इचलकरंजी ता.३० इस्त्राईलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर सुरू झालेले युद्ध बारा दिवसांनी थांबले. त्याचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले. मात्र अस असलं तरीही हा संघर्ष थांबलेला नाही हे उघड आहे. अर्थात यामुळे जागतिक राजकारणात अमेरिकेची वाढती दादागिरी आणि चीनची त्याला शह देण्याची इच्छा व क्षमता नसल्याचं दिसून येत आहे. त्याच पद्धतीने इस्लामी देशांचे ऐक्य हा भ्रम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण पश्चिम आशीयासह कोणताही इस्लामी देश इराणच्या बाजूने या संघर्षात उभा राहिला नाही.व्यापक युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आज मावळली असली तरी इथून पुढच्या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडत राहतील. दोन्ही देशांना युद्ध परवडणारे नव्हते. तसेच ट्रम्प यांच्या इच्छेला मान्य करणे या देशाना भाग पडले.मात्र त्यातूनच नवी अस्थिरता व अशांतता वाढू शकते ,असे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित व्याख्यान ” इस्त्राईल इराण युद्ध आणि त्याचे परिणाम ” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर अशोक चौसाळकर होते. प्रारंभी शशांक बावचकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. श्रीराम पवार म्हणाले, इराणमध्ये आपल्या हातातील बाहुले असणारे सरकार असले पाहिजे हे अमेरिकेची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे. त्यामुळे इराण अणुबॉम्ब तयार करत आहे आणि त्याचा आम्हाला मोठा धोका आहे हे कारण पुढे करत इस्रायलने इराणवर हल्ला केला. तेव्हा एकट्या इस्त्राईलचा इराणपुढे टिकाव लागू शकणार नाही हे ध्यानात घेऊन अमेरिका या युद्धात थेटपणे उतरली. अमेरिकेने बंकर ब्लास्टर बॉम्ब वापरले. बोंबर विमानातून इराणच्या अणू केंद्रांवर जबर हल्ले केले. जमिनीखाली तीनशे फूट असलेल्या ठिकाणांना उध्वस्त केले.अर्थात अमेरिकेच्या या हल्ल्यामुळेही इराणमधील अणूप्रकल्प संपलेले आहेत असे म्हणता येणार नाही असा दावा खुद्द अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेच केलेला आहे.
डॉ.श्रीराम पवार पुढे म्हणाले,या युद्धात पश्चिम आशियामध्ये इस्राईलचा प्रभाव वाढलेला दिसला तरीही इराण संपलेला नाही. तो पुन्हा युद्धसज्ज होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे हे युद्ध थांबणे म्हणजे संघर्षाचा पूर्णविराम नाही तर अर्धविराम आहे.अणूकार्यक्रम थोडा बाजूला ठेवून आर्थिक निर्बंधातून सुटका कर करून घ्यावी असा इराणमध्ये एक उदारमतवादी प्रवाह आहे. त्या मतप्रवाहाला खीळ बसून तेथील कट्टरतावाद मोकाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अणूबॉम्ब असेल तर इस्रायल किंवा अमेरिका संघर्षासाठी शंभर वेळा विचार करतील या भावनेतून इराणचा अणूकार्यक्रम अधिक गती घेऊ शकतो. अमेरिकेने इराणच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला असला तरी अमेरिकेला रोखण्याची क्षमता कोणीही दाखवू शकले नाही. चीन रशिया हे दोन्ही देश या युद्धाबाबत भूमिका मांडू शकले नाही. आणि भारताच्या संवेदनशीलतेचा विचार डोनाल्ड ट्रम्प अजिबात करत नाहीत हेही यातून दिसून आले आहे. डॉ. श्रीराम पवार यांनी या विषयाची अतिशय सूत्रबद्ध ,तपशीलवार व सर्वांगीण मांडणी केली. तसेच श्रोत्यांच्या प्रश्नांना व शंकांना उत्तरेही दिली. डॉ. अशोक चौसाळकर यांनी अतिशय नेमक्या शब्दात अध्यक्षीय समारोप केला.
या व्याख्यानास जयकुमार कोले, प्रा.रमेश लवटे,डॉ. चिदानंद आवळेकर, ऍड.संभाजी जाधव, डॉ.त्रिषला कदम ,प्राचार्य ए बी पाटील, बजरंग लोणारी, प्रा. विजय जालीहाळे,सचिन कांबळे, धुळगोंडा पाटील, काका कदम, प्रा.शांताराम कांबळे, प्रकाश सुलतानपूरे, डॉ.सुभाष जाधव,पांडुरंग पिसे ,शकील मुल्ला, संदीप चोडणकर, भरमा कांबळे, मनोहर कांबळे, दयानंद लिपारे ,देवदत्त कुंभार, सचिन चव्हाण, सचिन पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. अन्वर पटेल यांनी आभार मानले.