रत्नागिरी : कोकण रेल्वेसह भारतीय रेल्वेच्या सर्वच गाड्यांमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशनने याबाबतचे निवेदन श्री. राऊत यांना दिले होते. त्याची दखल श्री. राऊत यांनी घेऊन पत्र पाठविले.
आस्था सोशल फाउंडेशनच्या आस्था दिव्यांग हेल्पलाइनकडे कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिव्यांग बोगी अर्थात हॅंडीकॅप कोच नसल्यामुळे दिव्यांगांना रेल्वे प्रवासात अत्यंत हाल सहन करावे लागत असल्याच्या व्यथा येत होत्या. त्यावर आस्थाने कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विवेक शेंड्ये यांच्याशी संपर्क साधला असता. मात्र ते म्हणाले की नव्या एलएचबी कोच असलेल्या गाड्यांना दिव्यांग कोच नाही. त्याला स्थानिक स्तरावर काही करता येत नाही. त्यानंतर आस्थाने रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार आणि कोकण रेल्वे युजर कन्सल्टेटिव्ह समितीचे सदस्य विनायक राऊत यांना निवेदन दिले. त्याची दखल घेऊन श्री. राऊत यांनी सर्व परिस्थिती समजावून घेतली. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र डब्याची सुविधा कोकण रेल्वेच नव्हे, तर देशभरातील रेल्वेगाड्यांमध्ये उपलब्ध असावी, अशी सूचना केली. हा विषय मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. राऊत यांनी आस्था संस्थेला दिले आहे.