गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी उपयोगी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी उपयोगी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जपानसोबत उद्योग वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार

मुंबई दि. २२ : भारत आणि जपानचे ऐतिहासिक काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारातून भारतामध्ये जो विचार निर्माण झाला, त्याचा जगामध्ये प्रसार झाला व लोकप्रिय ठरला. बुद्धांचे तत्वज्ञान व विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी आजही उपयोगी पडत आहेत. जपान अभ्यास दौऱ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भेट दिल्यानंतर जपानमध्येही डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सुरू असल्याचे पाहून मनाला समाधान वाटले, अशी भावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. मुंबईतील जपानचे वाणिज्य दूतावास जनरल यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जपानचे राजदूत डॉ. फूकाहोरी यासुकाता आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जपानमध्ये गुन्ह्यांमधील दोषारोप सिद्धीचा दर हा ९८ टक्के आहे.  आपल्याकडील दोषारोप सिद्धीचा दर वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जपानच्या सहकार्याने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञाचा वापर भारतातही होणे आवश्यक आहे. तसेच जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट देऊन सन्मान केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले.

जपान दौऱ्यावरून आल्यावर जपान येथील बाजारपेठ राज्यातील उद्योजकांकरिता तसेच राज्यातील बाजारपेठ जपानच्या उद्योजकांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, त्यादृष्टीने विधान भवनात उद्योग विभागाचे अधिकारी तसेच औद्यागिक संस्थांसह बैठक घेतली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *