रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील वेर्णा-कारवार दरम्यान विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून इलेक्ट्रिक इंजिनची दुसरी चाचणी चार दिवसांपूर्वीच घेण्यात आली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या याच टप्प्यातील कामांसाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी आणखी १५ दिवस म्हणजेच २ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.
या मार्गावरून दोन्ही दिशेने धावणाऱ्या रत्नागिरी-मडगाव १०१०१ आणि १०१०२ या गाड्या यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. त्या आता आणखी १५ दिवस रद्द राहणार आहेत. रोहा-रत्नागिरी हा रेल्वे मार्ग विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी सज्ज झाला आहे. परंतु जोपर्यंत संपूर्ण मार्ग विद्युतीकरणासाठी पूर्ण होत नाही, तोपर्यंत डिझेल इंजिनचा वापर केला जात आहे. सध्या या मार्गावर मालगाड्या विद्युत इंजिनवर धावत आहेत. रत्नागिरी-वेर्णा दरम्यान मार्गातील टनेलमधील विद्युत यंत्रणा तपासली जात आहे. त्यासाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी आणखी १५ दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे.