राजू शेट्टी यांचे आत्मक्लेशी आंदोलन सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे

राजू शेट्टी यांचे आत्मक्लेशी आंदोलन सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे

राजू शेट्टी यांचे आत्मक्लेशी आंदोलन सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी

गेले तीन महिने मणिपूर मध्ये उसळलेल्या दंगली,हिंसाचार, अमानुष अत्याचार याची उदाहरणे पाहिली तर हे सारे प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे आहे. डबल इंजिन सरकारमधील नेते मंडळींची या प्रकरणातील वक्तव्ये आणि मूळ प्रश्नाकडे केले जाणारे दुर्लक्ष अतिशय संतापजनक व चिंताजनक आहे .मूळ मुद्द्याची चर्चा न करणे,त्याचे मूळ गांभीर्य कमी करणे हे या सरकारचे व्यवछेदक लक्षण ठरलेले आहे .आपली चूकही कशी बरोबर आहे हे सांगण्यात हे सरकार हुशार आहे. मा. पंतप्रधानांनी इंडियाची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांनी काळे कपडे परिधान केल्यावर त्यांचे भविष्य काळे आहे अशी टिपणी करणे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यामुळे मणिपूर पेटले असे विधान करणे, सर्वोच्च न्यायालयाने सरकारने लक्ष घातले नाही तर आम्हाला लक्ष घालावे लागेल असे म्हटल्यानंतर लोकशाही व्यवस्थेबाबतच प्रश्न उपस्थित करणे आणि दिशाभूल करणे
हे सारे राजकारणाचे अतिशय किळसवाणे दर्शन आहे. केवळ आणि केवळ सत्तेला हपापलेली मनोवृत्ती आता वाढू लागलेली आहे. मणिपूरमधील आदिवासींवर म्हणजे भूमिपुत्र व कन्यांवर होणारा अन्याय व अत्याचार हा भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाला नाकारणारा आहे. म्हणूनच या साऱ्या प्रकरणाकडे सदसदविवेक बुद्धी शाबूत असलेल्या प्रत्येक भारतीयाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणि सरकारनेही वास्तव समजून घेतले पाहिजे.

या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी व कष्टकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मणिपूर प्रश्नावर व तेथील भूमिकन्यांवर झालेल्या अन्यायाविरोधामध्ये ७२ तासांचे आत्मक्लेशी अन्नत्याग सत्याग्रह केला आणि गांधी मार्गाने या साऱ्याचा निषेध केला. हे वर्तमान राजकारणाच्या ढासळत्या नीतिमत्तेच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे आहे. या आत्मक्लेष आंदोलनास आणि एक सही संतापाची ,कॅन्डल मार्च आदी उपक्रमाना सर्वसामान्य जनतेचा जो पाठिंबा मिळाला तो लोकशाहीची चाड असणाऱ्या प्रत्येकाचा हूरूप वाढवणारा ठरला आहे. संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे कारभारी असतात.आणि अंतिम सत्ता ही लोकांची असते याचे भान पुन्हा एकदा राज्यकर्त्यांना करून देण्याचा काळ आता आलेला आहे . राजू शेट्टी यांच्या या आत्मक्लेशी आंदोलनाने निश्चितच सर्वसामान्य जनतेचे आत्मबळ वाढायला मदत झालेली आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे झालेले असताना पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचे महत्त्व आणि तिची ताकद अधोरेखित करण्याला हे आंदोलन महत्त्वाचे ठरले आहे म्हणूनच त्याकडे संकुचित राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे.

———————————————_

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *