पुण्यात पँथर आर्मीच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

डॉ. राजेंद्रसिंग वालिया यांच्या हस्ते अनावरण; संविधानासाठी संघर्षाचे आवाहन
पुणे:
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना पुणे जिल्हा शाखेच्या वतीने सन २०२६ च्या भव्य दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडले. राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्रसिंग वालिया यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले होते.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. वालिया यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार समाजातील शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आपले संविधानिक हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रखर संघर्ष करावा. पँथर आर्मीच्या विचारधारेखाली होणाऱ्या आंदोलनांमध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.”
शौर्य दिनानिमित्त अभिवादन
दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानंतर, संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी १ जानेवारी रोजी ‘विजयस्तंभ’ पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) येथे जाऊन क्रांती स्तंभाला सलामी दिली. यावेळी शूर पराक्रमी योद्धांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण मेढे, प्रदेश कार्यकारी समिती प्रमुख महेंद्र वाघमारे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ज्योतीताई झरेकर, प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे, पालघर जिल्हाध्यक्षा आशा मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष महंमद जाफर शेख, पुणे शहराध्यक्ष जावेदभाई शेख, पुणे शहर संघटक अमिज तांबोळी, सचिव सीताताई शिरसागर, निलम केंगारे, नितीन घावट, समीर विजापुरे, अक्षय कदम, अभिषेक कांबळे, सुनील कुंबळे आणि जमीर मुल्ला यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

