रायगड येथे होणार १०वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

वारकरी साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे १०वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २२ आणि २३ जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सांगडेवाडी येथील हॉटेल नोव्हाटेल इमोजीक येथे होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.विठ्ठल पाटील यांनी दिली.

दरम्यान, या संम्मेलनाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. या संम्मेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. आशिष महाराज, खा.श्रीरंग आप्पा बारणे, आ.महेंद्र थोरवे उपस्थित राहणार आहेत. २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता वारकरी दिंडीने संमेलनाचा शुभारंभ होणार असून, यावेळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष ह.भ.चकोर महाराज बाविस्कर हे संमेलनाचे नूतन अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर यांच्याकडे सूत्रे प्रदान करतील. यांनतर वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींचा विठ्ठल पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

ह.भ.प.एकनाथ महाराज कोष्टी आणि मराठी दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांना विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने भक्त पुंडलिक संस्थानाला चांदीचा रथ प्रदान करण्यात येणार आहे. ह.भ.प. गाथा तपस्वी रामभाऊ महाराज लबडे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात दुपारी १२ ते २ या कालावधीत साधू परंपरा आणि संत परंपरा या विषयावर चर्चा होइल तर २३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० या दरम्यान महादेव बुवा शहाबाजकार यांच्या अभंगवाणीचा आस्वाद घेता येणार आहे. तर साडेबारा ते दोन या वेळेत सांगता समारंभ कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे.