इचलकरंजी/प्रतिनिधी –
पत्रकारिता निर्भीड असावी अशी अपेक्षा वाचकांकडून केली जाते. ती तशी असावी यासाठी माध्यमांना लोकाश्रयाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे व्याख्याते प्रा.डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. ते इचलकरंजी प्रेस क्लब आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय कुडाळकर स्वागत केले तर दयानंद लिपारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. पाहुण्यांची ओळख संजय खूळ यांनी करून दिली. याप्रसंगी सौ. प्रिती पटवा (प्रेरणा पुरस्कार), मैत्री फौंडेशन (सामाजिक संस्था), भिमराव आव्हाड (उत्कृष्ट सामाजिक कार्य), विद्यार्थी युवक संघटना चंदूर (प्रबोधन पुरस्कार) त्याचबरोबर ऋषिकेश वसंत ठाकूर-देसाई (विशेष गौरव पुरस्कार) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी, पत्रकारिता क्षेत्रात सध्या बातम्यांची वस्तुस्थिती मांडण्याला प्राधान्य देण्यापेक्षा नकारात्मक विचारांच्या ब्रेकिंग न्यूज, हेडलाईन देवून सनसनाटी निर्माण करण्याला जास्त महत्व देत असल्याचे दिसत आहे. समाजात जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न आहेत. तो सोडवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, राज्यातील भाजप सत्तेच्या काळात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करुन देखील त्याची आत्ताच्या महाविकास आघाडी राज्य सरकारने प्रभावी अंमलबजावणी करण्यात चालढकल सुरु ठेवली आहे. वास्तविक, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन आणि प्रशासनाच्या बरोबरीने पत्रकार आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असतात. पण , त्यांना कोणतेच संरक्षण नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देतानाच त्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा, घरकुल अशा विविध मुलभूत सुविधांच्या योजनांचा लाभ मिळवून द्यायला हवा, असा उल्लेख केला.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास सिंधुदुर्ग उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, माजी नगरसेवक महादेव गौड, माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते, पोलीस निरिक्षक राजू तासिलदार, महादेव वाघमोडे, विनय महाजन यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष शरद सुखटणकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले.
Posted inकोल्हापूर