१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात आशा व गटप्रवर्तक महिलांचा एल्गार; कामबंद आंदोलनाचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी:
केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी लागू केलेल्या ‘चार श्रमसंहिता’ मागे घ्याव्यात आणि आशा व गटप्रवर्तक महिलांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित देशव्यापी संपात राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन शंकर पुजारी यांनी केले आहे.
प्रमुख मागण्या आणि आक्षेप:
- श्रमसंहितांना विरोध: नव्या चार श्रमसंहितांमुळे असंघटित क्षेत्रातील कामगार, विशेषतः आशा व गटप्रवर्तक महिलांच्या हक्कांवर गदा येणार असून ही एक प्रकारची गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
- ऑनलाईन कामाची सक्ती व छळ: अँड्रॉइड मोबाईल आणि पुरेसा रिचार्ज न देताच ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे. काम न केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे हा फौजदारी गुन्हा असून, अशा धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘पॉश’ (POSH) कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित कमिट्या स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे.
- कायम कर्मचारी दर्जा: गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जा देऊन त्यांचे आरोग्य खात्यात कायम समायोजन करावे. तसेच आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीची तरतूद करावी. निवृत्तीनंतर किमान ५,००० रुपये पेन्शन मिळावे, ही मुख्य मागणी आहे.
- शहरी भागातील कामाचा ताण: ग्रामीण भागात १,००० लोकसंख्येला एक आशा असते, मात्र शहरी भागात १०,००० लोकसंख्येसाठी केवळ एकच आशा काम करत आहे. हा अन्याय दूर करून शहरांतही ग्रामीण भागाप्रमाणेच लोकसंख्येनुसार पुरेशी पदे भरण्यात यावीत.
तीव्र संघर्षाचा इशारा:
संघटनेने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते थेट मंत्रालयापर्यंत निवेदने पाठवली आहेत. वाढीव कामाचा ताण आणि अत्यल्प मोबदला यांविरुद्ध आता संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी सर्व आशा व गटप्रवर्तकांनी एक दिवसाचा संप करून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
”आशा व गटप्रवर्तक महिलांवर कामाचा ताण लादला जात असतानाच त्यांना धमकावून राबवून घेतले जात आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. १२ फेब्रुवारीचा संप ही आमच्या हक्काची लढाई आहे.”
— सुमन शंकर पुजारी (जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना)

