मलकापूर प्रतिनिधी/ करण झनके
नादुरा : छोट्या मुलांच्या भांडणामुळे मोठ्यांत वाद होऊन लाठ्याकाठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात एक जखमी झाला आहे. ही घटना नांदुरा तालुक्यातील लोणवडीत १४ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
देवानंद गजानन सोनाग्रे (३०, रा. लोणवडी) असे जखमीचे नाव आहे. अमोल गवई, स्वाती गवई (दोघे रा. लोणवडी ) यांच्याविरुद्ध देवानंदच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवानंदच्या भावाचा मुलगा गल्लीतील मुलांसोबत खेळत होता. याचदरम्यान लहान मुलांचे भांडण सुरू झाले. तेव्हा देवानंदने भावाच्या मुलाला घरी जायला सांगितले. अमोलला वाटले की आपल्याच मुलांना घरी जायला सांगितले. त्याने आणि स्वातीने शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यावरून वाद वाढून देवानंद आणि अमोलमध्ये हाणामारी सुरू झाली. अमोल आणि स्वातीने लाठ्याकाठ्यांनी देवानंदला मारहाण केली. यात डोक्यात काठी लागून देवानंद जखमी झाला. त्याने नांदुरा पोलीस ठाणे गाठून अमोल व स्वातीविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.