कलावती मोहन पाटील नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक

इचलकरंजी/प्रतिनिधी –
हलाखीची परिस्थिती, आवश्यक साधने उपलब्ध नसतानाही कु. कलावती मोहन पाटील हिने नेपाळ येथील पाचव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय हिरोज गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या यशाची माहिती समजल्यानंतर वेळ न दवडता खासदार धैर्यशील माने हे तिला भेटण्यासाठी गेले. तिच्या कामगिरीबद्दल तिचे कौतुक करतानाच भविष्यात आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य आणि मदत देऊ अशी ग्वाही दिली.
खासदार धैर्यशील माने हे कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजीत आले होते. त्यावेळी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी  कु. कलावती पाटील हिच्या खेळाबद्दल, तिने केलेल्या कामगिरीबद्दल तसेच तिला सहकार्याची गरज असल्याची माहिती खासदार माने यांना दिली. तसेच नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कराटेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळविल्याचे सांगितले. त्यावर वेळ न दवडता खासदार माने यांनी कु. कलावती पाटील या खेळाडूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि स्वत: वाहन चालवत थेट कबनूर येथे पाटील यांचे घर गाठले. कु. कलावती हिची भेट घेऊन तिचे कौतुक करत सत्कार केला.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतसुध्दा ती घेत असलेल्या उत्तुंग भरारीबद्दल तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आगामी काळात सर्वतोपरी मदत व सहकार्य देऊ अशी ग्वाही दिली.  सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूची उमेद वाढवण्यासह तिला प्रोत्साहन मिळण्यासाठी खासदार माने हे स्वतः गाडी चालवत आल्याने भागातील नागरिकांतून त्यांचे कौतुक करण्यात येत होते. यावेळी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, रविंद्र माने व पाटील कुटुंबिय उपस्थित होते.