गोवा बनावटची विदेशी दारू वाहतूक करणारी जीप करवीर पोलिसांच्या जाळ्यात : ८.७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा बनावटची विदेशी दारू वाहतूक करणारी जीप करवीर पोलिसांच्या जाळ्यात : ८.७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा बनावटची विदेशी दारू वाहतूक करणारी जीप करवीर पोलिसांच्या जाळ्यात : ८.७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. १५ ( प्रतिनिधी ) पुणे येथील विषारी दारू दुर्घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोवा बनावटची विदेशी दारू घेऊन जाणारी जीप गाडी पकडून ८ लाख ७ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जीप चालकाला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईच्या दिलेल्या सूचनांनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. गारगोटी ते कोल्हापूर रोडने गोवा बनावटची विदेशी दारू घेऊन काळ्या रंगाची जीप क्र. जी.ए.-०३-वाय-१३६३ कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला सज्ज राहण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हापूर-गारगोटी रोडवरील कळंबा नाक्याजवळील हॉटेल सुरभिसमोर पोलिसांनी सापळा लावला. थोड्या वेळाने संशयित जीप येताच तिला थांबवून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत खाकी आणि पांढऱ्या रंगाचे बॉक्स आढळले. बॉक्स फोडून पाहिले असता त्यात ७५० आणि १८० मिलीच्या पॅकबंद काचेच्या व प्लास्टिक बाटल्यांमध्ये गोवा बनावटची विदेशी दारू आढळून आली.

पोलिसांनी गाडी चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव गजानन दिनकर पाटील, वय ४९, रा. खानविलकर पेट्रोल पंपामागे, कोल्हापूर असे सांगितले. त्याच्याकडे विदेशी दारू बाळगण्याचा व वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा माल आपल्याच मालकीचा असून तो गोव्यातून आणून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी नेत असल्याचे त्याने कबूल केले.

पोलिसांनी गाडीतून एकूण १ लाख ६९ हजार २१० रुपयांची विदेशी दारू, ७ लाख रुपयांची जीप गाडी आणि ८ हजार रुपयांचा आयफोन मोबाईल असा एकूण ८ लाख ७ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, पोलीस अंमलदार सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, प्रमोद पाटील, श्रीधर जाधव आणि दिग्वीजय पाटील यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *