रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर-जिल्हाधिकारी राहुल रेखावार


ठळक मुद्दे-

◆ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार

◆ तृतीयपंथीयांमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी गुरु आणि चेले यांनी प्रयत्न करावेत

◆ तृतीयपंथीयांच्या जीवन पद्धतीला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करुया
◆ तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार
◆ तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय पोर्टलवर नोंद करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवावे
◆ कलागुणांनुसार प्रशिक्षण देवून रोजगार निर्मितीसाठी तालुकास्तरावर नोंदणी शिबिरांचे आयोजन
◆ तृतीयपंथीयांसाठी वसतिगृह उभारण्याचा विचार

कोल्हापूर, दि.19 : ‘आई अंबाबाई’ मुळे जगभरात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांच्या कलागुणांनुसार प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तृतीयपंथीयांच्या जीवन जगण्याला नवी दिशा देवून त्यांचे सक्षमीकरण करुन देशासमोर कोल्हापूर जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करुया’, अशी भावनिक साद कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घातली. त्यांना सन्मानाची वागणुक मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य जिल्हा प्रशासन करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली तृतीय पंथीयांचे गुरु, चेले यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, राज्यस्तरीय तृतीय पंथीय कल्याण मंडळाच्या सदस्य ऍड दिलशाद मुजावर, मयुरी आळवेकर तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, तृतीयपंथीयांचा पूर्वापार चालत आलेला जीवन जगण्याचा मार्ग बदलण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये आत्मसन्मान व स्वाभिमान निर्माण करण्यासाठी गुरु व चेले यांनी सहकार्य करावे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया.

तृतीयपंथीयांना राहण्यासाठी वसतिगृह उभारण्याबाबत विचार सुरु असून त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, तृतीय पंथीय व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम त्यांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या राष्ट्रीय पोर्टलवर नोंद करुन घेऊन प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवावे, जेणेकरून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देता येईल. समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तृतीय पंथीयांकडून त्यांच्या सविस्तर माहितीवर आधारित तालुकास्तरावर अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीय पंथीयांनी आपली माहिती भरुन द्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्यातील कलागुणांनुसार प्रशिक्षण देवून रोजगार निर्मिती करता येईल.
जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, तृतीयपंथीय व्यक्तींसाठी पोलीस विभागाच्या वतीने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये समन्वयक नेमण्यात येत आहे. तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय तृतीय पंथीय कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. तृतीय पंथीयांना समाजात वावरताना कोणती समस्या अथवा अडचण आल्यास जिल्हास्तरीय समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी यावेळी केले.
तृतीय पंथीयांना ‘मूल दत्तक घेता येण्याची तरतूद कायद्यात नाही. तृतीय पंथीयांना मुल दत्तक घेता यावे, यासाठी कायद्यात बदल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तृतीय पंथीयांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी व्हावी. तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी अशा विविध सूचना व अडचणी ऍड. दिलशाद मुजावर, मयुरी आळवेकर तसेच तृतीय पंथीयांचे गुरु व चेले यांनी मांडल्या.

00000