लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात ९ फेब्रुवारीला ‘सूरमिलन’चा जागर
कोल्हापूर : प्रतिनिधी
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘भारत भारती’ संस्थेच्या वतीने कोल्हापुरात ‘सूरमिलन’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राम गणेश गडकरी सभागृह (एस. एम. लोहिया हायस्कूल शेजारी) येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजिका मिनाक्षी गिरीधारी आणि अतुल शेवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
- देशभक्तीपर नृत्याविष्कार: शहरातील विमला गोएंका इंग्लिश मिडियम स्कूल आणि न्यू हायस्कूलचे विद्यार्थी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करणार आहेत.
- गायन मैफिल: ‘स्वरसाक्षी’ ग्रुपचे संचालक अतुल दिवे आणि त्यांचे सहकारी वादक देशभक्तीपर गीतांची सुश्राव्य मैफिल सादर करतील.
- कालावधी: सुमारे अडीच ते तीन तास चालणाऱ्या या कार्यक्रमातून सरदार पटेल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचावा आणि सांस्कृतिक एकात्मता जोपासली जावी, या उद्देशाने भारत भारती संस्थेने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
