राजधानी नव्हे,हे तर क्रांतीसिंहांचे प्रति सरकार
(कॉ खा नाना पाटील, विनम्र अभिवादन )
…. सर्वांना विसरून जीवन जगणारा समाज आता निर्माण होतो आहे. त्यास इतिहासाचे व कृतज्ञ स्मरणाचे वावडे आहे.तरीही अल्प लोक उचीतपणे इतिहासातील नायकांचे स्मरणच नव्हे तर कार्यप्रेरणांसाठी वाचन,चिंतन करीत असतात. ते वर्तमानातील सरंजामी व अत्याचारी,कृतघ्न राजकारणाचे विश्लेषण करीत असतात. समाजाच्या जाणिवा जागवत असतात.मुळात जाणिवा ही एक प्रगल्भता असते.ती कृतज्ञता असते.तो इतिहासाचा घेतलेला शोध असतो.तरीही इतिहासातून कायम घ्यावयाचा बोध असतो.
तीन ऑगस्ट हा क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. राष्ट्रभक्तीने पेटलेल्या, सातारा जिल्ह्यातील,बेचाळीसच्या लढ्यातील,प्रतिसरकारच्या महानायकाचा हा जन्मदिन केवळ लाल सलाम म्हणून साजरा न करता, प्रतिसरकारचा नेमका इतिहास काय होता ?हे समजून घेतले तर, त्यांच्या निस्सीम राष्ट्रभक्तीच्या व त्यागाचे महत्व समजावून घेण्यास मदत होइल. वर्तमानात समाजाने कसे जगावयाचे याचे अल्पसे भान यातून येऊ शकते.म्हणून क्रांतिसिंह यांचे हे गौरवगान पुढीलप्रमाणे शब्दबद्ध करीत आहे.
1942 चा लढा व ऑगस्ट महिना आणि सातारा जिल्हा हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील दीर्घकालीन वंदनीय इतिहासाचे क्षण टिकून राहणार आहेत. तत्कालीन डिफेन्स ऑफ इंडिया रूल 56 नुसार, नागरिकांना जाहीर सभा घेण्यास व फेऱ्या काढण्यास परवानगी नव्हती.10 ऑगस्ट,1942 रोजी, सहा वाजता साताऱ्यात गांधी मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत गणपतराव तपासे आणि इतर सहकाऱ्यांसह दोन हजार नागरिकांची सभा घेण्याचा एक प्रयत्न केला गेला होता.ती सायंकाळची सहा वाजताची वेळ होती.साताऱ्यात यादव गोपाळ भेटीतून 500 विद्यार्थ्यांची थेरी सिटी पोस्टाकडे येऊ लागली होती.पोलिसांनी ती सहा पंचेचाळीस वाजता, पांगवण्यासाठी मोती चौकात प्रयत्न केले. तरीही त्या फेरीची संख्या जवळपास पाच हजार झाली.पुढे त्या फेरीत “”गोऱ्यांनो, भारतातून चालते व्हा”” “”महात्मा गांधी की जय” “अशा घोषणांनी रान उठवले होते.सातारा जिल्ह्यात10 ऑगस्ट, 1942 पर्यंत जवळपास 23 ठिकाणी हरताळ पाळण्यात आले होते. 9 आगस्ट ला तर 167 फेऱ्या सातारा जिल्ह्यातून विविध गावातून काढण्यात आल्या होत्या. प्रखर राष्ट्रवाद यांची प्रचिती व भक्ती नागरिकांच्या मनामध्ये वाढत होती “”करेंगे या मरेंगे “”या घोषणा घुमत होत्या. याचे नेतृत्व करणारे प्रतिसरकारचे अनेक सैनिक, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काशिनाथ देशमुख,विठोबा घाडगे, कदम,न्यानोबा कुदळे, तुकाराम बलभीम कुलकर्णी,लक्ष्मण गणेश पाटील दत्तू बळवंत,के डी पाटील, नाना पाटील, निवृत्ती आकाराम पाटील, पांडू मास्तर, रंगराव विठ्ठल पाटील,रामचंद्र चंदू पाटील,वसंत दादा पाटील,स्वामी रामानंद भारती ,गौरीहर सिंहासने,यशवंत कृष्णा सोहनी,शामराव अण्णा निकम,पांडुरंग विठ्ठल भोसले, बाबुराव गंगाधर चिकटे, चरणकर, आर्यन जोशी, गणपत रामचंद्र पाटील, बापू कचरे यांच्या संघटित प्रयत्नातून सातारा शहरात सन 1943 मध्ये फेर्या, सभा,भंडारे,कीर्तने,कुस्त्यांची मैदाने,गावच्या यात्रा,साप्ताहिक बाजार असे अनेक कार्यक्रम घेऊन,ब्रिटिशांच्या विरुद्ध नागरिकांना चेतवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत होता. पोलीस मारहाणीत माधव देसाई या कार्यकर्त्याचा मृत्यू जाहला होता.तो दिन साजरा करण्यात येत होता त्यासाठीच सभा घेतल्या जात असत.या सभेमध्ये दहापासून दोन हजार पर्यंत इतके नागरिक सहभागी होत असत. गांधीजी काय म्हणतात, हे ऐकण्यासाठी या स्वातंत्र्य गीताकडे व हाकेकडे आकर्षित होत,जिल्ह्यातील नागरिक गोळा होत असत. ते विचारत असत, गांधीजी अधिवेशनात काय म्हणाले?ते कसे दिसत होते?ते म्हातारे झाले आहेत काय? त्यांना का पकडले आहे हो? असे विचारताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येत असे.गांधीजींच्या जीवनाविषयीची सातारकर यांच्या मनातील ही आसक्ती 1942 च्या लढ्यातील फार मोठे स्वातंत्र्य पाथेय आहे. तो भक्तिभाव आहे. म्हणून तर पुढे गांधींच्या,” प्रत्येक भारतीय हा स्वतंत्र आहे आणि या आणीबाणीच्या प्रसंगी तो करेल किंवा मरेल” या सांगण्याने देशातीळ लोकांची माथी भडकत गेली. गांधी हेच करीत असत.हीच राष्ट्र प्रेमाची ज्योत इथे त्यांनी संदेशातून पेट विली होती. सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते लोकांना सांगत असत.शेतसारा भरू नये.सार्वजनिक दंड देऊ नये.पोलीस तलाठी व पोलीस पाटील यांना एकाकीपणाने विरोध करावा.त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे.हे त्यांनी केले नाही तर, त्यांना संपवून टाकावे. सरकारी दस्तऐवज,इमारती, रेल्वे, टेलिग्राम, पूल नष्ट करावेत. तालुका कचेऱ्यांवर हल्ले करावेत. सरकारी कार्यालय व दारूची दुकाने यांच्यापुढे निदर्शने करावीत.या प्रकारचे असंतोषाचे विचार वाढत होते.त्यातूनच सतत घोषणा देण्यात येत होत्या. गांधीजींचा विजय असो, पंडित नेहरूंचा विजय असो, मातृभूमीचा विजय असो. काँग्रेसचा विजय असो. साम्राज्यवाद नष्ट करा.सरकारी नोकरी वर बहिष्कार टाका.युद्ध पत्रके फाडून टाका.या घोषणांनी सातारा जिल्ह्यातील वातावरण विरोधाच्या टोकाला गेले होते. राष्ट्रीय गाणी व घोषणाही चालू होत्या.यातूनच साताऱ्यात तेव्हा शंकरराव निकम हे शाहीर पोवाडे गात असत.शेलार मामा यांचे कीर्तन,राष्ट्रीय कीर्तने होत असत.आणि सर्व वातावरण भारावलेले तयार होत होते. अशातच, मोर्चेकऱ्यांचे अटकसत्र सुरू झाले.24 ऑगस्ट 1942 ला, कराडच्या तहसीलदार कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी बाळकृष्ण अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता, वीस मुले जमली होती.ती घोषणा देऊ लागली. वकिलांनो,कोर्टाचे काम थांबवा.नोकरांना आपले नोकरी सोडा.अशा घोषणा मुले देऊ लागली.आणि कोर्टाचे कामकाज थांबले.अशाप्रकारे कराडमधील शिरगाव,इंदोली,काले,तांबवे, उंडाळे फेऱ्या होऊ लागल्या होत्या. पोलीस अधिकारी सभेवर झडप घालत होते. कराडच्या तहसीलदार कार्यालयासमोर, मोर्चातील दाजी मुळे,पांडुरंग नाना देशमुख यांना पोलीसानी बदुकीच्यागुस्ताने जखमी केले होते.त्यावर नागरिकांनी दगडफेक सुरू केली. ही घटना असंतोष पेटवून गेली.या मोर्चासमोर बाळकृष्ण अनंत पाटील म्हणाले, “आपला मोर्चा यशस्वी झाला आहे.आपण जिंकलो आहोत. आपण आता घरी जा.याक्षणी आपण इतके बलवान आहोत की,आपणाला अटक करून घ्यायचे आहे. त्यांना आपण अटक करून घेऊ शकतो.परंतु हा आपल्या मोर्चाचा उद्देश नाही.गांधीनी आपणास करा किंवा मरा असे सांगितले आहे. तुम्ही एखादी हिंसक कृती केल्यास,ती महात्मा गांधींना आवडणार नाही.त्यांना मनस्वी दुःख होईल.म्हणून शांतपणे घरी जा,असे सांगून मोर्चा पांगविला.
मुळात सातारा जिल्ह्यातील, अनेक गावातील, ऑगस्ट 1942 च्या,परळ मध्ये पाटणचा मोर्चा मुळशी गावची घटन, तासगावचा मोर्चा, विटाचा मोर्चा, वडूजचा मोर्चा या स्वातंत्र्याच्या वेदीवरील बलिदानाच्या गाथा आहेत. तेव्हाचा संयुक्त सातारा तेव्हा इस्लामपूरचा मोर्चाही खूप गाजला होता.त्याचा इतिहास खूप मोठा आहे.शाळेचा मोर्चा याचबरोबर प्रति सरकारने केलेल्या घातपाती कारवायासुद्धा विसरता येणार नाहीत. ताकारी ते बिसूर या रेल्वे मार्गावर 12 ऑगस्ट 1942 रोजी, पहाटे एक वाजून वीस मिनिटांनी, टेलिग्रामच्या तारा तोडण्याचा एक धाडसी प्रयत्न झाला. रेल्वेच्या रुळाच्या फिश प्लेट काढण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातून मद्रासला जाणार्या सदर्न मराठा रेल्वेला 68 वेळा घातपात घडविण्यात प्रतिसरकारचा हात होता.हा सर्व ब्रिटिशांच्या विरुद्धचा राग होता,हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सध्याच्या नागरिकांना ऑगस्ट क्रांतीचा लढा हा किती मोठा आहे, याची कल्पना येणार नाही. नांदे रेल्वे स्टेशन,विश्रामबाग रेल्वे स्टेशन,इतर अनेक रेल्वे स्टेशन यावरील प्रतिसरकारच्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कारवाया,घातपात कृत्ये,विध्वंस, तयार केलेली दहशत,बंद पाडलेले कामकाज हा सातारच्या राष्ट्रभक्तीचा वेगवेगळा शोर्यसंपन्न प्रयत्न होता हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाना पाटील यांचे साथी क्रांतिवीर नागनाथ नायकवडी,जीडी बापू लाड यांनी तर स्पेशल ट्रेन लुटली,याचा इतिहास माहीत व्हायला हवा. 6 जून 1943 रोजी, कुंडल ते मिरजवरून जाणारी पे स्पेशल ट्रेन हिच्याबद्दल चर्चा करण्यात आले.नियोजन केले गेले होते. तिच्यात स्वातंत्र्य सैनिक गेले. त्यांनी सोबत बंदुका,रिवाल्वर, भाले,काठ्या,साधे बॉम्ब हे सर्व घेतले होते. 7 जून 1943 ला, पहाटे 50 भूमिगत प्रतिसरकारचे कार्यकर्ते हे शेनोलीच्या उत्तरेस, दोन मैल अंतरावर, दबा धरून बसले. ते सगळे गाडीत बसले. गाडी बिच्छूच्या बोगद्यापर्यंत आली. हे हे सारे भूमिगत उड्या टाकून खाली आले. इंजिनमध्ये चढले.बंदुका वगैरेंचा धाक दाखवला.त्यांनी डब्यात बसलेल्या पे. क्लार्कला गाठले.पेट्या ताब्यात घेतल्या.त्या खाली फेकून दिल्या.त्या फोडल्या.अकरा हजार 175 रुपये त्यातून निघाले.त्यात काही नाणी होती.जास्त रकमेची सात हजार 633 रुपये ची पेटी मात्र भूमिगत प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांना हस्तगत करताच आली नाही.ते लक्षात आले नाही असा पण एक वेगळा चमत्कार घडल्याच्या घटना नागनाथअण्णा नायकवडी यांनी त्या वेळी सांगितल्या आहेत. बेचाळीसच्या लढ्यात जे भूमिगतांचे आंदोलन म्हणून वर्णन करतात आणि ते रास्तही आहे. यामध्ये अनेक राष्ट्रीय नेत्यांनी सातारा जिल्ह्याला प्रबोधित करून, स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात अग्रस्थानी आणले. हे विधान हे विद्यमान सातारकरांना विसरता येणार नाही सातारचे भूमिगत आणि काँग्रेस,समाजवादी यांच्यामध्ये वैचारिक साम्य नव्हते. तथापि यशवंतराव चव्हाण हे या सर्वांचे नेते होत. हा सर्व अभिमान कायमपणे मनात ठेवावा लागणारच आहे. त्यांच्या गटाला संघटनेचे स्वरूप प्राप्त करून देण्यात वसंतदादा पाटील पुढे स्वामी रामानंद भारती काशिनाथ देशमुख,शांताराम इनामदार,गौरीहर सिंहासने संघटनशील प्रयत्न करणारे मोठे स्वातंत्र्य सेनानी,यांचेसोबत होते. त्यांचे ऑगस्टक्रांती लढ्यातील योगदान जपणे आणि अभिवादन करणे, हे सर्वांचे कर्तव्य ठरते. क्रांतिसिंह नाना पाटील आणि किसन वीर दोन महानायकाच्या स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यकथा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सुटका, त्यांचे तुरुंग फोडणे,त्यांनी जनसंघटना करणे, ब्रिटिशांना नामोहरम करणे,भरारी पथक स्थापन करणे, लोकांना निर्भय बनवणे,सतत घातपात पत्रके, बुलेटीन वाटणे,सरकारी वाहतुकीला अडथळा करणे, टेलिफोन,टेलिग्राफ बंद पाडणे, रेल्वे लुटणे या सर्व कारवाया पाहिल्या म्हणजे त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते.ऑगस्टक्रांती ही दुसरी तिसरी काही नसून सातारा जिल्ह्यातील अनेक गावातील या भूमीगतांच्या शौर्या गाथा आहेत. त्यांना हिणविण्यासाठी,दरोडेखोरांच्या टोळ्या म्हटले जात. हे चूक आहे. याचे कारण एकूण 37 दरोडे त्यावेळी पडले होते.म्हणून तेव्हाचे डीएसपी यांनी भूमिगत गटाचा असा उल्लेख केला होता. किसन वीर,नाना पाटील,बर्डे मास्तर यांनी या बदनामीबद्दल एकत्रित चर्चा केली.विचारविनिमय केला. कुंभारगाव येथील बैठकीत ऑक्टोबर 1942 मध्ये, गुन्हेगारीकडे निघालेले भूमिगत यांचे आंदोलन रोखले पाहिजेत, असा एक विचार पुढे आला.ही बदनामी रोखणेसाठी, कुंडल गट, सांगली गट यांच्यापासून साताऱ्यातील प्रतिसरकारचा गट हा पुन्हा स्वतंत्र वेगळेपणाने वागू लागला. प्रती सरकारचे स्वरूप पालटले.भूमिगत आंदोलन आणि पारंपारिक दरोडेखोरांच्या टोळ्या एकच आहेत याची आकडेवारी, याची चर्चा होत होती त्या काळात, वाढत्या धुमाकूळ घालण्याच्या प्रमाणामुळे सतत चर्चेला येत होती. जनावरांच्या चोरीपासून,घरे फोडण्यापर्यंत, घरात घुसून जडजवाहर लुटण्यापर्यंत अनेक प्रकारचे दुष्कृत्य पारंपारिक दरोडे खोर करीत असत.याचाच संदर्भ देऊन, क्रिमिनल ॲक्ट दहानुसार, ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमातींचा तेव्हाच सर्वे सुरू केला होता.गुन्हेगार जाती कोणत्या हे ठरविण्यात येऊ लागले होते. हे पण सातारा जिल्ह्यात तेव्हा घडले होते.हा इतिहास विसरता येत नाही.सन 42- 43 मध्ये ब्रिटिश सरकार आणि भूमिगत, त्यांची आंदोलने, प्रतिसरकारचे कार्यकर्ते यांच्यामध्ये दरोडेखोर, गुन्हेगार जाती त्यांचे सर्वे,त्यांची निश्चिती, दरोड्यांची संख्या,लुटलेला ऐवज याबद्दल खूप मोठी प्रदीर्घ चर्चा त्या कालखंडामध्ये झालेली आहे. त्या वेळचे साताऱ्याचे डीएसपी गिलबर्ट यांनी गुन्हे दाखल केलेल्या भूमिगतांना अनेक वेळा सांगितले की तुमच्या अटकेची वारंट रद्द केली जातील.आरोप मागे घेतले जातील.पण दरोडेखोरांचे दरोडे यांचे प्रमाण कमी झाले पाहिजे.दरोडेखोर व भूमिगत यांच्यामध्ये गट पडले. दरोडेखोरांचा बंदोबस्त जाहला. बदनामीचा इतिहासही घडून गेला आहे, हे आता नाकारता येत नाही. सातारा जिल्ह्यातील प्रतीसरकारच्या भीतीच्या थरारकथाही खूप आहेत. सावकार,जुलमी नोकर यांना गाठून त्यांच्या पायावर पत्रा मारणे,असे अपवादात्मक प्रकार घडल्याचे प्रतिसरकारच्या इतिहासामध्ये नावानिशी प्रकार नाहीत.मात्र जुलमी सावकार, इंग्रज सरकारला हेरगिरी करून, मदत करणारे, गद्दार यांना धडा शिकवण्यासाठी हे प्रकार केले जात असत.असे प्रतिसरकारची स्वातंत्र्यसेनानी कथन करीत असत.
वरील सर्व पूर्व इतिहास जरी कथन केला असला तरी, प्रतिसरकारच्या स्थापनेचा इतिहास हा सातारा जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा गौरवशाली इतिहास ठरतो.तो पुन्हा-पुन्हा जनतेपुढे यायला हवा.1 जून 1943 ला, कामेरी गावात बैठक होती.नाना पाटील या बैठकीला हजर नसतात.गौरीहर सिंहासने यांचेसह पंचवीस जण हे उपस्थित राहतात.किसन वीर ,तात्या बोराटे, बापूराव शिंदे,दादासाहेब साखावळकर,कासेगावकर वैद्य, माधवराव जाधव,तानाजी पेंढारकर ही मंडळी बैठकीमध्ये हजर होती. एक कडवी संघटना स्थापन करावी असा विचार पुढे आला.त्यातूनच आपण ब्रिटिशांची चौफर दडपशाही रोखू शकतो, लादलेले दंड नाकारू शकतो असे ठरले. या बैठकीत अनेकांची मते वेगळी होती.आपण कायम भूमिगत राहिलो तर जनतेशी सलोख्याचे असलेले संबंध तुटतील,असाही एक विचार पुढे आला.लोकांच्या अर्ज विनंत्या, शिष्टमंडळे तालुक्याला नेणे हे होणार नाही.लोक कधी संघटित होणार नाहीत,असाही विचार करण्यात आला, बुलेटीनचे काम थांबवावे लागेल म्हणून कामेरीच्या प्रतिसरकार गट स्थापनेत पुढील स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या.एकूण बावीस गट स्थापन करावयाचे ठरले.गटनिहाय पैशाचे वाटप करायचे आणि बुलेटिन छापणे, वाटप करणे ही कामे करणे ठरले.खरे तर,हा खूप मोठा तपशीलवार इतिहास आहे.पण प्रत्येक कार्यकर्त्याला प्रवासासाठी शंभर रुपये खर्च, कार्यालयीन खर्च शंभर रुपये असे मंजूर करण्यात आले. 20 ऑगस्ट 1943 च्या ,एका घटनेचा उल्लेख करणे फार महत्त्वाचे आहे दरोडेखोरांच्या वाढत्या त्रासामुळे काही गटांनी, प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात चालवलेल्या एकमेकांना नामोहरम करण्याच्या कारवाया थांबल्या पाहिजेत.अन्यथा संघटनेत फूट पडेल हे विचार प्रतिसरकारच्या गटाने ऐकले .
प्रतिसरकारच्या चळवळीचे नायक क्रांतीसिंह नाना पाटील हे कल्पक नेतृत्व,धाडसी योद्धा म्हणूनच जिल्ह्यातील भूमिगत आंदोलनाचे हृदयस्थ नेते ठरले होते. जून 1943 ते फेब्रुवारी 1945 या कालखंडात प्रति सरकारने सातारा जिल्ह्यात पर्यायी अनेक कामे केली.राष्ट्रद्रोही ह्यांना शिक्षा केल्या जवळपास तीनशे भूमीगतांचे मोर्चे जी डी बापू नी काढले.तिकडे गांधीजींच्या अटके विरुद्ध असंतोष पेटवणे, हे काम प्रतिसरकार त्याच वेळी करीत होते. आंदोलनास लागणारे पैसे गोळा करणे, हेही काम कासेगावकर वैद्य करीत होते.यामुळेच संपूर्ण ब्रिटिश भारतात,नाना पाटलांचा सातारा जिल्हा हा एखाद्या स्वतंत्र संस्थान सारखा होता.तिथे नानांचे राज्य होते.नानांचा कायदा तिथे चालायचा.
नागनाथ अण्णा नायकवडी आणि वाळवा शिराळा पेठ येथे झालेल्या कारवाया हा एक मोठा इतिहास आहे.अण्णांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मदत करू नका, असे अनेक लोकांना सांगितले. ऑगस्ट 42 चे आंदोलन आणि भूमीगत कार्यकर्त्यांचे साधे राहणे, चटणी भाकर खाणे, दरोडेखोरांसारखा नागरिकांना त्रास न देणे याचे कौतुक जनतेत वाढू लागले होते.लोक स्वतःहून भूमिगतांना, प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांना भाकरी आणून देऊ लागले होते. सामान्य नागरिक व भूमिगत यांच्यात एक राष्ट्रभक्तीचे नाते तयार होऊ लागले. संपूर्ण सातारा जिल्ह्यात भूमिगतांना आश्रय देणे हा जीवनाचा विषय बनू लागला होता.पुढे पुढे 1944 पर्यंत, सातारा जिल्ह्यासारखे भूमिगत,त्यांची आंदोलने महाराष्ट्रभर पसरू लागली होती. म्हणून बरडे मास्तर,बाबुराव चरणकर,नाथाजी लाड, कासेगावकर वैद्य,किसनवीर, डी.जे. देशपांडे,पांडू तात्या बोराटे हे सगळे भूमिगत मुंबईला गेले होते. आणि यामध्ये अच्युतराव पटवर्धन,रत्नाप्पा कुंभार यांनी समेटाचा प्रस्ताव दिला होता. तो नाकारला होता.यानंतर किसन वीर यांच्याकडे सर्वांना पुन्हा संघटित करणे, संपर्क साधणे गटांशी बोलणे,ही कामे सोपवण्यात आली होती. नोव्हेंबर 1943 पासून, संपूर्ण अन्नधान्याच्या बिकट परिस्थितीला तोंड कसे द्यायचे याच्या चिंतेमध्ये स्वतंत्र चळवळीतील नेते होते. 6 मे 1944 रोजी, गांधीजींची आगाखान पॅलेसमधून सुटका करण्यात आली. एक विधायक कार्यक्रम गांधीजींनी कार्यकर्त्यांना दिला. जातीय ऐक्य निर्माण करणे,अस्पृश्यता निर्मूलनाची सुरुवात करणे, दारूबंदी सुरू करणे, इतर ग्रामीण उद्योग सुरू करणे,खादीचा प्रसार करणे, ग्रामीण आरोग्य सुधारणे, मूलभूत शिक्षण सुरू करणे, प्रौढ शिक्षण वर्ग घेणे, स्त्रियांचा उद्धार सुरू करणे, मूळच्या रहिवाशांची सेवा करणे, आरोग्य शिक्षण देणे, राष्ट्रभाषेचा प्रसार करणे,आपल्या भाषेवर प्रेम करणे,आर्थिक समतेसाठी काम करणे असा हा वीस कलमी कार्यक्रम गांधींजींनी जनतेला दिला होता.यातूनच भूमिगत कार्यकर्त्यांनी स्वतःहून पोलिसात हजर राहावे, असे दडपण आणण्यात येत होते. एक ऑगस्ट 1944 ला, गांधीजी पाचगणीला आले होते. तेव्हा अनेक नेते भेटण्यास आले होते. याचवेळी अच्युतराव पटवर्धन यांनी गांधीजींना विचारून घेतले की सातारच्या भूमिगतांना पोलिसात हजर व्हावे का? साताऱ्यातील आंदोलन बंद करावे का? याबद्दल गांधीनी लेखी मार्गदर्शन करावे.याबद्दल सी. डब्ल्यू.सी. ही मार्गदर्शन करु शकते.आपापल्या सद्बुद्धीने जर आदेश दिला तर पोलिसात हजर राहावे.असे ऐकून सर्व भुमिगत नेत्यांना आश्चर्य वाटले. आणि सविनय कायदेभंगाचे आंदोलन थांबवण्यात आले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पुढील स्वातंत्र्य सेनानी ( 7000 ) किसन वीर, पांडू मास्तर ,निवृत्ती काका, बाबुराव चरणकर, गणपत रामचंद्र पाटील,मारुती ज्ञानू कदम,दत्तू विठ्ठल सोनार,दत्तू बाळू लोहार,बाबू भाई हसन मुलानी या सर्व भूमीगतांनी 21 व 22 ऑक्टोबर 1944 रोजी, पोलिसात हजेरी लावली. गांधीजींच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. स्वतःहून अटक करून घेतली. खरेतर,प्रतिसरकारच्या चळवळीतील,अनेक घटनांचा इतिहास अनेक अर्थाने अभ्यासला गेला पाहिजे. व्हाइसरॉयच्या आदेशानुसार,साताऱ्यातील अधिकाऱ्यांनी आंदोलन दडपण्याचा जो प्रयत्न चालवला होता त्यातून नाझीसारखा दहशतवाद वाढला होता.पोलिस पथके धाडी घालत होते. 01 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर 1945 या काळात, सातारा जिल्ह्यातील 655 व्यक्तींना तुरुंगात डांबण्यात आले होते.त्यातूनच 92 भूमिगत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सुटले होते.हा 1942 चा थरारक इतिहास,हे स्वातंत्र्याचे यशोगान आहे.लोकांचा पोलिसांनी अनन्वित छळ सहन केला आहे. ब्रिटिशांनी केलेला अत्याचार हा आजच्या पिढीला कळणार नाही. आप्पा सोनकी व सुंदरी यांच्या शरीरावर केलेले अत्याचार हे अशोभनीय आहेत. गावांवर सामूहिक दंड लावणे हा अत्याचाराचा एक प्रकार होता. सातारा जिल्ह्यात, 49 गावांवर सामुदायिक असा एक लाख 33 हजार रुपये एवढा दंड आकारला. याचा इतिहास ब्रिटिश कागदपत्रांच्या वरून स्पष्ट होतो. भूमिगत नेत्यांना अटक करण्यासाठी बेचाळीसच्या लढ्यात पाचशे ते एक हजार रुपयाचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.हेही एक वेगळेपण आहे. क्रूर ब्रिटिशांनी तत्कालीन पोलिसांना,स्थानिक नागरिकांवर, भूमीगतांवर जास्त अत्याचार करतील त्यांना मेडल घोषित केले होते.त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना नोकरी देणे व हजार ते 500 रुपये उदरनिर्वाह जादा भत्ता देणे,अशाही क्रूर तरतुदी केल्या होत्या.यावेळी हिंदू महासभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी देशाशी,स्वातंत्र्य चळवळीशी,प्रती सरकारशी,राष्ट्र भक्तांशी फितुरी करून इंग्रजांना मदत केली.प्रती सरकारच्या अनेक क्रांती वीरांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली.त्यांचा प्रती सरकारच्या कार्यकर्त्यांनी चौरंगा करून अशा गद्दारांना जरब बसविली.हेच आता स्वतःचा राष्ट्रभक्त म्हणून उदोउदो करवून घेतात.
हा धगधगता सातारा जिल्हा शांततामय होण्यासाठी स्वामी रामानंद यांनी, 13 जून ला, पत्रक काढून,जिल्ह्यात 1946 मध्ये, जिल्ह्यात नियोजन मंडळे,जी तेव्हा कार्यरत होती,ती ताबडतोब बंद करावीत,मंडळाचा वापर खाजगी कामासाठी करू नये,अशा मंडळांशी काँग्रेसच्या चळवळीचा काहीही संबंध असणार नाही,असे जाहीर केले.नियोजन मंडळाबद्दल काही तक्रारी आल्यास,सरकारी अधिकाऱ्याकडे त्या सादर कराव्यात,लोक,काँग्रेस कार्यकर्ते व सरकारी अधिकारी यांनी एकत्रित सहकार्य निर्माण करावे, आणि सातारा जिल्हा प्रशांत करावाअसे आवाहन केले.सातारा जिल्ह्यातील,1942 मध्ये सुरू झालेले, स्वातंत्र्याचे गौरवशाली आंदोलन,13 जून 1946 रोजी थांबले.यादिवशी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र येथील बैठकीत,खूप कलह माजला. काँग्रेस विरुद्ध प्रतिसरकार,काँग्रेस विरुद्ध भुमिगत असा वाद विकोपाला गेला होता.त्यातील आरोप टोकाला गेले होते.सत्यशोधक चळवळीचे नेते, केशवराव जेधे येडेमच्छिंद्र येथील सभेच्या अध्यक्षस्थानी होते.तिथूनच किसन वीर आणि नाना पाटील या दोन नेत्यांमधील फूट उघड झाली. मतभेद टोकाला गेले,हा इतिहास आहे.जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीमध्ये,आठ जुलै 1946 रोजी,नाना पाटलांचे समर्थक वी. एन. पाटील यांचा यशवंतराव चव्हाण व किसनवीर यांचा उमेदवार असलेल्या,बाळासाहेब देसाई यांनी पराभव केला आणि सातारा जिल्ह्यात गांधीप्रणीत कॉंग्रेस आणि प्रति सरकार यातील दोन गट पुढेही राजकारणात कायम असेच संघर्षशील राहिले.क्रांतीसिंह नाना पाटलांच्या या जयंतीदिनी हा भूमीगतांचा लढा, हे प्रतिसरकारचे आंदोलन व सेवादल,काँग्रेस, प्रती सरकारचे राजकारण हे नव्या पिढ्यांना कळावे व तेव्हाच्या संयुक्त साताऱ्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा व्यापक पट लक्षात यावेत म्हणून हे लिहिले.वंशवादाच्या इतिहासाकडे वेगाने निघालेल्या, उन्मादी,राष्ट्रभक्तीवादी व्यक्तीना, पक्षांना,जातींना,सरंजामशहांना हे स्वातंत्र्य अनेकांच्या तूरंगवासाचे फळ आहे.आपले मतदार संघ व संस्था म्हणजे या क्रांती वीरांचे बलिदान आहे.आपली राजधानी नव्हे.ती संस्थाने तर कधीच असू व होवू नये.सातारचे प्रतिसरकार,ती चळवळ समजावी व अनेकांनी पुन्हा सबळ ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून संशोधन करून,पुढे आणावीत.सत्यशोधक व सेवादल,काँग्रेस व नाना पाटील यांच्या भूमिका मांडाव्यात. जयंतीनिमित्त श्रमिकांच्या चळवळीसाठी,संघर्षाची हाक एकमेकाला देणे आणि एकत्र येणे,हेच खरे अभिवादन होय.
शिवाजी राऊत,
सातारा
03 आगस्ट,202, वेळ 06.10
टीप : वरील लेखातील संदर्भ हे साताऱ्याचे प्रतिसरकार डॉ. आबासाहेब शिंदे यांच्या ग्रंथातील आहेत.