धक्कादायक! तीन महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यात सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी गणना सुरु आहे. त्यामुळे वनविभाग मोठ्या प्रमाणात कामामध्ये मग्न झाला आहे. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात मनुष्य वस्तीत येऊ लागल्याने अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे. भुकेसाठी मानवी वस्तीत घुसणाऱ्या वन्य प्राण्यांना वनविभागाकडून पकडून जंगलात सोडले जात आहे तरीसुद्धा काही दिवसाने ते प्राणी मनुष्य वस्तीत निदर्शनास येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील पळसावडे विभागात प्राणी गणनेसाठी अधिकाऱ्याला न विचारता वनमजुर महिलांना घेऊन गेल्याच्या रागातून, तीन महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याचवेळी वनरक्षक पतीसही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पळसावडे येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर व त्याच्या पत्नीवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधू सानप या पळसावडे बिट तर त्यांचे पती सुर्याजी ठोंबरे हे खडगाव बीटमध्ये वनरक्षक म्हणून सेवेत आहेत. काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक दाम्पत्य वनमजुराला घेऊन पळसावडे वनक्षेत्रात प्राणी गणणेसाठी गेले होते. त्यावेळी प्रतिभा व रामचंद्र जानकर तेथे आले. प्रतिभा जानकर हिने सुर्याजी ठोंबरे यांना चप्पलेने मारहाण सुरु केली. रामचंद्र जानकर यांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर गर्भवती सिंधू सानप यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्यांनी, दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या केसांना धरुन ‘तुला जीवंत सोडणार नाही’ असे म्हणुन त्यांचे दगडावर डोके आपटले.

वनरक्षक दाम्पत्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी जानकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना काल रात्री अटक करण्यात आली आहे.