डॉ. आंबेडकरांनी सखोल व्याप्तीचे प्रबोधन केले
अन्वर पटेल यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता. १४ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा विचार मांडला. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने संविधानाच्या निर्मिती त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीसाठी मांडलेले तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे. तथागत गौतम बुद्ध,संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय समाज व्यवस्थेचे अतिशय सूत्रबद्ध व नेमके विश्लेषण केले. अर्थनीती पासून जलनीतीपर्यंत त्यांनी मांडलेले विचार दृष्टेपणाचे आहेत. समाज परिवर्तनासाठी एक सखोल व्याप्तीची प्रबोधनाची चळवळ त्यांनी सुरू केली.त्यांच्या विचारांवर आधारित अशी जर आपण वाटचाल केली तर सर्वार्थाने समृद्ध भारताची उभारणी होईल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सदस्य अन्वर पटेल यांनी व्यक्त केले. ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते नंदकिशोर जोशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी पांडुरंग पिसे, महालिंग कोळेकर ,किरण कुलकर्णी ,प्रकाश प्रसादे, पांडुरंग आगम ,अरुण कोकळकी ,दिलीप बागेवाडीकर, मधुकर धुमाळ ,अनिल धमणगे ,प्रा. डी.एम. पठाण, संजय अंबले, शाहरुख मुल्ला, शहाजी लिमकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.