आमदार राजन साळवींना फोनद्वारे धमकी, जिल्ह्यात खळबळ
रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांना धमकी दिल्याच्या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’ , असे म्हणत आमदार राजन साळवी यांना व त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार राजन साळवी यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे.
आमदार राजन साळवी हे राजापूरचे शिसेनेचे आमदार म्हणून २०० ९ सालापासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांना १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ९२६५४४०५७६ या क्रमांकावरुन पहिला फोन आला. यावेळी मोबाईलवरुन अज्ञाताने ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’ एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर त्याचदिवशी रात्री ११.१४ वाजता परत फोन करुन’ रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे ‘ अशी धमकी देण्यात आली. आमदार साळवी यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.