वर्ध्यात ४० फुटांवरून कोसळली कार; मेडिकलच्या ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

वर्ध्याच्या सेलसुरामध्ये काल मध्यरात्री एक भरधाव कार पुलावर तब्बल ४० फुटांवरून नदीत कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत विद्यार्थी सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांच्या एकुलत्या एक मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या अपघाताची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अपघातातील मृत विद्यार्थी हे आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी यवतमाळच्या देवळीवरून वर्ध्याला एक्सयू कारने येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून ४० फुटांवरून नदीत कोसळली. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही समावेश आहे. या अपघातातील मृतांची नावे-
निरज चव्हान (२२) रा. गोरखपुर,उत्तरप्रदेश, अविष्कार विजय रहागडाले (२१ )रा.गोंदिया,नितेशसिंग
(२५)रा.ओडीसा,विवेक नंदन (२३), रा.गया बिहार आणि प्रत्युशसिंग हरेन्द्रसिंग(२३) रा.गोरखपुर, उत्तरप्रदेश, शुभम जयस्वाल (२३) रा. दिनदयाल उपाध्याथ, नगर उत्तरप्रदेश पवनशक्ती (१९) रा.गया बिहार अशी आहेत. पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

सावंगी मेघे मेडिकल कॉलेजचे विशेष कार्यकारी अधिकारी उदय मेघे यांनी याबाबत सांगितले की, ” मित्राचा वाढदिवस साजरा करून लवकर परत येऊ अशी माहिती विद्यार्थांनी हॉस्टेल प्रशासनाला दिली होती.पण विद्यार्थी वेळेत आले नसल्याने आम्ही त्यांना आणि त्यांच्या पालकांना कळवले.आम्हाला रात्री २.३० वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. यातील दोन विद्यार्थी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होते,तर विद्यार्थी इंटर्न होता. या सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे” दरम्यान, खासदार रामदास तडस यांनी नुकतीच घटनास्थळी भेट दिली. या घटनेची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. ही घटना दु:खद असून मृत पावलेल्या मुलांच्या कुटुंबाच्या आणि आमदार रहांगडाले यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.