एसटी कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन; निलंबन कारवाई झाल्याने होते तणावात

रत्नागिरी : एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेला राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राकेश रमेश बांते (वय ३५) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
राजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांकडुन मिळाली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश बांते यांचा देखील समावेश होता. डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान अत्यावस्थ वाटु लागल्याने काल, बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालविली. मयत राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील असून, गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. ते पत्नी व चार वर्षे एक व सव्वा वर्ष अशा दोन मुलांसह राजापुरात रहात होते. त्यांच्या निधनानंतर भंडारा येथील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.