​दौंड तालुक्यातील कासुर्डी फाट्यावर तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

​दौंड तालुक्यातील कासुर्डी फाट्यावर तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील कासुर्डी फाट्यावर तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यवत:

पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी (ता. दौंड) गावच्या हद्दीत एका तरुणावर लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोन निष्पन्न आणि चार अनोळखी अशा एकूण सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​याबाबत योगेश बाळासो कोडीतकर (वय ३६, रा. जावजीबुवाची वाडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश आणि त्यांचा भाऊ सतीश कोडीतकर हे १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १:४५ च्या सुमारास दुचाकीवरून कासुर्डी येथून आपल्या घरी जात होते. ते महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्यासमोर आले असता, पाठीमागून आलेल्या एका कारमधील चालकाने कोडीतकर यांच्या गाडीला गाडी आडवी लावून त्यांना थांबवले.

​कारमधून शुभम दत्तात्रय आखाडे, अजित जिज्ञासा थोरात (दोघे रा. भरतगाव, ता. दौंड) आणि इतर चार अनोळखी इसम हातात लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड घेऊन खाली उतरले. जुन्या भांडणाची कुरापत काढून या सर्वांनी योगेश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी रॉडच्या फटक्याने योगेश यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. मारहाण सुरू असतानाच शुभम आखाडे याने चाकूने योगेश यांच्या पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच अजित थोरात याने तलवार काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

​या घटनेनंतर जखमी योगेश यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यवत पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०९, ११८(२), १८९(४), १९१(३), आणि १८९(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करत आहेत. महामार्गावर भरदिवसा झालेल्या या राड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *