📰 ‘जय भीम’ म्हणत मारहाण; पायावर नाक घासण्यास लावले!
🚨 नवी मुंबईत ऐरोली येथे दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण
नवी मुंबई/ऐरोली: शहरी व सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील ऐरोली सेक्टर १, छत्रपती रहिवासी चाळीत राहणाऱ्या गरीब दलित कुटुंबातील कुटुंबप्रमुख सुनील जाधव यांना ‘जय भीम वाल्याची आई झ टाकीन…. कोणता जय भीम वाला तुझ्या मदतीला येतो तेच बघतो’** असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. केवळ मारहाणच नाही, तर त्यांचे नाक पायावर घासायला लावून, ‘तुमच्या जय भिम वाल्याची हीच लायकी आहे’ असे बोलत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
🏘️ लाईट बिलावरून सुरू झाला प्रकार; तीन महिन्यांपासून छळ
या घटनेतील पीडित कुटुंबप्रमुख सुनील जाधव व त्यांचा परिवार एका भाड्याच्या खोलीत राहत आहेत. लाईट बिल न भरल्याच्या कारणावरून खोलीमालकाच्या नातेवाईकांनी हा प्रकार सुरू केला. आरोपींमध्ये खोलीमालकाचे नातेवाईक, समाजकंटक रोहित महाजन, त्याची पत्नी स्वाती महाजन, स्वतःला समाजसेवक समजणारे विशाल महाडिक व त्यांची पत्नी यांचा समावेश आहे. या सर्वांनी सुनील जाधव यांना जातीवरून शिवीगाळ केली आणि त्यांना मारहाण करून पायावर नाक घासण्यास भाग पाडले.
हा छळ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होता. पीडित कुटुंबाने रबाळे पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही, असा आरोप आहे.
⚖️ आंबेडकरी चळवळीच्या हस्तक्षेपानंतर अखेर गुन्हा दाखल
या घटनेची माहिती आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९:२७ वाजता रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला (FIR क्र. ०७८८).
गुन्हा दाखल होऊनही पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून, घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, असा संतप्त आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
🤝 वंचित बहुजन आघाडीकडून पीडित कुटुंबाला धीर
गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर कारवाई न झाल्याची बाब वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने जाधव कुटुंबाची भेट घेतली.
‘आम्ही न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत आहोत. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ,’ असे बोलून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबईतील कार्यकर्ते किशोर औसरमल यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
📋 एफआयआरमध्ये कलम
जाधव कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी एफआयआरमध्ये खालील कलमे लावण्यात आली आहेत:
- भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३: कलम ११५(२)
- भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३: कलम ३५२
- भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३: कलम ३५१(२)
- भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३: कलम ३(५)
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९: कलम ३(१)(r)
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९: कलम ३(१)(s)
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९: कलम ३(२)(va)
- गुन्हा घडल्याचा कालावधी: १७/०९/२०२५ ते ०४/१०/२०२५
या प्रकरणावर त्वरित कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
