धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा
औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री शाहिद साजिदुज़मान यांनी आरोपी बाबासाहेब भानुदास कर्जतकर यांना धनादेश अनादर प्रकरणी दोषी धरून सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली तसेच धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम रू. ३,६०,०००/- नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी अख्तर सरदार शहा यांना देण्याचे आदेशित केले. नुकसान भरपाईची रक्कम रु ३,६०,०००/- फिर्यादीला देण्यास कसूर केल्यास अधिकचे एका महिन्याच्या कारावासाची शिक्षाही न्यायाधीशांनी आरोपीला सुनावली.
फिर्यादी अख्तर सरदार शहा यांचे म्हणणे आहे की फिर्यादी व आरोपी हे दोन्हीही राज्य राखीव पोलीस दलात पोलीस म्हणून कार्यरत आहेत. बाबासाहेब भानुदास कर्जतकर यांनी आर्थिक व वैद्यकीय कारणासाठी फिर्यादीकडे हातउसने रकमेची मागणी केली होती. मित्रत्वाच्या नात्यामुळे फिर्यादीने रक्कम आरोपीला दिली. आरोपीने रक्कम एका महिन्यात परत करण्याचे आश्वासन दिले होते. एका महिन्यानंतर फिर्यादीने आरोपीला हातउसने दिलेली रक्कम परत करण्यासाठी विनंती केली असता आरोपीने फिर्यादीला वादातील धनादेश दिला होता जो की फिर्यादीने त्याच्या बँकेतील खात्यात टाकला असता अनादर झाला. फिर्यादीने हात उसने दिलेल्या रकमेसाठी आरोपीस अनेक विनंत्या केल्या व वकिलामार्फत कायदेशीर नोटीसही पाठवली तरी सुद्धा आरोपीने फिर्यादीचे पैसे दिले नाही. त्यामुळे फिर्यादीने औरंगाबाद येथील मा. फौजदारी न्यायालयात आरोपी विरुद्ध प्रकरण दाखल केले होते. सदरील प्रकरणात आरोपीने सदरील व्यवहार हा भिशीचा होता व इतर मुद्दे बचावासाठी घेतले होते परंतु आरोपीचे सर्व मुद्दे हे खोटे असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयास निदर्शनास आणून दिले आणि फिर्यादीने त्याची केस न्यायालयात निर्विवादपणे सिद्ध केल्यामुळे न्यायालयाने आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. फिर्यादी तर्फे अॅड. इम्रान मुस्तफा पठाण आणि अॅड. किरण एस ढेपे यांनी यशस्वीपणे प्रकरण चालवून फिर्यादीची भक्कमपणे बाजू न्यायालयात मांडली
Posted inऔरंगाबाद
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा
