“भारतीय दलित पँथर” चे लढाऊ नेते, “नामांतर लढा” व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे, बौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून झटणारे अग्रणी नेते आणि अभ्यासु प्रभावी वक्ते प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे.
प्रा. अरुण कांबळे यांनी नामांतर लढ्याच्या माध्यमातून चळवळीला नवसंजीवनी मिळवून दिली. नामांतराचे दिवस हा त्यांचा ‘नवशक्ति’त प्रसिद्ध झालेला लेख. असाच एक माईलस्टोन. नव्या रक्ताला नवी प्रेरणा देणारा हा लेख…
” नामांतराचे दिवस “
-प्रा. अरुण कांबळे
दिनांक 10 एप्रिल 1977 रोजी औरंगाबाद येथे दलित पँथरच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी मराठवाडा विद्यापीठाचे नाव ‘डॉ. आंबेडकर विद्यापीठ’ असे ठेवण्यात यावे, असा ठरावही पहिल्यांदाच करण्यात आला. माझ्या पत्रकार परिषदेत हा आणि अन्य ठराव घोषितही करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न अशा रीतीने सुरू झाला. भडकल गेट येथील जाहीर सभेत त्याची वाच्यता जाहीरपणे झाली. याच अधिवेशनातील एका सत्रात प्राचार्य मनोहर भि. चिटणीस व प्रा. गंगाधर पानतावणे यांची व्याख्यानेही झाली. दलित पँथरची आवश्यकता या दोघांनीही प्रतिपादिली व मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे होणे योग्य आहे यासंबंधी समर्थ युक्तिवाद केले. नामांतर आंदोलनाच्या जन्मकाळचे हे दोन साक्षीदार!
वस्तुत: नामांतराचा प्रस्ताव हा इतर दहा प्रस्तावांपैकी एक होता. पण या प्रस्तावाला महत्त्व आले आणि महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील, समाजकारणातील तो एक महत्त्वाचा प्रश्न बनला. दलित चळवळ गेली १६ वर्षे याच प्रश्नाला केंद्रबिंदू मानून चालू राहिली.
सांगली जिल्ह्यातील करगणी नावाच्या छोटयाशा खेड्यात जन्मलेला मी ‘दलित पँथर’ सारख्या महाराष्ट्रात आणि देशात आंबेडकरी आंदोलनाचे पर्व निर्माण करणार्या, दलित सेना, दलित महासभा, दलित कृती समिती, बहुजन समाज पार्टी आदी संघटनांना, पक्षांना देशभर जन्माला घालणार्या वादळाचा अधिनायक बनलो हे आश्चर्यच! त्यावेळी माझे वय होते अवघे तेवीस वर्षे.
आई-वडील शिक्षक. आंबेडकरी विचारांचं बाळकडू लाभलेलं. शिकायला म्हणून प्रारंभी सांगलीला आणि नंतर एम.ए. साठी म्हणून मुंबईला आलो. शिक्षण आणि चळवळ एकत्रित सुरू. समजलं तेव्हापासून गाणं, लिहिणं, वाचणं सुरू. तक्क्यात सर्वांना ‘प्रबुद्ध भारत’ वाचून दाखवण्याचं काम माझे वडील मला कौतुकानं सांगायचे. त्यातून माझा पिंड पोसला आणि दलित साहित्याची-दलित पँथरची चळवळ सुरू झाली. तेव्हा माझा सूर मला सापडला.
पुढे, राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त करून मास मूव्हमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला हा निर्णय मान्य झाला नाही. आम्ही दलित पँथरच चालू ठेवणार असे घोषित करून कामाला लागलो. त्यावेळचे माझे साथीदार होते रामदास आठवले, एस.एम.प्रधान, उमाकांत रणधीर, दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, विठ्ठलराव साठे आदी. सगळ्यांनी मिळून अध्यक्षस्थानी माझी निवड केली. एस. एम. प्रधान उपाध्यक्ष, गाडे सरचिटणीस, आठवले संघटक, म्हस्के चिटणीस असे पदाधिकारी निवडले गेले आणि दलित पँथर पुनश्च उभी राहिली.
नामांतर आंदोलनाने दलित पँथरच्या पुनर्निर्मितीला संजीवनी दिली. मराठवाडयात विद्यापीठ कार्यकारिणीने नामांतराचा प्रस्ताव एक मताने संमत केला. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आमच्या शिष्टमंडळाला सांगितले की, लोकांकडून ही मागणी येऊ द्या, आम्ही तिचा आदर करू. झाले! १२ ऑगस्टला दलित पँथरचा विराट मोर्चा घोषित झाला. मुंबईतील एका वृत्तपत्राने या मोर्चाचे वर्णन केले. ‘मुंबई नगरीने असा मोर्चा आतापर्यंत पाहिला नव्हता (नवभारत टाइम्स).’ सरकारचे धाबे दणाणले. मुख्यमंत्री मुंबईत नव्हते. गृहराज्यमंत्री शरद पवार होते. मोर्चाची लोकशक्ती अफाट होती. लोकांनी ओव्हल मैदान व्यापून टाकले. पोलिसांचे डोळे फिरले आणि मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आला. स्त्रियांना, मुलांना, म्हातार्या-कोतार्यांना जीवघेणी मारहाण झाली. मीही मरता मरता वाचलो. अनिल गोंडाणे नावाच्या एका कार्यकर्त्यांने पोलिस अधिकार्याला पायात पाय घालून पाडले. मी लाठीचार्जच्या तडाख्यातून सुटलो. पोलिसांच्या हल्ल्याचे पहिले लक्ष्य मी होतो.
या लाठीचार्जनंतर मात्र चळवळ अधिक धारदार बनली. लोक पेटून उठले. आम्ही महाराष्ट्रभर ‘जेलभरो आंदोलन’ सुरू केले. सुरुवात नांदेड येथून झाली. मी व एस.एम.प्रधान यांच्या नेतृत्वाखाली १०,००० स्त्री-पुरुष तुरुंगात गेलो. हाच प्रकार लातूर-उस्मानाबाद व इतर ठिकाणीही झाला. मी स्वत: जातीने सर्व ठिकाणी या आंदोलनाचे नेतृत्व केले व तुरुंगात भरती झालो. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रिया फार मोठया प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
या आंदोलनाचा परिणाम म्हणून 27 जुलै 1978 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय नवनिर्वाचित मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला.
विधीमंडळात ठराव एकमताने संमत होण्याच्या आदल्या दिवशी कौन्सिल हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मला विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते. मराठवाडयातील आमदार नामांतरला पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रसंग बाका होता. आता काय होणार? मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलायला उभा राहिलो.
” डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा यांचं अतूट नातं आहे. बाबासाहेब दलितांचे नेते तर मराठवाडा हा कमालीचा दलित प्रदेश! आंबेडकरांनी या भागात पहिल्यांदा शिक्षण नेले. औरंगाबाद महाराष्ट्राची राजधानी करण्याची मागणी केली. निजामाचे संस्थान खालसा करण्यात पुढाकार घेतला. मराठवाड्याची अस्मिता आणि बाबासाहेबांचे नाव यांचे रक्तामांसाचे नाते आहे आणि म्हणून या विद्यापीठाचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे व्हावे. मराठवाडा हा शब्द काढावयाचा नाही. तो तिथे हवाच. हा ‘दुग्धशर्करा’ योग आहे. ” माझे सहकारी गाडे यांनी माझ्या भाषणाला पाठिंबा दिला. विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रा. सु. गवई यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले आणि त्यानंतर मराठवाडयातील आमदारांची मने बदलली. मुख्यमंत्री खूश झाले. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील हा पहिलाच निर्णय होता. त्यांनी मनापासून घेतलेला. या निर्णयाची यशस्विता ही त्यांच्या कारकिर्दीची यशस्विता होती. जर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर व्हावे असा प्रस्ताव मांडला नसता तर मराठवाड्यातील आमदारांनी नामांतर प्रस्तावाला पाठिंबा दिला नसता. ती काळ्या दगडावरची रेघ होती. आम्ही यशस्वी झालो. मराठवाड्यातील आमदार तयार झाले. प्रस्ताव संमत झाला.
प्रस्ताव संमत झाला त्यावेळी आम्ही सभागृहाबाहेर होतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा करीत होतो.
त्याचवेळी मराठवाड्यातून बातमी आली. नामांतर विरोधकांनी प्रतिआंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचे स्वरूप तीव्र होऊ लागले. रेल्वेचे रूळ उद्ध्वस्त झाले. सरकारी कार्यालयांची नासधूस झाली. सगळयात भयंकर म्हणजे दलितांच्या संसारांची राख-रांगोळी झाली. मराठवाड्यापायी जिल्ह्यांत सैतानाचा हैदोस सुरू झाला. खून-खराबा झाला. लढतालढता पोचीराम कांबळे व जनार्दन मेवाडे हे भीमवीर धारातीर्थी पतन पावले. त्यांच्या लढाईच्या रोमहर्षक कथा आजही डोळयात पाणी उभे करतात. सगळयात अधिक नुकसान नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत झाले. आंदोलकांनी कायदा हातात घेतला. बाबांचे फोटो फोडले, मुलांची पुस्तके फाडली. तांब्या पितळेची भांडी चेचली. मनुस्मृतीचे अधिराज्य सुरू झाले. ‘मराठवाडा’ पत्राने या काळात आगीत तेल ओतण्याचे कार्य केले.
या सगळया काळात आम्ही जीवाचे रान करून आपद्ग्रस्तांना मदत करीत होतो. पत्थराला पाझर फोडणारी दृश्ये होती. घरटी उद्ध्वस्त झाली. सगळे ‘फुकून’ टाकले. पण सर्वसामान्य जनतेने नामांतराची मागणी सोडली नाही. जिवाच्या निकराने ते म्हणत होते, ‘आमच्या जिवाची–संसाराची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण नामांतराचा निर्णय बदलू नका.’ ही जिद्द केवळ अतुलनीय अशीच होती.
सरकारी मदत चालू झाली. समतावादी पक्ष, संघटना, व्यक्ती फिरू लागल्या. नामांतर आंदोलनाचे स्वरूप या जळितानंतर व्यापक झाले. ते समतेचे आंदोलन झाले.
याच काळातील एक अनुभव सांगण्यासारखा आहे. मी सर्वत्र आपद्ग्रस्तांना भेटी देत होतो. असाच उदगीरला गेलो असताना नळदुर्ग या गावच्या भयंकर हल्ल्याची वार्ता ऐकून तेथे जाण्यासाठी तयार झालो. नळदुर्गचे विनायक बलाडे यांचे घर सुरूंग लावून पाडण्यात आले होते.
मी जायला निघालो आणि माझ्या गाडीपुढे एक माऊली आडवी पडली. उठायला तयार नाही. ‘मी अरुणभाऊंना नवदुर्गला जाऊ देणार नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे.’ मी निर्धारपूर्वक सांगितले, ‘आपल्या मंडळीचे संसार उद्ध्वस्त होत असताना, त्यांचे खून पडत असताना मी गप्प बसू शकणार नाही. मला तिथे जाऊन जातीयवाद्यांचा बंदोबस्त करणे भाग आहे. आपल्या मंडळींचे सांत्वन करणे आवश्यक आहे.’ माऊली हटेना. ती म्हणाली, ‘आपण लाखांचे पोशिंदे आहात. मी आपल्याला जाऊ देणार नाही. तुम्हाला ते ठार मारतील. आपण जाऊ नका.’
माऊली ऐकायला तयार नाही. मी माघार घेतली. पोलिस स्टेशनला गेलो.नळदुर्गचा वृत्तांत मागवला.पोलिस अधिका-याने सांगितले, नळदुर्गच्या आंदोलकांनी तुम्ही जाण्याच्या मार्गावर दगडांनी भरलेल्या बैलगाडया उभ्या केल्या आहेत. तुम्ही जाताच, तुमच्यावर वर्षाव करण्याचा त्यांचा बेत होता. माझ्या डोळयांपुढे कृष्णवर्णियांचे चित्र उभे राहिले. ‘लिंचिंग’. दगडाने ठेचून मारण्याची घोर शिक्षा! माझा बळी याप्रसंगी जाता तर त्या अज्ञात माऊलीने माझे प्राण वाचवले. असे प्रेम!
मराठवाड्यातील भीषण अत्याचारानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे स्वरूप बदलले. ते समतेचे लोकशाहीचे प्रतीक बनले. समतावादी दलितेतर त्यात मोठया प्रमाणात सामील झाले. प्रा. म. भि. चिटणीस, डॉ. बाबा आढाव, कॉ. शरद पाटील, अंकुश भालेकर, बाबा दळवी, बापूराव जगताप आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाची कक्षा व्यापक केली. मराठवाडयापुरती ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यार्थी-नागरिक कृती समिती’ याअगोदरच स्थापन झाली होती. ज्येष्ठ आंबेडकरवादी प्राचार्य म. भि. चिटणीस या समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे नेतृत्व लाभल्यामुळे या समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. एस. एम. जोशी, कॉ. चंद्रगुप्त चौधरी, बाबा दळवी, अहिल्या रांगणेकर आदी समाजवादी, साम्यवादी व डाव्या चळवळीतील नेत्यांनीही आता जनप्रबोधनाला सुरूवात केली होती. नामांतर आंदोलनात मराठवाडयातील दलितांच्या घरा-दारांची राख झाली, पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नवी समतावादी विचारांची पिढी उभी राहिली व समतेचे आंदोलन कितीतरी पुढे गेले. अंकुश भालेकर, बापूराव जगताप, फ. मुं. शिंदे, बा. ह. कल्याणकर, जवाहर राठोड आदी समतावादी तरूणांची नवी फौज लढण्यासाठी सिद्ध झाली. आणि मग आम्ही सर्वांनी मिळून 6 डिसेंबर 1979 ला मराठवाडा विद्यापीठ नामांतर सत्याग्रह जाहीर केला. दलित पँथर, मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यार्थी नागरिक कृती समिती, इतर संघटना यांनी सत्याग्रहाची हाक दिली आणि अक्षरश: लाखो लोक औरंगाबादला सत्याग्रहासाठी एकत्र आले. येत असताना लाखोंना वाटेत अटक झाली. औरंगाबाद शहराला युद्धछावणीचे स्वरूप प्राप्त झाले. अटक सत्र जोरात सुरू होते. मी वेषांतर करून औरंगाबाद शहरात पोहोचलो आणि आंदोलनाचे नेतृत्व केले. भडकल गेट आणि क्रांती चौक माणसांनी फुलून गेला होता. आम्हाला अटक करून ‘हर्सूल जेल’ मध्ये आणले. जेलचे स्वरूप पालटून गेले. मी तुरूंगाच्या बाहेर येऊन पत्रकारपरिषद घेतली आणि परत तुरुंगात सामील झालो. स्वातंत्र्योत्तर काळातील समतेच्या आंदोलनातील ६ डिसेंबर ७९ चा नामांतर सत्याग्रह हे तेजस्वी पर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सामील होऊन ठिकठिकाणी तुरूंगात गेले. सगळे समतावादी, भटके-विमुक्त, सर्व जाती-जमातींतील दलित, जातीच्या-धर्माच्या-पक्षाच्या भिंती भेदून या आंदोलनात सामील झाले. नामांतर आंदोलनाने समतेच्या चळवळीत अपूर्व इतिहास निर्माण केला. न भूतो असा ! या चळवळीचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल मी स्वत:ला धन्य समजतो. वस्तुत: नामांतर आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो कार्यकर्त्यांना, ज्यांची घरेदारे जळाली त्या दलित बन्धुभगिनींना, जे धारातीर्थी पतन पावले त्या भीमवीरांना ते श्रेय जाते. मी केवळ नेतृत्वाचा निमित्तमात्र धनी झालो.
या सत्याग्रहासाठी लाखो वाटांनी येत असताना माझे सहकारी मित्र बाबा आढाव, मोहन धारिया, जोगेन्द्र कवाडे रामदास आठवले, हुसेन दलवाई यांना वाटेत अटक झाली आणि वेगवेगळया तुरूंगात भरती केले गेले. समुद्राला उधाण आले.
दु:खाची बाब म्हणजे या सत्याग्रहात रा. सु. गवई, बॅ. खोब्रागडे, प्रकाश आंबेडकर, राजा ढाले, नामदेव ढसाळ आदी दलित नेते सहभागी झाले नाहीत याचे शल्य कायम राहिले.
नामांतराच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात हजारो मोर्चे निघाले. मुंबईत मंत्रालयावर निघालेले काही मोर्चे फारच प्रचंड होते. सत्याग्रह, जेलभरो आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, उपोषणे हे मार्ग लोक सर्वत्र अवलंबित होते. या आंदोलनाचे नेतृत्व अर्थातच दलित पँथरकडे होते. आमची जबाबदारी वाढली होती. रात्रंदिवस सभा, संमेलने, मेळावे, परिषदा असे कार्यक्रम होत होते. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडयात कार्यक्रमाची गर्दी असे. कार्यकर्ते अतिउत्साहात कार्यक्रम ठेवीत. अनेकदा न विचारता, निश्चिती न करता कार्यक्रम ठेवले जात व नंतर गळझटीला येत. काहीही करा पण कार्यक्रमाला चला. आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, लोकांसमोर जाता येणार नाही, वर्गणी गोळा केलेली आहे वगैरे. आमची ख्याती वेगळीच असे. दौर्यावर जाण्यासाठी पैसे नसत, ऐनवेळी कसेतरी पैसे गोळा करून जावे लागे. चालत्या गाडीत चढावे लागे. आरक्षण नसल्यामुळे रात्ररात्र जागरण करावे लागे. उभे राहून प्रवास करावा लागे. लागोपाठ जागरण व प्रवास यामुळे प्रकृतीवर परिणाम होई. कार्यक्रमांवरही त्याचा परिणाम होत असे. कार्यक्रमांना मात्र लोकांची तुफान गर्दी होई. लोक आमची तासन् तास वाट पाहत असत. कार्यक्रमांना हारांचे ढीग पडत असत. पण पोटात अन्न नसल्यामुळे भाषणाच्या वेळी बोलणे अवघड जाई. आवाजही बसलेला असे. कार्यकर्त्यांचाही यात काही दोष नसे. ते कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्रास घेत. नंतर आमची वाट पाहात. सगळया गाडया धुंडाळत बसत. आम्ही डब्यातून धडपडत उठत बाहेर आलो की, कार्यकर्ते घोषणा देत आमची मिरवणूक काढत. आधीच कार्यक्रमाला वेळ झालेला असल्यामुळे जेवणखाण करण्याचा प्रश्नच नसे. रात्री सभा उशिरा संपे. मग दोन-तीन वाजता डुलक्या घेत घेत जेवण होई. नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा, झोप किंवा लगेच पुढच्या गावचा कार्यक्रम. कधीकधी विनातिकिट सुद्धा प्रवास करणे भाग पडे. या सगळया चक्रातून जात असताना मला माझी प्राध्यापकाची नोकरीही सांभाळावी लागत असे, कारण ती माझी हक्काची भाकरी आणि स्वाभिमानाची चाकरी होती. इतरांची गत तर आणखीनच वाईट होती.
या सगळयाचा परिणाम म्हणून मी आजारी पडलो, क्षयाची बाधा झाली काय असे वाटण्याइतपत प्रकृती बिघडली. इंजेक्शनचा कोर्स घेतला आणि पुन्हा कामाला लागलो. उसंत घ्यायला वेळ नव्हता. त्यातच मुख्यमंत्र्याच्या बैठकी, अत्याचारग्रस्तांची गार्हाणी, मदतीसाठी अर्ज वगैरे. नेतृत्वाचा मुकूट डोक्यावर होता. काटे बाकीच्यांना दिसत नव्हते. अनेकदा प्रश्न पडे, आपण राजा आहोत की पोतराजा! पण सभा, संमेलने गर्दी यांच्या धुमश्चक्रीत एवढा विचार करायला वेळ कुठला? लोकांचे प्रेम तर अपरंपार. ओवाळण्यासाठी आया-बहिणींच्या रांगा. आम्हाला अमान्य असले तरी सहन करावे लागे. चहा प्यायला जाणे हा एक कार्यक्रमच असे. सगळयांच्या घरी जावे लागे. मी तर चहाही न पिणारा. त्यामुळे मला नुसतेच जाऊन बसावे लागे. परंतु लोकेच्छेचा आदर करावा लागे. त्यांचे प्रेम तर असे की, त्यांच्या कथांचा संग्रहच करावा लागेल. जगातील फार थोडया नेत्यांच्या वाट्याला असे प्रेम आले असेल. माझ्या अठरा विश्व दरिद्री समाजाने असे प्रेम मला-आम्हाला दिले की, त्याची उतराई कधीही करता येणार नाही. प्रेमाची नशा आम्हालाही चढत असे. त्याचमुळे असेल, मी मान कधीही खाली झुकवली नाही. बाणा ताठ राहिला. मोडलो पण वाकलो नाही. नामांतराच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही. दिल्लीहून पंतप्रधानांपासून निरोप आले. पण आमिषाला बळी पडलो नाही. हा स्वाभिमान कोठून आला? ही सूर्यशक्ती कोठून मिळाली, याचा आज विचार करतो तेव्हा समजते, हे बळ बाबासाहेबांच्या विचारांपासून, त्यांच्या व्यक्तिमत्वापासून मिळाले आणि त्याला पीळ बसला तो माझ्या अर्धपोटी, नागडया- उघडया बांधवांच्या प्रेमाचा. त्यांची ही निष्ठा, प्रेम, भाबडेपणा आमच्यातील प्रामाणिकपणाला कारणीभूत ठरले. भ्रष्टाचार जाळून टाकण्याचे सामर्थ्य त्यात होते. त्यामुळे आम्ही अधिकच प्रदीप्त झालो.
मराठवाड्यातील हिंसाचारानंतर पंतप्रधान व सर्वपक्षीय नेत्यांना यासंबंधीची माहिती देण्यासाठी मी स्वत: दिल्लीला गेलो. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या भेटीचा सविस्तर वृत्तांत मी अन्यत्र कथन केला आहे. तो गंमतीदार आहे. श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळी विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी आमची चांगली विचारपूस केली. आगतस्वागत केले व मराठवाड्याचा दौरा करण्याची इच्छाही व्यक्त केली. बाबू जगजीवनराम हे त्यावेळचे पंतप्रधानकी गमावलेले दलित नेते. बाबूजींनी त्यावेळी असे उद्गार काढले, ‘आप लढो, हम सत्तामें रहेंगे ’. यशवंतरावांचा अनुभव फारच वेगळा आला. मी दिल्लीत गेलो की यशवंतरावांना अवश्य भेटत असे. यशवंतरावांनी नेहमीच्या पद्धतीने माझे स्वागत केले. साहित्यिक घडामोडींसंबंधी चर्चाही केली. मराठवाड्यातील हिंसाचाराबद्दल बोलणे सुरू झाले तेव्हा अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती असलेली ध्वनिफित मी त्यांना ऐकवली. दलितांच्या मदतीला धावून जाणार्या नांदेडच्या महाजन पाटलाची हकीकत ऐकून यशवंतराव भारावले. त्यांच्या डोळयातून अश्रूधारा वाहिल्या. माझा हात धरून ते म्हणाले, ‘आमचीही स्थिती महाजन पाटलांसारखी आहे. मराठवाड्यातील लोक माझेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.’ यशवंतरावांचे ते पाणावलेले डोळे आजही माझ्या डोळयांसमोर दिसताहेत.
एक प्रसंग आठवतो. नामांतराच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी नागपूरला एक बैठक बोलावली. बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. मी बोलायला उभा राहिलो. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे होते, आम्हाला थोडा वेळ द्या. नामांतर करतो. आम्ही वेळ द्यायला तयार नव्हतो. लोकशाही प्रथेप्रमाणे ठरावाची अंमलबजावणी आताच करा, अन्यथा ती होणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली होती. स्वत: अण्णा-एस.एम. जोशी मला म्हणाले, ‘अरुण, शरदला थोडा वेळ देऊ, त्याच्या मनात नामांतराचे आहे.’ मी बधलो नाही. अखेर मुख्यमंत्री शरद पवारांनी मला स्वत: चिठ्ठी पाठवली. त्यावर त्यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिले होते… अमुकअमुक तारखेपर्यंत नामांतर करतो. तोपर्यंत आंदोलन करू नका. मला वेळ द्या.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला, फाटक्या माणसाला हस्ताक्षरात पत्र लिहून वेळ द्या, असे म्हणतो हे सामर्थ्य आंदोलनातून निर्माण झाले. (मुख्यमंत्र्यांनी पत्रात दिलेल्या तारखेच्या तीन दिवस अगोदर त्यांचे सरकार बरखास्त झाले व नामांतराचे भिजत घोंगडे तसेच राहिले हे अलाहिदा!)
अशा आंदोलनाचा मला अभिमान वाटतो हीच माझी कमाई! हीच दौलत! यापुढे कोणत्याही पदाची मला कधीच किंमत वाटली नाही. पुढेही वाटणार नाही.
प्रा. अरुण कांबळे
