इंडिया आघाडीने मिळवलेले यश त्यांनी गाफील न राहता अधिक संघटितपणे पुढील राजकारण केले पाहिजे -प्रा. डॉ.अशोक चौसाळकर

इंडिया आघाडीने मिळवलेले यश त्यांनी गाफील न राहता अधिक संघटितपणे पुढील राजकारण केले पाहिजे -प्रा. डॉ.अशोक चौसाळकर

इचलकरंजी ता.१६ अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकालाने एनडीएचे सरकार सत्तेवर आले आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीलाही चांगल्या संख्येने लोकांनी निवडून दिलेले आहे. आयडिया ऑफ इंडिया अर्थात भारताची संकल्पना हा विषय जनतेमध्ये इथून पुढच्या काळात दोन्ही आघाड्या कशा पद्धतीने नेतात हे पहावे लागेल.मात्र या निकालाने विकासाचा अतिरेकी प्रचार आणि आभासी राष्ट्रवाद उघड केला आहे.तसेच सामाजिक सुविधांचा प्रचार मोठा पण लाभार्थी कमी आणि रंगवलेले आर्थिक चित्र आणि प्रत्यक्षात दिसून येणारी परिस्थिती यातील तफावत ओळखून लोकांनी मताधिकार बजावला असे दिसते .आता एकाधिकारशाही व आत्मलंपटतेला आळा बसेल .एकसंघतेला विभाजित करणाऱ्या मुद्द्यांना मागे टाकावे लागेल. यंत्रणांच्या गैरवापराचे प्रमाण कमी होईल. तसेच काँग्रेसचे झालेले पुनरुज्जीवन आणि इंडिया आघाडीने मिळवलेले यश त्यांनी गाफील न राहता अधिक संघटितपणे पुढील राजकारण केले पाहिजे. देशाच्या राजकारणामध्ये आगामी दोन-तीन वर्षांमध्ये काही मूलभूत बदल झालेले दिसतील ,असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ लोकसभा निकाल :दिशा व आव्हाने ‘या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा.डॉ. भालबा विभुते यांनी मांडणी केली. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

चर्चासत्रात बोलताना दशरथ पारेकर म्हणाले, या निकालांनी संमिश्र स्वरूपाचा कौल दिलेला आहे .सत्ताधाऱ्यांना सबुरीने घ्या आणि विरोधकांना घाई करू नका, योग्य व अधीक मजबुतीने लढा असा संदेश दिलेला आहे .या निवडणुकीत हिंदी पट्ट्यात भाजपचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी तो दक्षिणेत वाढलेला आहे . राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा व भारत न्याय यात्रेने मोठा परिणाम घडवून आणलेला आहे. डबल इंजिनचे सरकार हा रूढ केलेला शब्द इथून पुढे फारसा चालेल असे दिसत नाही. इंडिया आघाडीच्या जागा घटवण्यामध्ये काही घटकांनी काम केलेले दिसते. वंचित आघाडी आणि बसप यांचा फटका बसलेला दिसतो. तसेच मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांचा मताधिकारातील सहभाग कमी झालेला दिसतो.मध्यवर्ती मीडिया चे झालेले सत्तालंपट धोरण दिसून आले. माध्यमानी आपली विश्वासार्था अशीच अधिक काळ गमावली तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याचा शक्यता आहे आणि युट्युब सारख्या माध्यमांचा वापर हा प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतील पैशाचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये झाला. तसेच गुन्हेगारांची संख्या ही वाढती आहे.वाईट की अतिवाईट यापैकी निवड करावी लागणे हे योग्य नाही. अस्थिरतेतून स्थिरता सोडण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण वेग घेऊ शकते. अशावेळी लोकशाही सक्षम करण्यासाठी प्रबोधनाची वाढती गरज आहे.

प्रा. डॉ. भालबा विभूते म्हणाले, या निवडणुकीत मतदारांनी संविधानाच्या बाजूने मते दिलेली आहे. सत्ताधारी वर्गाने काँग्रेसने केलेल्या घटनादुरुस्तीनाच घटनाबदल असा केलेला प्रचार मतदारांना रूचला नाही. उलट भाजपचे अनेक नेत्यांनी जाहीरपणे आम्ही चारशे हून जागा आम्हाला घटना दुरुस्ती साठी पाहिजे आहेत अशी विधाने केली. तसेच धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न प्रचाराची अतिशय हीन पातळी गाठून केला. शिक्षण धोरणापासून अनेक ठिकाणी घटनात्मक मूल्यांची मोडतोड केली.निवडणूक आयोगाची निवड, आचारसंहितेची मोडतोड असे अनेक प्रकार झाले. संविधान बदलण्याचा हेतू ठेवलेल्यांना संविधानासमोर नतमस्तक व्हायला लागले. ईव्हीएम चा मुद्दा पूर्णतः निकालात निघाला असे म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही.हा निवडणूक निकाल सत्ताधाऱ्यांना टाळ्यावर आणणारा आणि विरोधकांना संधीच्या वाटा मोकळ्या करणार आहे.

या चर्चासत्रातील तीनही वक्त्यांनी गेल्या १८ लोकसभा निवडणुकातील राजकारण व त्या त्या वेळची परिस्थिती आणि लोक मताचा कौल, देशाची झालेली उभारणी, आजवरच्या सत्तेतील आणि सत्ता बदलातील ठळक टप्पे, या निवडणुकीत एनडीए व इंडिया आघाडीची बांधणी,
विविध पक्षांना मिळालेल्या जागा, मतांची टक्केवारी, विविध राज्यातील असलेली परिस्थिती , प्रादेशिक नेतृत्वाचे यश अपयश, निवडणुकीत झालेला पैशाचा वापर, धर्माच्या आधारावर करू पाहणारे ध्रुवीकरण, जातवार जनगणना, या निवडणूकीचा निकालाने दिलेला संदेश, राबवलेली प्रचार यंत्रणा, माध्यमांची भूमिका, निवडणूक आयोगाची भूमिका, एक्झिट पोल पासून ध्यानधारणेपर्यंतच्या विविध मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केला. या चर्चासत्राला समाजवादी प्रबोधिनीच्या सर्व शाखांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *