जयसिंगपूर/प्रतिनिधी-
जयसिंगपूर येथील मध्यवर्ती क्रांती चौकातील एसटी बस स्थानकाच्या जागेतच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा.जागेची सर्व पूर्तता करुन 14 एप्रिल रोजी याठिकाणी पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन करावे या मागणीसाठी भीमसैनिकांनी जयसिंगपूर नगरपरिषद आणि आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला . येत्या सहा महिन्यात पुतळा उभारला जाईल अशी आश्वासन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुतळा समितीच्या सदस्यांना दिले

जयसिंगपूर बसस्थानकाच्या जागेतच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करावी अशी भीमसैनिकांची मागणी आहे. या मागणीसाठी सोमवारी सकाळी जयसिंगपूर शहर आणि परिसरातील भीमसैनिक, आंबेडकरवादी संघटनाचे पदाधिकारी छत्रपती शाहू महाराज दसरा चौक स्टेडियम येथे एकत्र जमले. यानंतर मोर्चास सुरुवात झाली. ‘कोण म्हणतंय देत नाही…घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, ‘बोलो रे बोलो जय भीम बोलो’ अशा घोषणा देत शिरोळ रोड, स्टेशनरोड मार्गावरुन आंदोलक जयसिंगपूर नगरपरिषद कार्यालयासमोर आले. तेथे प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांना निवेदन दिले. बसस्थानकाच्या जागेतच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा झाला पाहिजे, 14 एप्रिल रोजी भूमिपूजन झाले पाहिजे. अन्यथा नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण करु असा इशारा आंदोलकांनी दिला डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर खेदाची बाब आहे. 14 तारखेला भूमिपूजन करावे. न झाल्यास महिला स्वत: भूमिपूजन करतील. पालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास महिला कुदळ मारतील अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. त्यांच्या पुतळ्या संदर्भात 5 तारखेपर्यंत भूमिका निश्चित न झाल्यास पालिकेस टाळे ठोकू असा इशारा जयपाल कांबळे यांनी दिला.
यानंतर बोलताना मुख्याधिकारी तैमुर मुलाणी म्हणाले, नगरपालिकेने बसस्थानकाच्या जागेचा प्रस्ताव पुतळ्यासाठी पाठविला आहे. याचा पाठपुरावा करु.
यानंतर हा मोर्चा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयाकडे गेला.याठिकाणी घोषणा देण्यात आल्या. बसस्थानकाच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. नियोजित जागेवर 14 एप्रिल रोजी भूमीपूजन करावे, अशी जोरदार मागणी केली. . आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुतळा तयार करण्यासाठी ऑर्डर दिली मात्र जागेच्या निमित्ताने काहीजण वाद करीत आहेत. यामुळे पुतळ्याचे काम रखडले जाईल. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी बसस्थानकाच्या जागेत भूमिपूजन करावे, आशा भावना मोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केल्या तसेच आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तात्काळ बसवावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळीआमदार डॉ. राजेंद्र पाटील बोलताना म्हणाले, बस स्थानकातील जागेसाठी वरिष्ठ पातळीवर बोलणे सुरू आहे. लवकरच त्यांचा निर्णय लेखी स्वरूपात मिळेल. सहा महिन्यांच्या आत पुतळा उभा राहील. आपल्या देशाला
ज्यांनी संविधान दिले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जयसिंगपबुरात व्हावे अशी अपेक्षा होती. 2019 च्या निवडणुकीवेळी ही मागणी पुढे आली. गेल्या अडीच वर्षात रोजगार, उद्योग, आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम आपण केले. कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली. नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्याचे एकाचवेळी भूमिपूजन व्हावे अशी अपेक्षा होती. मात्र जागेच्या विषयावरुन मत-मतांतरे व्यक्त झांली.
क्रांती चौकातील राजर्षी शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाचे भूमीपूजनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे. विकास कामांच्या आडवे जायचे म्हणून महिनाभर अनेकांनी खटाटोप केला. मात्र समाजातील भांडणे पुतळा समितीत आणणे योग्य नाही. विधायक कामातून स्पर्धा असणारा हा तालुका आहे. मात्र चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचा काहींचा उद्योग सुरु आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी कोर्टाची जागा मिळविण्यात अनेक अडथळे आहेत. यामुळे पुतळ्याचे काम रखडण्याची शक्यता आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा खर्च आपण स्वत: देणार असून, पुतळा तयार करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. 2 लाख रुपये दिले आहेत. पुतळा उभारणीसाठी एस.टी. बसस्थानकाच्या जागेचा पाठपुरावा करु. एस.टी. विभागाचा अहवाल गेला आहे. आठ दिवसात जागेचा प्रश्न मार्गी लागेल. येत्या 6 महिन्यात पुतळा उभारला जाईल. मात्र पुतळा होऊ नये ही प्रवृत्ती वाढू देवू नये असेही ते म्हणाले.
आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जयसिंगपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार,मुख्यसचिव डॉ. सुभाष सामंत,खजिनदार उत्तम वाघवेकर,सहसचिव सुरेश कांबळे, पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले अभिजीत आलासकर सूर्यकांत कांबळे कांबळे,बाबासाहेब बागडी, संजय शिंदे,विश्वास कांबळे,सुरेश गौरवाडे, बी.आर.कांबळे, सुनीता पवार, जुलेखा मुल्लाणी,रेशमा गायकवाड, सुभाष साठे, संतोष सासणे, आनंदा शिंगे, विश्वनाथ अंबपकर,अब्दुल बागवान, बाळासाहेब कांबळे,सुरज शेळके,मल्हारी सासणे,रंगराव कांबळे,प्रमोद कांबळे आदींसह भीमसैनिक, कार्यकर्ते सामील झाले होते.