रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात महामार्गावरील १३,८०९ वाहन चालकांवर कारवाई

रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा व मिर्‍या-नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण वर्षभरामध्ये १३ हजार ८०९ नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अपघाता दरम्यान जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी मृत्यूंजय दूतांची भूमिका महत्वाची ठरत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही काही प्रमाणात घट झाली आहे.
महामार्ग वाहतूक पोलीस हातखंबा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी सांगितले की, गतवर्षी १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या दरम्यान महामार्ग पोलीस महासंचालक ठाणे आदेशानुसार महामार्गावरील नियम तोडणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर व अवजड व अतिरिक्त भार वाहुन नेणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.