भारतरत्न राजीव गांधी : आधुनिक भारताची उभारणी करणारे नेतृत्व
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
२१ मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी तीन वर्षे म्हणजे २० ऑगस्ट १९४४ रोजी राजीव गांधी यांचा मुंबईत जन्म झाला. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्याच दिवशी संध्याकाळी काँग्रेस पक्षाने त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची नेतेपदी निवड केली.१ नोव्हेंबर १९८४ रोजी राजीव गांधी यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर लगेचच झालेल्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ५१४ पैकी ४०४ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले. आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी पंतप्रधान म्हणून निवडले गेलेले ते सर्वात तरुण पंतप्रधान होते.
राजीव गांधी हे खरे तर राजकारणापासून दूर होते. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज व केंब्रिज विद्यापीठात त्यांचे शिक्षण झालेले होते. तेथेच त्यांचा इटलीच्या अँटोनिया माईनो यांच्याशी स्नेह जुळला. १९६८ साली त्यांनी भारतात त्यांच्याशी लग्न केले. आणि अँटोनिया माईनो सोनिया गांधी बनल्या.आई पंतप्रधान असूनही ते इंडियन एअरलाइन्स मध्ये वैमानिक म्हणून नोकरी करत होते. मात्र १९८० साली संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर एका अपरिहार्य परिस्थितीत ते राजकारणात आले. १९८१ ची लोकसभा निवडणूक अमेठी मधून त्यांनी तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी जिंकली होती. त्यानंतर अवघ्या तीन वर्षातच त्यांच्यावर भारताच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी आली.
आधुनिक भारताची उभारणी करणारे एक उमद नेतृत्व म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. आपल्या पंतप्रधानपदाच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी संसदीय लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व ओळखून त्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज्य कायद्यामध्ये मोठे बदल केले. त्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना तेहेतीस टक्के आरक्षण मिळू लागले. या निर्णयामुळे देशातील लाखो महिला निर्णय प्रक्रियेत सहभागी झाल्या.ही एक फार मोठी राजकीय क्रांती होती.त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षातील संघटनात्मक सूत्रे नव्या तरुणांकडे आली पाहिजेत याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं. एका अर्थाने काँग्रेस पक्षातील जुन्या प्रस्थापितांचं राज्य त्यांनी पद्धतशीरपणे खालसा करायला सुरुवात केली होती. राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला.९ मार्च १९८५ पासून तो देशभर लागू झाला.त्यामुळे आयाराम गयाराम संस्कृतीला वेसण बसलेली होती.
संगणक, दळणवळण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मूलभूत असे क्रांतिकारी बदल त्यांनी घडवून आणले. आधुनिक तंत्र विज्ञानाच्या सहाय्याने ग्रामपंचायतींचा थेट जगाशी संपर्क जोडणार जाळ त्यांनी देशभर विणलं. विसाव्या शतकात शेवटच्या दोन दशकांमध्ये एकविसाव्या शतकाच्या दिशेने वेगवान वाटचाल करायची असेल आणि त्या स्पर्धात्मक युगात भारताला टिकायचं असेल तर संगणकाच्या वापराशिवाय गत्यंतर नाही हे वास्तव राजीव गांधी यांनी ओळखलं.आणि त्या दिशेने पावले टाकली.आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण जी वाटचाल करत आहोत त्याचे मोठे श्रेय राजीव गांधी यांनाच जाते. सॅम पित्रोडा यांच्या मदतीने त्यांनी या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले. उपग्रह तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतात सर्वत्र दूरदर्शनचं जाळ त्यांनी निर्माण केलं.
खाजगीकरण, उदारीकरण, आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण या पायावर उभारलेल्या भारताचे आर्थिक धोरणाचा पाया त्यांनीच रचलेला होता. कारण राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ मध्ये तत्कालीन वाणिज्य मंत्री व नंतर पंतप्रधान झालेले विश्वनाथ प्रतापसिंह यांनी नवीन आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं. त्याद्वारे खाजगी क्षेत्राला अनेक वस्तूंची खुली आयात करण्याची परवानगी देण्यात आली. परवाना पद्धतीच्या शिथिलीकरणाला सुरुवात झाली. भारतीय उद्योग क्षेत्राला जगाच्या व्यापार पेठेत स्पर्धा करण्याची दारे या धोरणाद्वारे खुली होण्याची शक्यता निर्माण झाली. वित्तीय बाजाराच नियंत्रण व विकास करण्याच्या हेतूने सेबी या संस्थेची स्थापनाही १२ एप्रिल १९८८ रोजी केली गेली. या साऱ्यामुळे १९९१ च्या नव्या आर्थिक सुधारणा झाल्या. अर्थात या धोरणाचे अनेक फटकेही बसले यात शंका नाही
राजीव गांधी यांनी जुलै १९८५ मध्ये अकाली दलाचे अध्यक्ष हरचरणसिंग लोंगोवाल यांच्याशी चर्चा करून पंजाब शांत करण्याचा प्रयत्न केला. २४ जुलै १९८५ रोजी राजीव लोंगोवाल करार झाला. विशिष्ट कालमर्यादेत चंदिगडचं पंजाबला हस्तांतरण करणे, शेजारच्या राज्यांमधील पंजाबी भाषिक प्रदेशाचा पंजाबमध्ये समावेश करणं, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील सीमांच्या संदर्भातील वाद मिटवण्यासाठी आयोग नेमणे,हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या राज्यातून वाहणाऱ्या नद्यांचे न्याय्य पाणी वाटप करण्यासाठी अयोग नेमणे ,पंजाब मध्ये विधानसभा निवडणुका घेऊन लोकनियुक्त सरकार स्थापन करणे, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्ली आणि इतरत्र झालेल्या हिंसक दंगलीची चौकशी करणे, या हिंसाचारात बळी गेलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देणे अशा अनेक बाबी या करारात समाविष्ट होत्या. अर्थात हा करार राज्यात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनी मानला नाही. त्यातूनच २० ऑगस्ट १९८५ रोजी हरचरणसिंग लोंगोवाल यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या करण्यात आलीतेथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाचे सुरजित सिंग बर्नाला मुख्यमंत्री असलेले सरकार आलं आणि तोही प्रश्न शांत होऊ लागला.
राजीव गांधी यांनीआसाम मधील आसाम गण संग्राम परिषद आणि आसाम स्टुडंट्स युनियन या संघटनांशी चर्चा करून आसाम मधील परकीय नागरिकांच्या प्रश्नावर उभयमान्य असा करार १५ ऑगस्ट १९८५ रोजी घडवून आणला. या करारामुळे आसामचा प्रश्न सुटण्यामध्ये मदत झाली. त्यानंतर तेथे १९८६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाम गणपरिषदेला बहुमत मिळाले. तेथे प्रफुल्ल कुमार महानतो हे अवघ्या २६ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. आसामचा प्रश्न मार्गी लागल्याची खात्री मिळू लागली. अर्थात पुढे आसाम मधील आदिवासी व बिगर आदिवासी यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने आसाममध्ये पुन्हा काही वर्षांनी अशांतता निर्माण झाली.
त्याचप्रमाणे राजीव गांधी यांनी मिझोराम, नागालँड च्या प्रश्नांवरही चर्चेतून मार्ग काढले. तेथेही लाल डेंगा यांच्याशी चर्चा करून विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या त्या ठिकाणी मिझोर्स नॅशनल फ्रंटचे सरकार अस्तित्वात आले. राजीव गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व धगधगते प्रश्न सोडवण्यासाठी पक्षीय हित बाजूला ठेवून राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन हे प्रश्न सोडवले याचे ऐतिहासिक महत्त्व व मूल्य फार मोठे आहे. नाहीतर गेल्या काही वर्षात सत्तेसाठी पक्षफोडी पासून ईडी धाडीपर्यंत काय काय केले जाते हे आपण पाहतच आहोतच.
सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम स्त्रियांना क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १२५ नुसार पोटगीचा हक्क आहे असा निर्णय दिलेला होता. मात्र राजीव गांधी यांनी मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांच्या दबावाला बळी पडून या कलमात दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत आणले.बहुमताच्या आधारे ते मंजूरही करून घेतले.मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भात त्यांनी ही बोटचपी भूमिका घेतली. त्याबद्दल त्यांच्यावर कठोर टीका करण्यात आली.तसेच त्यांच्या धर्मनिरपेक्ष विचारा संदर्भात शंका घेण्यात आली. आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचा मध्यवर्ती व मध्यम मार्गी असलेल्या काँग्रेस पक्षाला मुस्लिम धार्जिणे ठरवण्याचा प्रचार वेगाने सुरू झाला. त्याची फळे आज ही या पक्षाला भोगावी लागत आहेत. तसेच अयोध्येच्या राम मंदिराच्या आवाराच अनेक दशके बंद असलेलं कुलूप काढण्याचा राजीव गांधी यांचा निर्णय अतिशय वादग्रस्त होता. त्यातून राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वाद अधिक वेगाने पेटला. त्याचा पुरेपूर लाभ भारतीय जनता पक्षाने उठवला.
राजीव गांधी पंतप्रधान असतानाच दक्षिण आशियाई देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने सार्क (साऊथ एशियन अँड रीजनल कोऑपरेशन) ही संस्था७ व ८ डिसेंबर १९८५च्या बांगलादेशातील ढाका येथील पहिल्या शिखर परिषदेत स्थापन झाली. या संघटनेची दुसरी परिषद ७ व ८ डिसेंबर १९८६ रोजी बेंगलोर येथे झाली होती. या परिषदेत दक्षिण आशिया क्षेत्रात पर्यटन विकास तसेच विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनाला प्राधान्य देणारे निर्णय घेण्यात आले होते.
१९८६ साली सोवियत रशियाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या भारत दौऱ्यात राजीव गांधी व गोर्बाचेव्ह यांचा ‘ दिल्ली जाहीरनामा ‘ घोषित करण्यात आला. आण्विक निशस्त्रीकरण साधणाऱ्या या घोषणा पत्राचे जागतिक राजकारणात मोठे महत्त्व होत. तसेच १९८८ साली राजीव गांधींनी चीनचा अधिकृत दौरा केला. त्या दौऱ्यात दोन्ही देशांनी सीमा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्याचा, परस्पर सहकार्य वाढवण्याचा, पंचशील तत्त्वांचे बळकटीकरण करण्याचा असे अनेक निर्णय घेतले होते. राजीव गांधी यांच्या या दौऱ्यानंतर चीन आणि भारत यांच्यातील मंत्री आणि अधिकारी स्तरावरच्या चर्चांमध्ये लक्षणीय स्वरूपाची वाढ झाली. आणि विविध क्षेत्रात देवाणघेवाणी सुरू झाली
राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. टाडासारखे अनेक कायदे संमत करण्यात आले. गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला. शिक्षणाच्या क्षेत्रात ऑपरेशन ब्लॅक बोर्ड म्हणजे खडू फळा योजना सुरू करण्यात आली. आदिवासींच्या जंगल उत्पादनांसाठी योग्य भाव मिळवून देणारी ट्रायफेड नावाची संस्था केंद्र सरकारने उभारली. भारताच्या क्षेपणास्त्र विकासाची ग्वाही देणाऱ्या पृथ्वी व अग्नी या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणीही १९८८ साली राजीव गांधी पंतप्रधान असतानाच झाली. व्यावसायिक सॅटॅलाइट उपक्रमही याच काळात सुरू झाला. माहिती तंत्रज्ञान व संगणकिय विकासाला गती मिळावी यासाठी सीडॅकची स्थापनाही १९८८ साली करण्यात आली. याच वर्षी भारतातील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण स्थापले गेले. पुढे दहा वर्षांनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारने सुवर्ण चतुष्कोन यासारख्या ज्या योजना राबवल्या त्याच्या अंमलबजावणीसाठी
राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफोर्सच्या प्रकरणात एक संशयाचे भूत उभे करण्यात आलं. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या राजीव गांधींची प्रतिमा या आरोपांमुळे मलिन झाली. भारताने स्वीडनच्या हॉवीझार कंपनीकडून बोफोर्स तोफा खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ भारतीय राजकीय नेते ,अधिकारी आणि मध्यस्थ यांना ६२ कोटी रुपयांची दलाली दिली गेली असा आरोप १६ एप्रिल १९८७ रोजी स्वीडिश रेडिओने केला होता. अर्थात या चौकशीमध्ये राजीव गांधी यांच्या विरोधात काहीही सापडले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलं. पण त्याची फार मोठी किंमत त्यांना हयात असताना द्यावी लागलेली होती.कारण बोफोर्स मुळे काँग्रेस पक्षातही फूट पडली. विश्वनाथ प्रतापसिंह, अरुण सिंह, अरुण नेहरू, आरिफ महंमद खान अशा अनेक नेत्यांना पक्षातून काढण्यात आलं.पक्षांतर्गत मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात राजीव गांधींना मोठ्या प्रमाणात अपयश आलं. परिणामी १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.
श्रीलंकेत १९८७ साली श्रीलंकेचे राष्ट्रपती जे.आय.जनवर्धने यांच्या विनंती वरून श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने शांतिसेना पाठवण्याच्या त्यांचा निर्णय केवळ वादग्रस्त नव्हे तर त्यांच्या हत्येलाही कारणीभूत ठरला. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या श्रीलंकेतील कडव्या दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींच्या हत्या केली. त्यावेळी दहाव्या लोकसभेची निवडणूक सुरू होती. निवडणुकीचा पहिला पार टप्पा पार पडलेला होता. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी राजीव गांधी तामिळनाडू दौऱ्यावर होते. त्यावेळी ही नियोजन पूर्वक हत्या झाली. इंदिरा गांधींच्या पाठोपाठ अवघ्या सात वर्षात राजीव गांधीही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले. त्यांच्या मृत्यूनंतर जून १९९१मध्ये लोकसभा निवडणूक झाल्या. काँग्रेसला ५३४ पैकी सर्वाधिक अशा २४४जागा मिळाल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत केवळ २ जागांवर विजयी झालेला भारतीय जनता पक्ष अवघ्या सात वर्षात १२० जागांवर या निवडणुकीत पोचला होता. अर्थात त्यामध्ये मंडल आयोग व राम जन्मभूमी प्रकरणाचा वाटा मोठा होता. बहुमत असलं तरी काँग्रेस सरकार स्थिर राहीलच याची खात्री नव्हती. काँग्रेसमध्येही दक्षिण भारताचा प्रतिनिधी पंतप्रधानपदी असावा असा विचार झाला. त्यामुळे पंतप्रधान पदाचे दावेदार असणारे ५१ वर्षाचे शरद पवार यांनी आपलं नाव मागे घेतलं आणि ७० वर्षाचे पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने हे आघाडी सरकार तेव्हा अस्तित्वात आले आणि हे सरकार पाच वर्षे टिकले. १९९१ साली राजीव गांधी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.
राजीव गांधी यांना अवघी दहा वर्षाची राजकीय कारकीर्द मिळाली. त्यात त्यांनी काही क्षेत्रात भरीव स्वरूपाचे काम केले. तसेच काही चुकाही केल्या. पण वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्याचं कालवश होणं ही मोठी राष्ट्रीय हानी होती. त्यांच्या मृत्यूनंतर देशाच्या राजकारणान अतिशय वेगळ्या स्वरूपाची दिशा घेतली. त्यांची हत्या झाली नसती तर देशाचं राजकारणही निश्चित बदललं असतं. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेलं एक तरुण ,उमद नेतृत्व ते होते.राजीव गांधी यांनी एक समर्थ भारताचे स्वप्न बघितले होते. त्यांनी अनेक ठिकाणी ,भारत हा एक प्राचीन देश आहे मात्र तो तरुण देश आहे. मी तरुण आहे आणि माझे एक स्वप्न आहे.ते म्हणजे भारताला एक मजबूत स्वतंत्र, सर्वार्थाने आत्मनिर्भर आणि जगातल्या सर्व देशात अग्रस्थानी मला आणायचं आहे.मानव जातीची मला सेवा करायची आहे. / कारखाने, महामार्ग हा केवळ विकास असू शकत नाही. विकासाचा खरा अर्थ लोकांचा विकास हा आहे. या विकासामध्ये मानवी मूल्यांचे महत्त्व मोठे आहे./ स्त्रिया देशाचे एक सामाजिक चैतन्य असतात. समाजाला एकत्रित जोडण्याचा सामर्थ्य स्त्रियांमध्ये असते./ प्रत्येक व्यक्तीने इतिहासापासून काहीतरी शिकले पाहिजे. ज्या देशात देशांतर्गत झगडे आणि आपापसात विसंवाद होतात तो देश कमजोर होत असतो. या कमजोरीतूनच बाह्य शक्तीना उत्तेजन मिळत असते. आणि अशा कमजोरीची देशाला फार मोठी किंमतही चुकवावी लागते./ शिक्षण हे एक असे माध्यम आहे की जे आपल्या मागील हजार वर्षांच्या सामाजिक व्यवस्थेला एक समानतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकते./ शेतकरी कमजोर झाला तर देश आपली आत्मनिर्भरता गमावून बसत असतो. आणि शेतकरी सक्षम झाला तर देशाचे स्वातंत्र्य सुद्धा अधिक मजबूत होत असते. शेती क्षेत्राची प्रगती केल्याशिवाय देशातली गरिबी संपणे अशक्य आहे. गरिबी दूर करण्याचा आमचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या विकासाशी निगडित आहे./ एकविसाव्या शतकातील भारत हा गरिबीच्या ओझ्यापासून मुक्त असलेला आणि जनतेच्या आकांक्षांची पूर्ती करणारा असेल. अशा स्वरूपाचे विविध विचार त्यांनी व्यक्त केलेले होते. या उमद्या नेत्याला प्रत्यक्ष भेटण्याची व बोलण्याची संधी ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते असताना १९९० साली नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी मिळाली होती. त्या आठवणी आज ३५ वर्षानंतरही त्यांच्यासारख्याच सदाबहार आहेत.भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन…!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)