डॉ. जयंत नारळीकर : विज्ञाननिष्ठा रुजवण्यासाठी अथक कार्यरत असलेले थोर वैज्ञानिक प्रबोधक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
जागतिक कीर्तीचे थोर खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर मंगळवार ता. २० मे २०२५ रोजी वार्धक्याने वयाच्या ८६ व्या कालवश झाले. कृष्णविवराच्या संदर्भात त्यांनी केलेलं संशोधन फार महत्त्वाचे आहे.खगोलशास्त्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुका सारखी संस्था उभी करण्यात नारळीकरांचे मोठे योगदान आहे. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा ज्या सफरचंदाच्या झाडामुळे मिळाली त्या झाडाची फांदी डॉ. नारळीकर यांनी आयुकामध्ये लावलेली आहे. आयुका मध्ये होणाऱ्या विज्ञानदान कार्यक्रमाइतकेच आकर्षण व प्रेरणा हे झाडही देताना दिसते. डॉ.जयंत नारळीकर यांनी समाज विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे, विज्ञान लोकप्रिय झालं पाहिजे या भूमिकेतून केलेले लेखनही वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्या प्रबोधनाचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या निधनाने समाजाला विज्ञाननिष्ठ बनवणारा महान वैज्ञानिक प्रबोधक आपण गमावला आहे.
जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर एक नामवंत गणिततज्ञ होते. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये ते गणित विभागाचे प्रमुख होते. तर नारळीकरांच्या मातोश्री सुमतीबाई या संस्कृत पंडित होत्या. जयंत नारळीकरांचे शिक्षण वाराणसी येथे झाले. विज्ञान विषयाची पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. तेथे त्यांनी पीएचडीसह अनेक पदव्या प्राप्त केल्या. प्रा. फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली खगोल भौतिक शास्त्रात त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. या संशोधनाला जागतिक कीर्ती मिळाली. “हॉईल नारळीकर सिद्धांत “या नावाने हे संशोधन प्रसिद्ध आहे. या संशोधनामुळे गुरुत्वाकर्षणीय संबंधीचा नवीन नवीन सिद्धांत तयार झाला. या सिद्धांताला ‘कन्फॉर्मल थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी ‘ म्हणून ओळखलं जातं. त्याच पद्धतीने पुढच्या काळात नारळीकरांनी आपल्या इतर भारतीय सहकाऱ्यांसह रेडिओ लहरी ,गुरुत्वाकर्षण, अवकाश विज्ञान अशा विविध विषयात संशोधन केलं.
१९६६ साली गणिततज्ञ असलेल्या मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मंगलाताई यांचेही लेखिका , सहलेखिका व अनुवादक म्हणून मोठे योगदान आहे. डॉ. मंगला नारळीकर त्यांचे १७ जुलै २०२३ रोजी पुण्यात निधन झाले. या दांपत्याला गीता, गिरिजा व लीलावती आशा तीन कन्या झाल्या .१९७२ साली जयंत नारळीकर भारतात परत आले. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये अध्यापनाचे काम सुरू केलं. तसेच नंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणूनही काम करू लागले. डॉ. जयंत नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्यामध्ये रुजावा यासाठी केलेले लेखन हे फार महत्त्वाचे आहे. ‘ शहाणे करून सोडावे सकळजन’ ही त्यांची भूमिका खालील काही उदाहरणांवरून स्पष्ट होते.
“अभयारण्य “या विज्ञान कादंबरीत त्यांनी पृथ्वीचे महत्त्व आणि आपली जबाबदारी अतिशय नेमकेपणे सांगितलेली आहे. या कादंबरीच्या प्रस्तावने ते म्हणतात,”बहुरत्ना वसुंधरा हे पृथ्वीचे वर्णन खूप काही सांगून जाते .ही रत्ने केवळ सोने, हिरे ,मोती यांच्या स्वरूपात नसून जीवसृष्टीला पोषक अशा पर्यावरणाच्या रूपात पाहिली पाहिजेत.सूर्याभोवती फिरणाऱ्या नवग्रहात एकट्या पृथ्वीला ही देणगी मिळालेली आहे. विविध अंतराळयानानी इतर ग्रहांची आणलेली माहिती काय दर्शवते ? आपल्यासारखी जीवसृष्टी नांदवू शकणारे वातावरण त्यांच्याकडे नाही. आपल्या गरजाही लाडावलेल्या मुलासारख्या आहेत.तापमान पन्नास अंशाला जाऊन भिडले की उष्णतेचा कहर उडतो. आणि शून्याखाली काही अंश गेले की उलटा त्रास. त्या तुलनेत चंद्रावर तापमान सूर्यास्त झाला की ताशी १५०अंश इतक्या भरभर घसरते. श्वास घ्यायला तिथे वातावरणच नाही.तर शुक्रावरचे वातावरण जीव घेणारे.थोडक्यात आपण ट्रीपला निघावे आणि इतर ठिकाणे पाहून आपले घर बरे म्हणून परतावे. तसे विश्वाचे मर्यादित का होईना पण दर्शन घेतले की पृथ्वीचे महत्त्व कळते .पण कळणे आणि बोध घेणे यात फरक आहे. तंत्रज्ञानाचा अविचारपूर्वक केलेला वापर ,आपले रक्षण करणारे ओझोनवरचे कवच भेदले जात आहे त्याबद्दलची उदासीनता,आपले मर्यादित हितसंबंध जपण्यासाठी संपूर्ण जीवसृष्टीला मारक ठरणाऱ्या अण्वस्त्रांची वाढ आदी गोष्टी काय दर्शवतात ? वसुधैव कुटुंबक्कम हे तथ्य कळले असले तरी अद्याप आपल्या आचरणात रुजलेले नाही. उलट ते कुटुंब नांदू नये अशा स्थितीत वसुधेला आणून सोडायची बेपर्वाईच दिसून येते.”
डॉ. जयंत नारळीकरांनी चुकीचे लोकभ्रम व अंधश्रद्धा दूर करण्याचा अतिशय मौलिक स्वरूपाचा प्रयत्न केला आहे. फल ज्योतिषाचा पगडा आपल्या समाजावर प्रचंड आहे. सर्व माध्यमातून आजचे भविष्य, आठवड्याचे भविष्य, महिन्याचे भविष्य, वर्षाचे भविष्य राशींच्या आधारावर द्यावेच लागते. ते अतिशय अर्थहीन असते हे अनेकदा सिद्धही झालेले आहे. पण लोकभ्रम आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव माध्यमांना टाळता येत नाही. आकाशाशी जडले नाते आपल्या पुस्तकात डॉ. जयंत नारळीकरांनी “खगोलशास्त्र आणि फलज्योतिष “हे एक प्रकरणच लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, ” एकविसाव्या व्या शतकापुढे उभे असताना आपल्या अंधश्रद्धा आपल्याला पहिल्या शतकाच्या पुढे जाऊ देत नाहीत. विज्ञानाच्या गरुड झेपेत आपल्या सूर्यमालेचे घटक ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांचीच काय तर लांबच्या लांब ताऱ्यांच्या आणि त्याहून दूरच्या आकाशगंगांची माहिती आता मिळत आहे. धूमकेतुंच्या कक्षा बिनचूक ठरवता येतात. विसाव्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. एकविसाव्या शतकात तो मंगळ पदाक्रांत करेल.पाच सहा शतकांपूर्वीच्या मानवाने ग्रहांचे नीट आकलन न झाल्याने फल ज्योतिषावर विश्वास ठेवणे आपण समजू शकतो. पण आजच्या काळात पुष्कळ माहिती उपलब्ध असूनही अनेक वैज्ञानिक चाचण्यांत नापास झालेल्या कल्पनांवर विश्वास ठेवून वेळेचा,शक्तीचा आणि धनाचा अपव्यय करणे किती योग्य आहे ?
“खगोलशास्त्राचे विश्व ” हे डॉ.नारळीकरांचे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने १९८१ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकात त्यांनी विविध प्रकरणातून या विषयाची मूलभूत मांडणी केलेली आहे. यामध्ये ‘ लेखकाचे निवेदन ‘ मध्ये त्यांनी मांडलेला एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणतात,”प्रगत देशात विज्ञानाची वाढ केवळ संशोधन प्रबंधापर्यंत मर्यादित नाही. खगोलशास्त्रीय संशोधनाची माहिती सोप्या भाषेत सुशिक्षित जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी अनेक पुस्तके अशा देशात दरवर्षी प्रसिद्ध होतात.आणि अशी पुस्तके लिहिण्याचे काम नाणावलेल्या शास्त्रज्ञांनी केलेले दिसते. अशा तऱ्हेची अतांत्रिक पुस्तके लिहिण्याची प्रथा पाश्चात्य देशात कित्येक दशकांपासून आहे.सर आर्थर एडिंगटन आणि सर जेम्स जीन्स यांची पुस्तके पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात गाजली होती. खुद्द अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे स्वतःचे सापेक्षता वादावरचे संशोधन सोप्या भाषेत सांगणारी पुस्तके लिहिलेली आहेत. आज तोच वारसा सर फ्रेड हॉईल सारखे खगोलशास्त्रज्ञ पुढे चालवत आहेत.भारतात मात्र अशा प्रकारची पुस्तके प्रांतीय भाषेतून फारच कमी दिसून येतात. विज्ञानाच्या अनेक शाखांपैकी खगोलशास्त्र हा विषय असा आहे की ज्याबद्दल जनसामान्यात कुतूहल असते .ते कुतूहल विज्ञाननिष्ठ करण्याची जबाबदारी भारतातील शास्त्रज्ञांची नव्हे काय ?जर कुतूहलाला योग्य दिशा योग्य वेळी दाखवली नाही तर ते अंधश्रद्धेच्या दिशेने वाढण्याचा संभव असतो हे विसरता कामा नये. फलज्योतिष हे अशाच अंधश्रद्धेतून जन्माला आलेले आहे.’
‘यक्षाची देणगी ‘या १९७९ साली प्रकाशित झालेल्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे,”विसावे शतक हे विज्ञान युग म्हटले जाते. आज कालच्या प्रौढ व्यक्तीला तिच्या आयुष्यात विज्ञानाने जगात घडवून आणलेले बदल दिसत आहेत.गेल्या पन्नास साठ वर्षात मनुष्याच्या जीवनचर्ये जितके बदल झाले त्यापूर्वीच्या दोन हजार वर्षात झाले नाहीत हे पटवून द्यायला समाजशास्त्रज्ञाची आवश्यकता नाही. परंतु विज्ञानाची ही गरुडझेप मानव समाजाला पचलेली दिसत नाही. एकीकडे विज्ञानाच्या देणग्या भरमसाठ वापरण्यासाठी मानव उत्सुक आहे. पण त्यासाठी ताळतंत्र सोडून , ह्या देणग्या किती प्रमाणात वापराव्यात, प्रदूषणासारखे गैरफायदे कसे टाळावे वगैरे प्रश्नांचा विचार त्याने केलेला नाही. एकीकडे विज्ञानाने घडवून आणलेले चमत्कार तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. तर दुसरीकडे अंधश्रद्धा ,तथाकथित चमत्कारांवर विश्वास, पुराण काळापासून चालत आलेल्या भ्रामक समजुती सोडून द्यायला तो तयार नाही. विद्यनेच मानव विज्ञान पचवू शकेल असे म्हटले पाहिजे. वैज्ञानिक शोध आणि त्यांचे तंत्रज्ञानात झालेले रूपांतर मानव समाजाला कोणीकडे खेचत आहे याची सामान्य माणसाला जाणीव असली पाहिजे. ही जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी मुलत: वैज्ञानिकांवर पडते.शिवाय आजकालच्या दिवसात वैज्ञानिक संशोधनाला लागणारा प्रचंड पैसा पुरवण्याचे काम सरकार (म्हणजे सामान्य कर भरणारा नागरिक) करते .जे आपल्याला पैसा पुरवतात त्यांना तो कोणत्या कामासाठी वापरण्यात येतो हे जाणून घ्यायचा हक्क नको का ?”
जागतिक पातळीवरचे वैज्ञानिक असलेल्या नारळीकरांची भूमिका विज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत कसे पोहोचेल याचा ध्यास घेतलेली दिसते. त्यांची साहित्य निर्मिती त्यातून कमालीच्या सातत्याने झालेली आहे.नाशिक येथे झालेल्या २०२१साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते.या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातहीडॉ . जयंत नारळीकर यांनी विज्ञान आणि समाज,विज्ञान आणि साहित्य यांचे परस्पर संबंध कसे असावे हे स्पष्ट केले होते. तसेच मराठी साहित्यामध्ये विज्ञान साहित्याची कमतरता असून ते अधिक समृद्ध झाले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समाज निर्माण करणे ही लेखकांची ही जबाबदारी आहे हेही आवर्जून सांगितले. विज्ञान मनोरंजनाच्या स्वरूपात मांडता येते याचे अनेक दाखले त्यांनी दिले. त्यासाठी साहित्य आणि विज्ञान यांच्यात समन्वय असण्याची गरज प्रतिपादित केली. विज्ञान कथा अथवा कादंबरी अथवा विज्ञान विषयक साहित्य हे मूलतः साहित्यच असते हे लक्षात घेतले पाहिजे असे त्यांचे मत होते. विज्ञान आणि तर्कशुद्ध विचार यांचा स्वीकार करणारी जीवनशैली स्वीकारली पाहिजे हे सांगून त्यांनी खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यामधील मूलभूत फरक सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांनाही समजत नाही याबाबत चिंता व्यक्त केली होती.
साहित्य संमेलनातील आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी काही गैरसमज जाणीवपूर्वक खोडून काढले होते. या भाषणात ते म्हणाले होते,” सर्वसामान्य माणसांची (अर्थात भारतातील) एक असा गोड गैरसमज आहे की आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते.आणि ते पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. याबाबतीत वस्तुस्थिती काय आहे ?आपला पुरातन समाज वैज्ञानिक दृष्ट्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडले पाहिजे. पुष्पक विमान ,क्षेपणास्त्रे आदींची उदाहरणे पुरणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत .ज्याला आपण गणितीय विज्ञान म्हणतो त्या स्वरूपात नाही. हा फरक एका आधुनिक उदाहरणाने स्पष्ट करतो.आपोलो 11 या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखवले. या स्वारीचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. चंद्रावरच्या स्वारीची अशी हकीकत ज्युल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते. समजा इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर या दोन स्वाऱ्यापैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ? हे सांगता येणार नाही .परंतु जर अधिक खोलात शिरलो तर अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेतल लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल व अभिलेख सापडतील. ज्यावरून अपोलो 11 चे यान कसे तयार केले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याच तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळ यात्रा आखता येईल. पुरणातील वर्णने पहिल्या प्रकारची आहेत.दुसऱ्या प्रकारची नाहीत.पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका ( मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही, वायव्यास्त्र आग्नेयाशस्त्र वगैरे कसे बनवले जाते याची कृती महाभारतात सापडत नाही. पौराणिक वाङ्मयातून इतकेच निदान करता येते की ते लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्या पलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही .हा पुरावा का उपलब्ध नाही ?याचे कारण असे सांगण्यात येते की आपल्या पूर्वजांनी ती माहिती सांकेतिक भाषेत लिहून ठेवली किंवा ती माहिती नष्ट झाली. अशी विधाने तपासून पाहता येत नसल्याने त्यांना काही महत्त्व राहत नाही. तो केवळ ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न उरतो “.
‘चार नगरातले माझे विश्व ‘ हे त्यांचे आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. त्याला साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळाला. या साडेपाचशे पृष्ठांच्या आत्मचरित्रामध्ये डॉ.जयंत नारळीकर यांनी बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या चार शहरांमध्ये झालेली वाटचाल अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आणि सविस्तरपणे विशद केली आहे. या आत्मचरित्राच्या मलपृष्ठावर म्हटले आहे, ” जयंत नारळीकर नावाचा एक मध्यमवर्गीय सुसंस्कृत घराण्यात जन्मलेल्या असामान्य बुद्धिवान मुलाच्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे .वेधक ,उत्कंठा पूर्वक आणि गुंतवून ठेवणारी.तीव्र बुद्धिमत्ता हीच एकमेव कसोटी मानल्या जाणाऱ्या केंब्रिज विद्यापीठात बनारसला शिकणाऱ्या जयंत नारळीकर या मुलाला सहज प्रवेश मिळतो. अत्यंत लहान वयात विज्ञान क्षेत्रातील जागतिक मानसन्मान प्राप्त करत जागतिक पातळीच्या वैज्ञानिकातअग्रस्थान मिळवतो .विज्ञान क्षेत्रात लौकिक यशाच्या अनेक वाटा खुणावत असतानाही संशोधनाची अवघड दिशा निवडण्याचे आव्हान पेलून दाखवत विज्ञान प्रसाराच्या ध्येयाने झपाटून जातो. पाश्चात्य देशात अनेक प्रकारच्या व्यवसायाच्या संधी येऊनही निग्रहाने त्या ओलांडत माय भूमीच्या मातीशी आपले जोडलेले घट्ट नाते ओळखत भारतात पुन्हा परतलेल्या या अद्वितीय व्यक्तीत्वाचा हा दैदीप्यमान प्रवास. भेटलेल्या असंख्य माणसांचा सहवास, कौटुंबिक जीवनाबरोबरच पाश्चात्य सामाजिक ,शैक्षणिक जीवन, गुरु, मित्र आदीं बद्दल आठवणी कथन करताना स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नितळ साधेपणा, विनम्रता आणि तितकीच अलिप्तता. वाचक म्हणून हे सगळं अनुभवताना या व्यक्तिमत्त्वाबद्दल पानोपानी अतीव आदर वाटत राहतो.” मराठी वाङ्मयात एक ललित लेखक म्हणून स्वतंत्र स्थान असलेल्या जयंत नारळीकर यांची ओळख या आत्मकथनातून नव्याने उजळत जाते.”
तसेच अंतराळातील भस्मासुर,अंतराळातील स्फोट,अभयारण्य,चला जाऊ अवकाश, सफरीला,टाइम मशीनची किमया,प्रेषित,यक्षांची देणगी,याला जीवन ऐसे नाव,वामन परत न आला,व्हायरस,अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते,गणितातील गमतीजमती,नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर),नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान,विश्वाची रचना,विज्ञान आणि वैज्ञानिक,विज्ञानगंगेची अवखळ वळणे,विज्ञानाची गरुडझेप अशी अनेक पुस्तके नारळीकरांनी लिहिली. या पुस्तकांचे विविध भाषांतून अनुवादही झालेआहेत.
डॉ. नारळीकर यांना पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यासह त्यांच्या संशोधन व विज्ञान प्रसार कार्यासाठी डॉ.शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार युनेस्को चा कलिंग पुरस्कार, एमपी बिर्ला पुरस्कार, तेनाली-हैदराबाद येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन चा जीवनगौरव पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्र भूषण पुरस्कार, स्मिथ प्राईज, ॲडम्स प्राईजअसे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. तसेच ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व, स्पेन मधील आयएसी बीबीव्ही फाउंडेशनचे अतिथी प्राध्यापक म्हणूनही त्यांना गौरवीत करण्यात आलेले होते. बारदवन,बनारस ,रूरकी, कोलकत्ता ,कल्याणी अशा अनेक विद्यापीठांच्या माने डॉक्टरेट त्याला मिळालेले होते. “विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर”हे त्यांचे चरित्र डॉ.विजया वाड यांनी लिहिले आहे. साहित्य अकादमीच्या वतीने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढाव घेणारा अनिल झणकर दिग्दर्शित एक तासाचा लघुपटही तयार करण्यात आला आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)