राज्यांनी किमान ४८ तासांचा पुरेसा वैद्यकीय ऑक्सिजनसाठा उपलब्ध ठेवावा; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळतोय. यावर केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याचे सांगण्यात आले असून, केंद्र सरकारने राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनबाबतही सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे पाहता देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून, या परिस्थितीत केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. यासोबतच किमान ४८ तासांचा पुरेसा वैद्यकीय ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना ऑक्सिजनबाबतची तयारी पूर्ण करण्यास सांगितले आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. पत्रात केंद्रीय आरोग्य सचिवांनी वैद्यकीय ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारांनी सर्व प्रकारची तयारी करावी असे मसूद करत, रुग्णांना सेवा देणाऱ्या सर्व आरोग्य सुविधांची खात्री केली पाहिजे. त्याच वेळी, आरोग्य सचिवांनी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. ज्या अंतर्गत राज्य सरकारांना एलएमओ टाक्या पुरेशा प्रमाणात भरून ठेवण्यास सांगितले आहे. तसेच पीएसए प्लांट्स पूर्णपणे कार्यरत ठेवण्यासाठी योग्य देखभालीसाठी सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच वेळी, बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिलिंगसह ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी यादी तयार करून हे सिलिंडर भरून ठेवण्यास सांगितले आहे. लाईफ सपोर्ट उपकरणांची उपलब्धता असावी अशी खास सूचना देण्यात आली आहे. राज्यांमधील ऑक्सिजन नियंत्रण कक्ष पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.