जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत

जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत

जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत

पुणे- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) पीक कर्ज हा महत्वाचा मुद्दा आहेच. परंतु प्रमुख कारण जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती हेही आहे. ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्या शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत. अशावेळेला सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होणे गरजेचे असल्याचे मत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यातील सहकार क्षेत्रातील जिल्ह्याची शिखर संस्था असते ती मजबूत झाली तर आपल्या ग्रामीण भागातील विकासाला, शेतकऱ्यांना मदत करायला गती मिळू शकते, असेही यावेळी दरेकरांनी म्हटले.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील साखर संकुल येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीला आ. दरेकर उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी निरीक्षक दौऱ्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, यशाला अनेक बाप असतात, परंतु अपयश किंवा पराभव झाला तर त्याची जबाबदारी कुणी स्वीकारत नाही. अशावेळेला पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन करून त्याला कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत, महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय होता का? तिन्ही पक्षातील लोकांनी एकत्रितपणे काम केले का? तेथील सामाजिक परिस्थिती काय होती? भविष्यातील तिथले नियोजन करून विधानसभेच्या दृष्टीने काय उपाययोजना असाव्यात अशा प्रकारचा सर्वार्थाने आढावा घेणारा हा दौरा असेल.

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्या टीकेवरून दरेकर यांनी राऊत यांच्यावर जोरदार तोफ डागली. दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांचा घोडा बेफाम सुटला आहे. त्यांना वेसण घालण्याची गरज आहे. शिवसेनेचा कोकणामधून बेस हलला आहे. भिवंडी सोडून शंभर टक्के महायुतील यश मिळाले आहे. त्यामुळे वैफल्यातून संजय राऊत वक्तव्य करत आहेत. आमच्या पक्षांमध्ये कोणाला मंत्री करावे आणि कोणाला करू नये, याची चिंता संजय राऊत यांनी करू नये. आपले भाऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का मंत्री झाले नाहीत हे पहिले ठाकरेंना विचारा. दोनवेळा कोट शिवून आमदार सुनील राऊत तयार होते, त्यांचे काय झाले आधी उत्तर द्या मग आम्ही उत्तर देऊ. राणेंनी जेवढी पदे आहेत ती उपभोगली आहेत. त्यांच्यासाठी मंत्रिपद हा मोठा विषय नाही.

मराठा ओबीसी वादावर दरेकर म्हणाले की, सरकार सकारात्मक भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहे. ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्या आरक्षणावर कुठेही गदा न येता काय मार्ग काढता येईल याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. कोणावरही हे सरकार अन्याय करणार नाही. तसेच यावेळी दरेकर यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या समन्वयातून पक्षश्रेष्ठी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील.

मुलींच्या मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटील यांनी घोषणा करूनही अंमलबजावणी झाली नाही त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, शंभर टक्के या निर्णयाची अंमलबजावणी होईल. आचारसंहिता आल्यामुळे अंमलबजावणीत होऊ शकली नाही. अधिवेशनामध्ये सरकार जरी आमचे असले तरी अधिवेशनात मी नक्की प्रश्न विचारून तात्काळ अंमलबजावणीसाठी सरकारला भाग पाडू.

महाविकास आघाडीत प्रत्येकाला

मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ दिसत आहे. निवडणूक होईपर्यंत काय होते ते बघा. प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. लोकसभेत मिळालेले यश असेच राहील. प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्यात, जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ते आहेत. एकमेकांचे पाय निश्चितपणे ओढतील यात शंका नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *