कालीचरण महाराजांना मध्यप्रदेशातून अटक केल्याची माहिती

कालीचरण महाराजांना मध्यप्रदेशातून अटक केल्याची माहिती

हरिद्वारच्या धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. रायपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून कालीचरण महाराजांना अटक केली आहे, असं एएनआयनं म्हटलं आहे.

“मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालीचरण महाराज यांना रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,” असं एएनआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अकोल्याच्या कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. छत्तीसगडमध्ये भरलेल्या धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना कालीचरण महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं. त्यावेळी काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कालीचरण महाराज यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनीही ट्वीट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.