पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे सोमवारी हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८०% निधीची मागणी; अनुसूचित जातींच्या हक्कासाठी ‘एल्गार’
हातकणंगले (प्रतिनिधी):
अनुसूचित जाती उपयोजनेचा (SCSP) निधी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८०% इतका बंधनकारक करावा, निधीचा गैरवापर थांबवावा आणि लाभार्थी निवडीसाठी सामाजिक-आर्थिक जनगणनेचा आधार घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, शासनाच्या धोरणात्मक त्रुटींमुळे अनुसूचित जाती घटक विकासापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या:
- अर्थसंकल्पीय तरतूद: SCSP निधीची तरतूद वार्षिक योजना खर्चाऐवजी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या (Total Budget) ११.८०% इतकी करण्यात यावी.
- लेखाविषयक पळवाट बंद करा: ‘लाडकी बहीण’ योजना किंवा रस्ते-वीज यांसारख्या सर्वसाधारण योजनांचा खर्च SCSP निधीतून दाखवून निधी वळवण्याचा प्रकार तातडीने थांबवावा. हा निधी केवळ विशेष कल्याणकारी योजनांसाठीच खर्च व्हावा.
- निवड निकषात बदल: वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी २००२ सालच्या कालबाह्य दारिद्र्य रेषेऐवजी केंद्र सरकारप्रमाणे २०११ च्या सामाजिक-आर्थिक जनगणनेचा (SECC-2011) आधार घ्यावा.
आंदोलनाचा इशारा:
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. “शासन केवळ कागदोपत्री निधी दाखवत असून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत तो पोहोचत नाही. जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी दिला आहे.
या आंदोलनाचे नियोजन सांस्कृतीक आघाडी जिल्हा अध्यक्ष बबन तांदळे जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय कांबळे, जिल्हा सरचिटणीस मा. नितेश कुमार दीक्षांत महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. छायाताई सातारकर हुपरी शहर अध्यक्षा सौ अर्चना कांबळे हातकणंगले तालुका उपाध्यक्षा रेखा भोरे , रुपाली पालखे शोभा कांबळे आणि तालुक्यातील पदाधिकारी करत आहेत. सोमवार सकाळी ११.०० वाजल्यापासून या लाक्षणिक उपोषणास सुरुवात होणार असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

