झाडं जात्यात अन् माणसं सुपात आहेत”

झाडं जात्यात अन् माणसं सुपात आहेत”

आरे’मधील कारशेडबाबत शिवसेना नेते सत्तेत असताना काय भूमिका मांडत होते हे समजून घेण्यासाठी दि.१६.१०.२०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख नक्की वाचा.

“झाडं जात्यात अन् माणसं सुपात आहेत”

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
“भट बोकड मोठा” या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

२०१४ ला आणि मागिल लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन, काळा पैसा अन् विकासाच्या नावाची धुळफेक करून संघप्रणित भाजप शिवसेनेचे मनुवादी सरकार सत्तेत आले आणि शेतकरी शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि मुली यांना जिवन जगण्यास मुश्किल तर शिक्षण आणि अर्थव्यवस्थेचा बो-या वाजला. काही दिवसांपूर्वी याच मनुवादी विकृतींनी कोट्यावधी वृक्षांची लागवड करण्याचं स्वप्न उराशी बाळगून कोट्यावधी रुपयांची नासधुस केली आणि त्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तेव्हा त्यांना माफी मागायला लावून भ्रष्टचारावर बोलणारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूनच केला असेही म्हणता येऊ शकते. झाडे लावण्याच्या नादात भ्रष्टचार करणारे हेच सरकार आरे येथिल झाडांची रातोरात कत्तल करतं तेव्हा एक हिंदी गाणं आठवतं ‘हारे हारे हारे हम तो दिलसें हारे’ पण त्यात थोडासा बदल करून म्हणावेसे वाटत की, ‘आरे आरे आरे हम तो पेड से हारे’ म्हणूनच आज ‘झाडं जात्यात अन् माणसं सुपात आहेत’ हे आमच्या बहुजन समाजाने विसरता कामा नये.
मुंबई उच्च न्यायालयाने आरेमधील झाडे कापण्याला परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी सरकारनं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरेतील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली. आरे वाचवा मोहिमेतील आंदोलकांना ही माहिती मिळताच मोठ्या संख्येनं आंदोलक जमले त्यानंतर आंदोलकांचा पोलिसांसोबत संघर्ष सुरु झाला. अंधा-या रात्रीचा फायदा घेऊन प्रशासनाने झाडे कापायला सुरूवात केली. त्यावेळी एक गोष्ट आठवते की, आमच्या खेडेगावातील वडीलधारी मंडळी सांगतात की, ‘रात्री झाडाला हाथ लावू नको झाडे झोपलेली असतात’ असे सांगणारी आमची संस्कृती, मात्र प्रशासनाकडून रात्रीचं झाडाची कत्तल होतेय तेव्हा हे सरकार गप्प का ? म्हणजेच ‘उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे, कर्तव्याचे माप’ जनसामान्य पर्यावरणप्रेमी लोकांकडुन आरेमधल्या वृक्षतोडीला जोरदार विरोध केला जातोय हे योग्यही आहे. आरेमधील झाडे वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पहावयास मिळतो. आरे परिसरात जमावबंदी, पोलीस व्हॅनमधून आंदोलकांच्या ‘सेव्ह आरे’च्या घोषणा देत होते. म्हणजेच जे सरकार झाडे लावण्यासाठी कोट्यावधी रूपयांची उधळत करते तेच सरकार मात्र झाडं वाचवण्यासाठी काहीच करताना दिसत नाही. तेव्हा यावर पर्यावरणप्रेमी, राजकीय नेते आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही विरोध दर्शविला आणि विरोध दर्शविणे योग्यही आहेच त्यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही आरेतील झाडे कापण्याला संदर्भात एक ट्विट केलं की, कापा… सगळी झाडं कापा. नंतर बसा बोंबलंत, त्यासोबतच जेवढी झाडं कापतायत तेवढीच परत लावणार का ? असा प्रश्नही त्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला विचारला आहे.
वृक्ष प्राधिकरणाने महानगरपालिकेच्या वेबसाइटवर ४ ऑक्टोबर रोजी आदेशाची प्रत अपलोड केली आहे. त्यामुळे झाडे कापण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मिळणे अपेक्षित होते, मात्र एमएमआरसीएलने त्याआधीच झाडे कापायला सुरुवात केली. त्यामुळे स्थानिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी कारशेडच्या परिसराच्या बाहेर लावण्यात आलेल्या गेटवरच ‘आरे वाचवा’ ची घोषणाबाजी केली. झाडांची झालेली कत्तल यावर सर्व स्तरातून निषेध होतो आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर एक व्यंगचित्र रेखाटून सरकारने दिलेल्या आदेशाचा निषेध करण्यात आला. त्या व्यंगचित्रात आरे परिसरातले तोडलेले वृक्ष दाखवण्यात आले. वृक्ष तोडीतून जे झाडांचे बुंधे, झाडांचे कापलेले भाग आणि त्याची तयार झालेली मेट्रो आरे मधून जाताना दाखवून आSSरेS मेट्रो… असं या मेट्रोच्या व्यंगचित्राच्यावर लिहिण्यात आलं आहे. तर ‘भाजपा आणि शिवसेनेच्या मतदारांनी आरेच्या जंगलासाठी मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे’, ‘शिवसेना आणि भाजपाला मत देण्याच्या तयारी असणाऱ्या मुंबईकरांनी आरेबद्दल मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे’ या वृक्षतोड करण्याच्या निर्णयाला राज्यातील युती सरकारला जबाबदार आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना भाजपाला मत देण्याच्या तयारीत असलेल्यांना आरेसाठी आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे ट्विट करणं तसेच आंदोलन करत असल्याचं नाटकं करणं बंद करा. जे बोलता ते करुन दाखवा,’ असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी म्हटले. तर केंद्रात, राज्यात व मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आरे प्रकरणावर म्हणतात की, शिवसेनचे नव्याने सरकार आल्यावर ‘आरे’ कॉलनीतील झांडांच्या खून्यांना पाहून घेऊ. मग ठाकरेंना पश्न विचारावा वाटतो की, आता महाराष्ट्रात काय नवाज शरिफांची सत्ता आहे का ?उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नसताना पण उध्दव ठाकरे म्हणतात की, आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार आहे. त्यापुढेही ते म्हणतात की, आरे कॉलनीच्या मुद्द्याकडे लक्ष देणार असून आरे कॉलनी आमच्यासाठी महत्वाचं असल्याचं ते सांगतात.
तर त्यांचेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेच्या डोळ्यावर एक कपडा बांधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसंच त्यावर ‘आरे हे जंगल नाही’ असंही नमूद करण्यात आलं आहे. या चित्रातून राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. भाजप सोबत सत्तेत राहुन भाजपलाच विरोध करणारा शिवसेना पक्ष आणि त्यांचे राजकारणी म्हणजे ‘घरका भेदी’ किंवा आणि त्यांची निती म्हणजे ‘कुपनंच शेत खाते’ याप्रमाणे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आरे प्रकरणावर म्हणाले की, ‘मेट्रो ३’साठी रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवणं हा लज्जास्पद आणि किळसवाणारा प्रकार आहे. मग आदित्य ठाकरेंना पश्न विचारावा वाटतो की, मुंबई महानगरपालिकेत सत्ता त्यातील प्रशासन कोणाच्या इशा-यावर चालते, मग तुम्हीही हा किळसवाणा प्रकार करण्यास कारणीभूत असावे का ? तसेच ते म्हणतात की, झाडे तोडण्यासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांना ‘पाकव्याप्त काश्मीर’ मध्ये पाठवा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ड्युटी द्या,’
रात्रीच्या अंधारात, पोलिसांच्या बंदोबस्तात आणि कावेबाजपणे पूर्णत्वास नेला जातोय. प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली होत असलेल्या मेट्रोसाठी झाडे आणि वन्यजीवसृष्टी धोक्यात आणली जातेय, हे विचित्र आहे. अहंकाराची ही लढाई ‘मेट्रो ३’ च्या हेतूला देखील हरताळ फासणारी आहे. तसेच आम्ही सत्ता आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणार तर मग देशात महाराष्ट्रात आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आताही आहे हे पेंग्विन मेल्यानंतर रडणा-या आदित्य यांना माहीत नाही का ? ‘निवडणूक तोंडावर असताना पोलिसांना अतिरिक्त ड्युटी का लावली गेली आहे ? तीन हजार पोलीस आरे परिसरात तैनात करण्यात आले आहेत. त्यांना हा अतिरिक्त ताण नाही का ? जेव्हा ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएन मध्ये जातात किंवा देशाचं शिष्टमंडळ यूएनला जातं तेव्हा आपण आकडे सांगतो की आम्ही एवढी झाडं लावली, तेवढी झाडं लावली. १३ कोटी झाडांचे होर्डिंग्ज आपण कशासाठी लावले आहेत ? या सगळ्या भूमिकेला काय अर्थ आहे ? सत्तेत असणा-या शिवसेना नेत्याचा मुलगा आदित्य हा नेमका कोणाला प्रश्न विचारतोय हेच समजत नाही.
जेव्हा शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार भरडतोय आणि लोकांना नविन झाडे लावायच्या नादी लावून कोट्यावधी रुपयांची उधळण करून मलीदा चाखणारे लोक हे सत्तेतीलच आणि शेतकरी शेतमजूर यांच्या प्रश्नांवर दिंडोरा पिटणारेही लोक सत्तेतीलच कसे काय असू शकतात. तेव्हा आता तरूणांनी नव्याने एकदा विचार करून येणा-या काळात योग्य आणि लायक उमेदवारांना मत द्या कारण आज ‘झाडं जात्यात अन् तुम्ही माणसं सुपात आहात’ हे तरी विसरू नका अन्यथा संपाल.

भक्तांनो गायी वाचवण्यासाठी गोरक्षक बनु शकता तर,
वृक्ष वाचवण्यासाठी वृक्षरक्षक बनायला काय हरकत होती ?

टिप – सदरील लेख यापुर्वीच खालील दैनिकांमध्ये प्रकाशित झालेला आहे.
दि. १६.१०.२०१९ – दै. पुण्य प्रताप, जळगाव
दि. १६.१०.२०१९ – दै. लोकांकित, ठाणे
दि. १६.१०.२०१९ – दै. कुलस्वामीनी संदेश, लातूर
दि. १६.१०.२०१९ – दै. युवा छत्रपती, लातूर

नवनाथ रेपे लिखित “भट बोकड मोठा” हे पुस्तक पोस्टाने घरपोहोच मिळेल.
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *