अंबाबाई मंदिर कॉरिडॉरसाठी १५०० कोटींचा निधी; ६ महिन्यांत होणार परिसराचा कायापालट!

अंबाबाई मंदिर कॉरिडॉरसाठी १५०० कोटींचा निधी; ६ महिन्यांत होणार परिसराचा कायापालट!

अंबाबाई मंदिर कॉरिडॉरसाठी १५०० कोटींचा निधी; ६ महिन्यांत होणार परिसराचा कायापालट!

देशातील घुसखोरांना हुडकून काढणार : कोल्हापूरच्या कृतज्ञता सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी):

दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी शासनाने तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निधीतून भव्य मंदिर कॉरिडॉर विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. येथील पोलीस मुख्यालायाच्या मैदानावर आयोजित भव्य ‘कृतज्ञता सोहळा’ सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

​व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते.

वारसा आणि संस्कृतीचे जतन करणार

​केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले, “७ व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे ४१ छोट्या-मोठ्या मंदिरांचे पूर्ण संरक्षण करून येथील परिसर पुढील ६ महिन्यांच्या आत विकसित करण्यात येईल. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रातील प्रगती वेगाने होत असल्याचे सांगतानाच, “देशातील घुसखोरांना अत्यंत बारकाईने शोधून काढले जाईल,” असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कोल्हापूर ही सहकाराची आद्य पंढरी : मुख्यमंत्री

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. कोल्हापूर हे केवळ शक्तीपीठ नसून ती सहकाराची आद्य पंढरी आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील ५ ज्योतिर्लिंगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिराचाही विकास सुरू असून, पुढील १०० वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नक्षलवाद संपवण्यात यश : उपमुख्यमंत्री

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वाचे कौतुक केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील नक्षलवाद पूर्णपणे संपवला असून सहकार क्षेत्रात लोकाभिमुख बदल घडवून आणले, असे सांगत शिंदे म्हणाले की, “अंबाबाई मंदिर परिसराच्या आधुनिकीकरणामुळे कोल्हापूरच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.”

महालक्ष्मीची मूर्ती आणि तलवार देऊन सन्मान

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संयोजकांच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती आणि तलवार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मंदिर विकास आराखडा गृहमंत्री शहा यांना सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक यांनी केले, तर आभार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले. या सोहळ्यासाठी कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *