महिला सन्मान सोहळा यशस्वी होण्यासाठी जबाबदाऱ्या चोख पार पाडा – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

महिला सन्मान सोहळा यशस्वी होण्यासाठी जबाबदाऱ्या चोख पार पाडा – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
  • तपोवन मैदानावरील कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला नियोजनाचा आढावा

कोल्हापूर, दि. 19: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन आपापल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

 मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवार 22 ऑगस्ट रोजी कळंबा रोड येथील तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी उपायुक्त वर्षा उंटवाल, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले. 
 जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने बजावाव्यात. कार्यक्रमाचे गाव आणि तालुका निहाय नियोजन करा. लाभार्थ्यांना फूड पॅकेट, नाश्ता, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था यांचे योग्य नियोजन करा. कार्यक्रम स्थळी साफसफाई करुन घ्या. पार्किंग व वाहतुकीची योग्य व्यवस्था करुन वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या. कार्यक्रम स्थळी करण्यात येणारी बैठक व्यवस्था व अन्य व्यवस्थेच्या कामी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयंसेवकांची मदत घ्या. तसेच उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांना आवश्यकता सर्व सुविधा पुरवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

कार्यक्रम स्थळी मान्यवरांची व लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था नियोजित पद्धतीने करुन घ्या. मान्यवरांची व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, विद्युत पुरवठा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त, इंटरनेट आदी विविध बाबींचा आढावा जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी घेतला.

  मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन म्हणाले, महिला सन्मान सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करा. कामाचा दर्जा चांगला ठेवा.  कार्यक्रम स्थळी लाभार्थ्यांची बसण्याची व्यवस्था तालुकानिहाय करा. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ निराकरण करुन घेवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडा.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला कार्यक्रम नियोजनाचा आढावा

कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवन मैदानावर होणाऱ्या महिला सन्मान सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पुणे महसुल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेऊन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना केल्या. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या महिलांना फूड पॅकेट, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक त्या सर्व सुविधा द्या. कार्यक्रम स्थळी योग्य पद्धतीने बैठक व्यवस्था करा. लाभार्थी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

तपोवन मैदानावरील कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

बैठकीनंतर तपोवन मैदानावरील कार्यक्रमस्थळाला जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी भेट देवून आतापर्यंत झालेल्या तयारीची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रम स्थळी करण्यात येत असलेली लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, आत येण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग, व्यासपीठावरील व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींची व्यवस्था, पार्किंग व्यवस्थेची पाहणी करुन सूचना केल्या.
**

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *