत्कर्ष होणार आहे.भारतीय भाषांचा एकमेव शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे इंग्रजी भाषा. तामिळनाडूमधील एका प्रमुख शहरातील एका वकिलांनी म्हटले आहे की हिंदी मुळे तामिळ भाषा नष्ट होईल .परंतु जिल्ह्याच्या व खालच्या न्यायालयात तमिळ भाषेचा उपयोग करण्याची परवानगी असतानाही तुम्ही इंग्रजीचाच वापर का करता ? असे मी त्यांना विचारले तेव्हा त्यांच्यापाशी उत्तर नव्हते. वस्तूस्थिती अशी आहे की हिंदी भाषा तमिळ भाषेचा शत्रू नसून इंग्लिश भाषाच हिंदी व तमिळ या दोन्ही भाषांची शत्रू आहे .केवळ एकट्या तमिळचीच ही स्थिती आहे असे नव्हे तर इतर सर्व भाषांबाब ही तेच सत्य आहे.
अशाप्रकारे स्वराज्य आल्यानंतर भाषा हा फुटीरतेचा आणखी एक मुद्दा झाला आहे. भाषिक राज्याच्या निर्मितीमुळे ,लोकांच्या मनात भाषिक वेड भरवण्यासाठी राजकरण्याच्या हाती आणखी एक कोलीत मिळाले. आश्चर्य म्हणजे मोठ मोठी माणसे देखील इतर भाषांवर चिखल फेक करताना आढळतात.दक्षिणेकडील एक फार मोठे गृहस्थ एकदा जाहीर सभेत म्हणाले हिंदी भाषेत केवळ दोनच साहित्य ग्रंथ आहेत. एक तुलसी रामायण आणि दुसरा रेल्वेचे वेळापत्रक. याच प्रकारचे आणखी एक उदाहरण एका प्रसिद्ध मराठी नाटककाराने एका पात्राच्या तोंडी असे शब्द घातले की, दक्षिणी भाषा ना ? एका मडक्यात थोडे खडे घाला आणि ते मडके जोरात हलवा म्हणजे त्या भाषा ऐकू येतील .हा निव्वळ विनोद होता यात संशय नाही.परंतु असा फूट पडणारा विनोद आणि अज्ञान मूलक उपाय यामुळे परिस्थिती अधिकच वाईट होईल.”
विचारधन मधील वरील सहा परिच्छेद वाचले की लक्षात येते ते म्हणजे, गुरुजी अशी ओळख असणाऱ्यांच्या आकलनालाही मर्यादा असतात. ते संकुचित असू शकते. कारण या भूमिकेत इंग्रजी शिकणे आता गरजेचे नाही. तिचे महत्त्व संपलेले आहे. इंग्रजी भाषा यापुढे टिकू शकत नाही. संस्कृत हीच सर्वात महत्त्वाची भाषा. पण तिला आज व्यवहार भाषेचे स्थान नाही. म्हणून आपण हिंदीला जवळ करू. तिचा वापर करू. ही हिंदी संस्कृतोत्पन्न असेल याकडे लक्ष देऊ. हिंदी इतर भाषांवर कुरघोडी करत आहे असे जे कोणी म्हणतात ते मतलबी राजकारणी आहेत. भाषावार प्रांतरचनेने भाषिक तेढ वाढवली. एकूण काय तर संस्कृतच हवी आहे पण आज तिच्यात ते सामर्थ्य नाही म्हणून हिंदीचा आग्रह धरू या. हेच स्पष्टपणे म्हटले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. आणि त्यातूनच मतलबी राजकारण नेमके कुठे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
आज गेल्या काही वर्षात आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत नापास होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर अंतर्मनात संस्कृत ठेवून हिंदी सक्तीचे प्रयत्न करणाऱ्यांनी मराठी भाषेसमोरच धोका उत्पन्न केलेला आहे. विरोध कोणत्याही भाषेला नसून तिच्या आडून केल्या जाणाऱ्या विकृत व संकुचित राजकीय सत्ताकांक्षी राजकारणाला आहे. ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी मराठीतूनच का संवाद साधला हे लक्षात घेतले पाहिजे.संत स्वतः सर्वसामान्य लोकातून आलेले होते. म्हणून सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी हेच त्यांचे खरे रूप होते. आपली लोकप्रतिनिधीची व समाज शिक्षकाची भूमिका जोपासण्यासाठी अतिशय बारीक-सारीक गोष्टींचाही संतांनी सखोलपणे विचार केलेला होता. मुळातून बदलाची जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा असा लहान लहान गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरत असते .संतांनी आपला प्राकृतिक दृष्टिकोन हिरीरीने मांडण्यासाठी लोकभाषा आणि लोक माध्यमांचाच वापर केला ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
संतांनी संस्कृत भाषेचा तिरस्कार केला नाही. पण बहुजन समाजाशी संवाद साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या भाषेचा म्हणजे लोकभाषेचाच वापर केला. आपल्या वाङ्मयात त्यांनी ओवी, अभंग यासारखे लोकछंद स्वीकारले. तसेच लोकगीते ,गवळणी ,भारुडे यांचाही वापर केला. उपमा अलंकारासह वाङ्मयाची रचना करून त्यांनी आपण व समाज यांच्यात वैचारिक आपलेपणा निर्माण केला. संस्कृत अभिमानी गरुड पुराणात असे म्हटले आहे की,
प्राकृत म्लेंच्छ भाषितम! न श्रोतव्यं द्विजेन एतद !!
याला सोडेतोड उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठीचा गजर चालविला. ते म्हणतात,
माझा मराठाची बोल कौतुके ! परी अमृतातेही पैजा जिंके !!
ऐसी अक्षरे रसिके ! मेळविन!!
मूळ गीता संस्कृतात असली म्हणून काय झाले त्यावर ज्ञानेश्वर म्हणतात,
मूळ ग्रंथाचीया संस्कृता ! वरी मऱ्हाटी नीट पाहता !
अभिप्राय मानलिया चित्ता ! कवण भूमी हे न चोजवे !!
मराठी समजायला सोपी आहे .ती सौंदर्य संपन्न भाषा आहे. भाषा समजावी म्हणून हळुवारपणे चित्त देऊन ऐका .
असे सांगून ज्ञानेश्वर म्हणतात ,
ऐसे हळुवारपणे जरी येईल ! तरीच ते उपेगा जाईल !
एरवी आघवी गोठी होईल ! मुक्या बहिरयाची !!
………जैसे शारदीचीये चंद्रकळे ! माजी अमृत कणकोवळे !
ते वेचिती मने मवाळे ! चकोर तलगे !
तियापरि श्रोता ! अनुभवावी हे कथा !
अति हळुवारपणे चित्ता ! आणूनिया !!
संत एकनाथांनी तर म्हटले आहे की
“संस्कृत वाणी देवे केली ! प्राकृत काय चोरापासून जाली ? “
आपला पुरोगामी विचार मांडताना संतांनी मराठीचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि आपल्या लेखनाने मराठी भाषा समृद्धी केली.
समाजामध्ये विषमतेच्या दोषाबरोबरच उच्चनीच भेद कायम होता. या भेदनीतीमुळे सबंध समाज आतून सडल्यासारखा झाला होता. ब्राह्मण वर्ग स्वतःला परब्रम्ह मानून ज्ञानाच्या पोकळ प्रतिष्ठेने गर्विष्ठ झाला होता. अज्ञान्यांचा आणि शूद्रांचा बुद्धिभेद करण्यातच त्यांना आपल्या बुद्धीचे कौतुक वाटत होते .त्यामुळे ज्यांना डोळस म्हणावे तेच आंधळ्या सारखे वागत होते. ब्राह्मण वर्गाला पढीक पंडित असे रूप आलेले होते. याविषयी ज्ञानेश्वर म्हणतात ,
मोराच्या अंगी असोसे ! पिसे अहाती डोळसे !
परि एकली दिठी नसे ! तैसे ते गा!!
मोराच्या पिसांना डोळे असतात पण त्यांना दृष्टी नसते. तसेच या पढीक पंडिता नाही ज्ञानाचे डोळे आहेत .पण त्याचा योग्य वापर ते करत नसल्याने. ते असूनही नसल्यासारखेच आहेत.
संतांची दृष्टी मात्र अतिशय स्वच्छ होती.त्यानी डोळसपणे आपल्या लेखणी व वाणीचा उपयोग समाज हितासाठी केला.शब्दांचे सामर्थ्य संतांनी ओळखले होते. ज्ञानेश्वर म्हणतात, सूर्यबिंब केवळ बचके एवढे असून सुद्धा त्याचा प्रकाश साऱ्या त्रैलोक्याला व्यापून राहतो. जाणकारांना इच्छिलेले सर्व काही देण्याची शक्ती शब्दांमध्ये असते.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने !शब्दांचीच शस्त्रे यत्न करु!
शब्दची आमच्या जीवाचे जीवन ! शब्दे वाटू धन जनलोका !
तुका म्हणे पहा शब्दची हा देव ! शब्दाची गौरव पूजा करू !!
शब्द हेच आपले धन शस्त्र व देवही आहे .आपल्या जीवनाचे सार सर्वस्व तेच आहे . अशी शब्दांच्या माध्यमावर आढळ श्रद्धा तुकारामांनी व्यक्त केली होती. शब्दांचे हे माध्यम सर्वसामान्यांना कळणाऱ्या देवनागरीतली होते हे महत्त्वाचे.संतांची अभिजात मराठी भाषेतील भागीदारी मोठी होती.
सध्या हिंदीची सक्ती करणाऱ्याची, त्याचे समर्थन करणाऱ्यांची सारी मांडणी एक देश, एक निवडणूक ,एक भाषा, एक संस्कृती ,एक धर्म अशी सर्व एकचालूकानूवर्तित्वाची तळी उचलणारी आहे. भाषा आणि संस्कृती यातील विविधतेचे मर्म जाणीवपूर्वक दुर्लक्षित करणारी आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये लिपीचा शोध आठ हजार वर्षांपूर्वी झाला असला तरी त्याच्या आधी शेकडो वर्षे भाषा तयार झाली आहे. जगात शेकडो भाषा बोलणाऱ्यांची संख्या काही कोटीत आहे. भारतामध्येही शेकडो भाषा आहेत. भावना व विचार व्यक्त करणे याच्या पलीकडेही भाषा बरीच व्यापक असते. भाषेची परिपक्वता संस्कृतिक विकासासाठी आवश्यक असते. मग आम्ही जर विशिष्ट भाषेचा आग्रह धरणार असू तर इतर संस्कृतींचे काय होणार ? हा प्रश्न तयार होत असतो. कारण एक भाषा संपली तर एक संस्कृती नष्ट होत असते. शिवाय एका भाषेत lअनेक बोलीभाषा असतात हेही लक्षात घेतले पाहिजे. प्राचीन काळ ,वेदकाळ,महाभारत काळ , बुद्धकाळ अशा सर्व काळच्या भारतीय समाजाचे ज्ञान केवळ आणि केवळ तत्कालीन भाषेमुळेच मिळालेले आहे हे विसरता कामा नये. भाषांचे स्वरूप ,त्यांच्यात होणारे परिवर्तन, त्यांचा इतिहास, त्यांची विकासक्षमता लक्षात घेतली पाहिजे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रागवर्गीकरणात भाषांगराग ही एक संज्ञा आहे. पंडित भातखंडे यांनी त्याची व्याख्या करतांना “ज्या रागात शास्त्रीय नियमांना विशेष महत्त्व न देता भिन्न प्रदेशातील भाषा व गायनशैली यांची छाया आढळते अशा रागांना भाषांगराग म्हणता.”भाषा, भाषा शिक्षण, भाषा शास्त्र,भाषांचे वर्गीकरण, भाषिक विश्लेषण हे सर्व मुद्दे भाषेच्या संदर्भात ध्यानात घ्यावे लागतात.
मातृभाषा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात लहानपणापासून महत्त्वाची भूमिका बजावत असते. संस्कृतीचा एक भाग म्हणून भाषेचे आदान प्रदान होत असते. त्याच पद्धतीने भाषेद्वारे संस्कृतीचेही आदान प्रदान होत असते हे लक्षात घेण्याची गरज आहे. पृथ्वीवरील माणूस सोडून अन्य प्राण्यांना सामाजिक सांस्कृतिक इतिहास नाही. याचे कारण माणसाकडे भाषा आहे हे आहे. माणसाला जगण्यातील आवश्यक असणारे नवे तंत्र , कसब आणि सामाजिक व्यवहार यांचे माध्यम भाषाच असते. भाषांची विविधता, संस्कृतींची विविधता अखिल मानव जातीच्या कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावत असते. कोणतीही भाषा लादण्यासारखी आणि नाकारण्यासारखीही नसते. भाषा आणि संस्कृतीचे वैविध्यता आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेसाठी ध्यानात घ्यावीच लागेल. देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचने मागील भूमिका डोके ठिकाणावर ठेवून आणि झापडे बाजूला ठेवून समजून घ्यावी लागेल. समाज, राज्य, संस्कृती आणि भाषा यांचे व्यवहार त्यांचे त्यांचे वेगळेपण जपूनही अभिन्न असतात यात शंका नाही. आणि खरी राष्ट्रीय एकात्मता असते. भारतीय संस्कृती ही विविधतेतून एकता साधलेली संस्कृती आहे. भाषा समाजनिष्ठ असते म्हणून भाषाभिन्नत्व हे इथल्या एकत्वाचे मूळ आहे. कारण सर्व माणसे ,सर्व भाषा यांचे उगमस्थान एक नाही.
मराठी विश्वकोशाच्या बाराव्या खंडात म्हटले आहे,” भाषेचे महत्त्व तिच्या भाषिकांच्या संख्येवर आहेच.पण त्याचबरोबर तिचे भौगोलिक व्याप्तीक्षेत्र केवढे आहे, ज्ञानभाषा म्हणून तिचे स्थान काय आहे, याकडेही लक्ष द्यावे लागते. संयुक्त राष्ट्रसंघात अरबीला मान्यता आहे तर हिंदीला का नसावी या प्रश्नाचे उत्तर यामुळे लक्षात येईल. परकीय भाषा येत असूनही दुभाषा वापरून संभाषण करणे हा स्वाभिमान नसून दुराग्रह आहे हे आपण समजले पाहिजे. जर अनेक प्रादेशिक भाषा, इतर असंख्य भाषा व बोली असणाऱ्या भारतात आपण संपर्क भाषा व राष्ट्रभाषा यांचा प्रचार करतो व आग्रह धरतो तर जागतिक पातळीवर त्यामागचे तत्व लक्षात घेऊन आपण वागणे योग्य ठरेल. भाषिक दुराग्रहाची पकड हिंदीला विरोध करणाऱ्या लोकांवर आहे हा आरोप पूर्णपणे खरा नाही. हिंदीचा हिरीरीने प्रचार करणार्या हिंदी भाषिकांवर तर ती त्याहूनही अधिक आहे.भावनेचे अधिष्ठान असलेला कुठलाही प्रश्न नुसत्या तात्विक विवेचनाने किंवा तर्कशास्त्राने सुटू शकणार नाही. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिले पाहिले. विरोध का होतो हे पाहिले पाहिजे. आपण सुचवलेल्या धोरणातून सोय कोणती फायदा किती हे संबंधितांना पटवून दिले पाहिजे. भाषा शिक्षण हे ओझे होता कामा नये. भाषिक धोरण हे लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष असणारे असता कामा नये. आणि मातृभाषा तुच्छ लेखण्याचा किंवा टाकून देण्याचा प्रसंग कोणावरही येता कामा नये. विनिमय साधन म्हणून सर्व भाषा बोलीना सारखेच महत्त्व आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही. भाषेबद्दलची ऐतिहासिक व सामाजिक दृष्टी याबाबतीत आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल.” हे सारे लक्षात घेतले तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती लादणे हा मराठी भाषा, संस्कृती आणि समाज यांच्यावरील गंभीर प्रहार आहे यात शंका नाही.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)