सटमटवाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
एक्साईज कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची कारवाई; एकाला अटक, चारचाकीसह गोवा बनावटीची दारू हस्तगत
कोल्हापूर: विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सटमटवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणारी मारुती सुझुकी अर्टिगा गाडी पकडून तब्बल १३ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सटमटवाडी परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या मारुती सुझुकी अर्टिगा (क्र. एम एच ०९ ए एस ०९५८) या गाडीची झडती घेतली असता, त्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे ३० बॉक्स आढळून आले.
संशयिताला अटक
याप्रकरणी रोहन चंद्रकांत साईल (वय ३२, रा. कारीवडे, भैरववाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला पथकाने जागीच ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
ही धाडसी कारवाई कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, आर. एम. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, कॉन्स्टेबल मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, योगेश शेलार आणि राहुल कुटे यांच्या पथकाने केली.
डिसेंबर महिन्यात धडाकेबाज कामगिरी
कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने डिसेंबर महिन्यात अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण पाळत ठेवून या एकाच महिन्यात आतापर्यंत चार मद्यवाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
जप्त मुद्देमालाचा तपशील > या कारवाईत जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची किंमत २,०५,२०० रुपये असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या ११,५०,००० रुपये किमतीच्या वाहनासह एकूण १३,५५,२०० रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाने जप्त केला आहे.

