जिल्ह्यात ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे टिळक जन्मस्थान, मत्स्यालय, थिबा पॅलेस बंद

रत्नागिरी : ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान, थिबा पॅलेस आणि मत्स्यालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. समुद्रकिनारे, मंदिरे खुली असल्यामुळे किनाऱ्यांवर आणि धार्मिक पर्यटनासाठी पर्यटक येत आहेत.

गेल्या महिन्याच्या अखेरीस परजिल्ह्यातील पर्यटकांनी रत्नागिरीतील पर्यटनस्थळांवर गर्दी केली. त्यामुळे पर्यटन रोजगारालाही चालना मिळाली. परंतु ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्याने राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यास सुरवात झाली आहे. पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका पर्यटक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. रत्नागिरीत निवासासाठी येणार्‍यांचा कल कमी होणार आहे.