डॉ. आंबेडकरांच्या पुतळा आगमन सोहळ्याबद्दल बौध्द समाजाच्या वतीने आ. यड्रावकरांचा सत्कार
▪️जयसिंगपूर व शिरोळ तालुक्यातील समस्त बौद्ध समाजातर्फे कृतज्ञता व्यक्त
जयसिंगपुर प्रतिनिधी :जैनापूर (ता. शिरोळ): जयसिंगपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शिरोळ तालुक्यातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा नुकताच जैनापूर येथील यड्रावकरवाडा येथे शाल, फेटा व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोणताही वाद किंवा अडचण न जुमानता हा ऐतिहासिक सोहळा उत्कृष्ट नियोजनाने पार पाडल्याबद्दल समाजाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
‘ना भूतो ना भविष्यतो’ सोहळा यशस्वी केल्याबद्दल कौतुक
यावेळी बोलताना पँथर आर्मीचे संस्थापक संतोष एस. आठवले म्हणाले की, “कोणताही वाद न जुमानता, अडचणींवर मात करत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आगमन सोहळ्याच्याच धर्तीवर, ‘ना भूतो ना भविष्यतो’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ऐतिहासिक आगमन सोहळा त्यांनी (आ. यड्रावकर) आपल्या उत्कृष्ट नियोजनातून यशस्वी केला.”
आठवले पुढे म्हणाले की, हा केवळ एक पुतळा नाही, तर हे सामाजिक समतेचे प्रतीक आणि शिरोळ तालुक्याच्या एकजुटीचे प्रतीक आहे. या सोहळ्यात बौद्ध समाजासह मराठा, मुस्लिम, धनगर, वडार, कोळी, मातंग, जैन, लिंगायत, चर्मकार अशा सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एकतेचे दर्शन घडवले.
निवडणुकीतील शब्द पाळून इतिहास घडवला
आमदार यड्रावकर यांना उद्देशून आठवले म्हणाले, “यड्रावकर साहेब, आपण निवडणुकीत दिलेला शब्द केवळ पाळला नाही, तर इतिहास घडवला आहे. आपण जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य प्रेरणास्थान आणि अभिमानाची ओळख दिली आहे. आपण दाखवलेले हे कर्तृत्व येथील जनता कधीही विसरणार नाही.” त्यांच्या दूरदृष्टीबद्दल, उत्कृष्ट नेतृत्वासाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यातील समस्त नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या सन्मान सोहळ्यास पँथर आर्मीचे संस्थापक संतोष एस. आठवले, बी. आर. कांबळे,सेनापती भोसले सर कुरुंदवाडचे माजी नगरसेवक अक्षय आलासे, दलित सेनेचे सुनील कुरुंदवाडे, पँथर आर्मीचे जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, शिरोळ तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब धनवडे, अशोक कांबळे, राजकुमार कांबळे (सर), जयकुमार कांबळे, महादेव कांबळे, दादू कांबळे, सुकुमार मोहीते, मधुकर वामण, अनिल कांबळे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.