घोसरवाड:
येथील फडतारे परिवाराच्या वतीने आदर्श माता श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दिनांक २१ जून रोजी सकाळी ६ वाजता येथील गणेश मंदिर येथे तिरुपती सपकाळे व शुभांगी सपकाळे या पती-पत्नीच्या हस्ते श्रीस अभिषेक घालण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० वाजता भव्य ‘महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व मोफत तपासणी
या शिबिरामध्ये ‘उत्तम प्रकृतीचे रहस्य आणि दररोज योगा करण्याची नितांत गरज’ या विषयावर डॉ. भूषण कुमार यमाटे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर स्वांनद हॉस्पिटल येथील डॉ. अर्जुन घट्टे हे ताप, थंडी, सर्दी, खोकला, कणकण या आजारांवर रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक इंजेक्शन व औषध गोळ्या देणार आहेत. कुरुंदवाड येथील प्रसिद्ध सर्जन व पोटविकार तज्ज्ञ डॉ. राजीव जाधव हे पोटाच्या विविध आजारांची तपासणी करून औषधोपचार करणार आहेत. तसेच इचलकरंजी येथील नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. स्वप्निल निर्मळे हे देखील रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय उपचार करणार आहेत.
वृद्धांना स्नेहभोजन आणि भजनाचा कार्यक्रम
रात्री ८ वाजता जानकी वृद्धाश्रम, घोसरवाड येथे फडतारे परिवाराच्या वतीने सर्व वृद्धांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे. घोसरवाड, दत्तवाड, लाट, सैनिक टाकळी, हेरवाड, कुरुंदवाड, अकिवाट येथील पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
त्यानंतर रात्री ९ वाजता जयभवानी भजनी मंडळ, श्री. सिद्धेश्वर भजनी मंडळ, श्री महेश भजनी मंडळ आणि श्री वाकनाथ भजनी मंडळ यांच्या एकत्रित सहभागातून ‘आईची आठवण: जागर भजनाचा’ हा भक्तीमय भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
