कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची सावंतवाडीत कारवाई; एकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी): अमोल कुरणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात ‘राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने’ मोठी कारवाई केली आहे. माजगाव परिसरात सापळा रचून पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा आणि तस्करीसाठी वापरले जाणारे वाहन, असा एकूण ९ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी विभागात कडक नजर ठेवली जात आहे. या दरम्यान, एम.एच. ४६ पी ७५५२ क्रमांकाच्या होंडा सिटी वाहनातून मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने माजगाव येथे हे वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ४० बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी सचिन लक्ष्मण पाटील (वय २०, रा. ब्रह्मलिंग गल्ली, बहादूरवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) या युवकाला पथकाने जागीच ताब्यात घेतले.
या प्रकरणी सचिन लक्ष्मण पाटील (वय २०, रा. ब्रह्मलिंग गल्ली, बहादूरवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) या युवकाला पथकाने जागीच ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ४ लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचे मद्य आणि ५ लाख ५० हजार रुपये किमतीची होंडा सिटी कार असा एकूण ९ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आहे.
कारवाईचे तपशील:
- गोवा बनावटीचे मद्य: ₹ ४,२२,४००/-
- होंडा सिटी वाहन: ₹ ५,५०,०००/-
- एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ९,७२,४००/-
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशाने ही धडक मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, राजेश पाटील, शांताराम डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, कॉन्स्टेबल सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, योगेश शेलार आणि राहुल कुटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहील, असा इशारा उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

