क्रांतीदिन ही ब्रिटिशविरोधी गगनभेदी गर्जना होता
प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
कुरुंदवाड ता.१० भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्रे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली केली गेलेली यशस्वी आंदोलने आणि त्यातून झालेले जनजागरण यातूनच ९ऑगस्ट १९४२ हा क्रांतीदिन अभूतपूर्व ठरला. या दिवशी गांधीजींनी ब्रिटिशांना दिलेला चलेजावचा आदेश आणि भारतीयांना करा अथवा मरा हा दिलेला संदेश अतिशय मोलाचा होता. कारण त्यामुळेच पुढील पाच वर्षात भारत स्वतंत्र झाला.तसेच पहिले महायुद्ध ते दुसरे महायुद्ध या कालखंडातील सर्व जागतिक राजकारणामुळेही ब्रिटिश सत्ता हम करे सो कायदा असे वागू शकत नव्हती.अशावेळी काँग्रेस , समाजवादी आणि कम्युनिस्ट या तीन विचारप्रवाहानी स्वातंत्र्यआंदोलनात महत्वपूर्ण योगदान दिले.क्रांतीदिनाने भारतीय जनतेत पेरलेले चैतन्य आणि स्वातंत्र्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कवटाळण्याची मानसिक तयारी असलेले हजारो कार्यकर्ते, नेते ही साम्राज्यवादाविरुद्धचा गगनभेदी गर्जना होती . म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतीदिनाचे महत्त्व फार मोठे आहे.असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते साधना मंडळ कुरुंदवाड च्या वतीने आयोजित ” “ऑगस्ट क्रांती दिन ” या विषयावर जाहीर व्याख्यानात बोलत होते. के. एस. दानवाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. के. माने यांनी पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, गांधीजींनी १९१६ सालीच बनारस विद्यापीठात बोलताना भारताच्या मुक्ततेसाठी ब्रिटिशांना हाकलून लावले पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. त्यासाठी देशभर जनमानस तयार करण्याच्या हेतूने गांधीजींनी अनेक आंदोलने केली. बिहार मधील चंपारण्य शेतकरी चळवळ, गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देणारी चळवळ, अहमदाबाद कापड गिरण्यातील कामगारांची संघटना स्थापन करून दिलेला लढा, रौलेट ऍक्टला केलेला विरोध, खिलाफत चळवळ, असहकारिता आंदोलन ,सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, १९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील संपूर्ण स्वराज्य हेच ध्येय ही घोषणा, पंडित नेहरूंनी रवी नदीकाठी फडकवलेला तिरंगा, गांधी आयर्विन करार, वर्धा येथील काँग्रेस कमिटीची बैठक या साऱ्या ऐतिहासिक घडामोडीतून क्रांती दिनाच्या मागील रणनीती ,वैचारिक अधिष्ठान आणि दिशा निश्चित झाली असे इतिहासातून दिसते. अर्थात क्रांतीदिन लढ्यात योजनाबद्ध आखणीचा काहीसा अभाव, सरकारी नोकरीत असलेल्या भारतीयांचा पुरेसा पाठिंबा न मिळणे, काही धर्मांध आणि सामाजिक चळवळींचा पाठिंबा नसणे, श्रीमंत – जमीनदार-जहागीरदार-व्यापारी वर्गाचे मोठे असहकार्य या साऱ्यामुळे ही चळवळ अल्पावधीत यशस्वी होऊ शकली नाही. मात्र १९४७ चे स्वातंत्र्य मिळवून देण्यात या चळवळीचे महत्त्व सर्वाधिक आहे यात शंका नाही. म्हणूनच क्रांतीदिनाच्या स्फूर्तीदायी चळवळीच्या इतिहासाचे जागरण फार महत्त्वाचे आहे. बेलगाम,मनमानी, हिंसाचारी, मुजोर सत्तेला ताळ्यावर आणायचे असेल तर क्रांतीदिनाने घालून दिलेला मार्गच सर्वांगीण स्वातंत्र्यासाठी योग्य आहे हे इतिहासाने सिद्ध केले आहे. आपल्या एक तासाच्या ओघवत्या शैलीतील भाषणामध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी हा संपूर्ण इतिहास उभा केला. यावेळी बाबासाहेब नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन चव्हाण यांनी आभार मानले.