महाबळेश्वरला थंडीचा कडाका; पारा ४ अंशावर
पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर मध्ये थंडीचा कडाका वाढला असून, पारा ४ अंशापर्यंत घसरला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. अवघे जनजीवन गारठून गेले. कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारे वाहत असल्याने येथील पर्यटक महाबळेश्वरमध्ये काश्मिरी थंडीचाच फिल अनुभवत आहेत. थंडीचा पारा असाच खाली येत राहिला तर एक ते दोन दिवसांत वेण्णा लेकसह लिंगमळा परिसरात हिमकण तयार होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य येथे पाहायला मिळत आहे. तापमान घसरल्याने वेण्णालेक परिसर पहाटे धुक्याच्या दुलईत लपेटला गेला. पारा ४ अंशांपर्यंत खाली आल्यामुळे वेण्णालेक, लिंगमळा धबधबा परिसरात प्रचंड थंडी निर्माण झाली.
पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसून येत आहेत. वेण्णा लेक परिसरात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे चित्र पहायला मिळाले.
वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पाण्याच्या साठ्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले की दरवर्षी दवबिंदू पडण्यास सुरुवात होते. त्या दवबिंदूंवर प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर हिमकणात होते. हे हिमकण दरवर्षी वेण्णालेक परिसरातील लोखंडी जेटी, वाहनांचे टप, घरे, झाडांच्या पानांवर पडल्याचे दृश्य पहायला मिळते. महाबळेश्वरला पर्यटनासाठी येणार्या हौशी पर्यटकांसह स्थानिकांसाठीही दरवर्षी ही एक पर्वणीच असते.