घटनेच्या तत्वज्ञानाचे आचरण,प्रसार,प्रचार गरजेचा – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

घटनेच्या तत्वज्ञानाचे आचरण,प्रसार,प्रचार गरजेचा – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

घटनेच्या तत्वज्ञानाचे आचरण,प्रसार,प्रचार गरजेचा

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

कवठेसार ता.१४ ‘आम्ही भारतीय लोक’ अशी सुरुवात करून हे संविधान ‘ स्वतः प्रत अर्पण करत आहोत ‘ असे अखेरीस जाहीर करणारा भारतीय राज्यघटनेचा सरनामा भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान अधोरेखित करतो. विचार,अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा यांचे स्वातंत्र्य, घटक राज्यांचे संघराज्य असलेली संघराज्य एकात्मता, व्यक्तीला धर्म असेल पण राष्ट्राला धर्म असणार नाही असे सांगणारी धर्मनिरपेक्षता, मानवी कारुण्यावर नव्हे तर आर्थिक समतेवर आधारित समाजवाद, अंतिम सत्ता लोकांची आहे हे सांगणारी लोकशाही हे भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान आहे. आज या मूल्यांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले परतवून लावण्यासाठी आपण राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाचे व्यक्तिगत पातळीवर आचरण करण्याबरोबरच सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पातळीवर त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची नितांत गरज आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते सकल बौद्धजन व पंचशील तरुण मंडळ कवठेसार यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘ संविधानाचे तत्त्वज्ञान ‘या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड.अस्मिता कवठेकर – कुलकर्णी (सहसचिव ,महिला वकील संघटना, सांगली ) होत्या.स्वागत,प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय बाबासाहेब कवठेकर यांनी करून दिला.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, भारतीय संविधानावर भारतीय उदात्त परंपरा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलन ,गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. आर्थिक स्वातंत्र्या शिवाय संपूर्ण स्वातंत्र्य असू शकत नाही म्हणून घटनेमध्ये मार्गदर्शक सूत्रे दिलेली आहेत. वर्ण-जात- भाषा- प्रदेश ही विषमता दूर करून संधीची व दर्जाची समानता घटनेने दिली आहे. विविधतेतून एकता साधणारी आणि लोकशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारी सार्वभौमत्वाची महत्वाची भूमिका घटनेने घेतली आहे. भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान हा एक जगातला सर्वोत्तम सामाजिक दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. आज या तत्वज्ञानाला काही आव्हाने उभी राहिली आहेत. ती आव्हाने वैचारिक पातळीवर दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी संविधान साक्षरता आणि तिची प्रामाणिक स्वीकृती गरजेची आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या सविस्तर मांडणीमध्ये भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान आणि भारतीय विचार परंपरा याचे अतिशय सखोल विश्लेषण केले.

अध्यक्षीय भाषणात ॲड. अस्मिता कवठेकर- कुलकर्णी म्हणाल्या,भारतीय संविधान हा मानवतेचा जागर करणारा जिवंत ग्रंथ आहे. संविधानची तत्वे,मार्गदर्शक सूत्रे आणि मूलभूत कर्तव्ये आपण समजून घेतली पाहिजेत.जातीय उतरंडीची इमारत बाजूला करून संविधानाने सर्व माणसांना समान पातळीवर आणले.संविधानाच्या हक्कांचे व्यवस्थेकडून उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागता येते.संविधानाचे सर्वकालिक महत्व फार मोठे आहे.यावेळी सरपंच पोपट भोईर,ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार,संतोष भोकरे,बाबासाहेब मगदूम,सुभाष माने, महालिंग पाटील,विकास सुतार,विनायक कोठावळे आदींसह अनेक मान्यवर नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.मिलिंद कांबळे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन सुशांत कांबळे यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *