एसटी बंदवर ५ जानेवारीपर्यंत कर्मचारी ठाम

रत्नागिरी :- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण संदर्भातील पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे. परंतु तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम असल्याची सर्वानुमते भूमिका ठरवल्याची माहिती कृती समितीचे रमेश केळकर यांनी दिली. आम्ही संप नव्हे तर काम बंद आंदोलन, दुखवट्यामध्ये आहोत, हे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नाही. दरम्यान, कारवाईच्या भीतीमुळ निलंबित, सेवासमाप्तीमधील काही कर्मचारी हजर झाले असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
मुंबईत सुनावणी होणार असल्यामुळे कामगार रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या बाहेर जमले होते. सुमारे २०० कर्मचारी आले होते. या वेळी कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो, शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. या वेळी कृती समितीचे रमेश केळकर यांनी मार्गदर्शन केले. संविधानातील ३८ कलमानुसार आम्ही संप नाही, तर हे काम बंद आंदोलन असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे, अशी माहिती कामगारांनी दिली. प्रशासन कोणतीही कारवाई करणार नाही, त्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे खीळ बसली आहे. आम्ही कर्मचारी आत जाणार नाही. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना प्रवेशबंदी केली होती. तसेच आवार, स्वच्छतागृह, पाणी पिण्यास मज्जाव केला होता. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला आवार वापरता येणार असल्याचे कामगारांनी सांगितले.
दरम्यान, विभागात ६२५ कर्मचारी कामावर हजर होते. यामध्ये प्रशासकीय २६०, कार्यशाळा १९५, चालक ७४, वाहक ६३, चालक तथा वाहक ३३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच १०२ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. अजूनही ३०५२ कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत.