मुंबई: मुंबईतील ताडदेव परिसरात एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून ; २९ जण जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांचा नायर रुग्णालय तर एका व्यक्तिचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गवालिया टँक परिसरात कमला इमारतीतल्या १८ व्या मजल्यावर सकाळी ही आग लागली.
चिंचोळ्या गल्लीमुळं अग्निशमन दलाच्या जवानांना याठिकाणी पोहोचण्यात अडचणी आल्या. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी ही आग पूर्णपणे विझवण्यात आली, असं मुंबई महापालिकेने सांगितलं.
मितेश मीस्त्री, मंजूबेन कंठारिया, पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघांचा मृत्यू झाला तर हंसा चोक्सी, फालगुणी चोक्सी, धावेल, यश चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनिषा सावंत, अंकिता चौधरी, धनपत पंडित, गोपाळ चोपडेकर, स्नेहा चोपडेकर, वेदांगी चोपडेकर, मीना चव्हान, प्रतिमा नाईक, कल्पना नाडकर्णी, स्मीता नाडकर्णी, रुदया चोपडेकर, मनिश सिंग, मंजू खान्ना अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.