रत्नागिरी : अनेक कालावधीपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अगदी संथ गतीने सुरु असल्याने, अनेक ठिकाणी २६ जानेवारीला रस्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्याचे योजिले आहे. तर महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, लांजामध्ये प्रजासत्ताक दिनाची वाट न बघता, मुंबई-गोवा महामार्गाच्या गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या कामामुळे शहरातील कुक्कूटपालन, बसवेश्वर चौक, बाजारपेठ आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडले आहेत.
या वारंवार रखडलेल्या कामामुळे लांजा शहरात बुधवारी तीव्र जनक्षोभ उसळला. लांजा नगरपंचायतीच्या नगरसेविका दूर्वा भाईशेट्ये यांनी काल पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला शेकडो नागरिकांनी जोरदार पाठिंबा दिला. शहरातील कुक्कुटपालन, बसवेश्वर चौक याठिकाणी महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर आज गुरुवारपासून काम सुरू करण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. याबाबतचे निवेदन नगरसेविका दुर्वा प्रसाद भाईशेट्ये यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिले होते. मात्र कोणत्याही प्रकारची दखल स्थानिक किंवा जिल्हा प्रशासनाकडून घेतली गेली नाही.
कोणत्याही प्रकारची कामाची हालचाल होत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर झाल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी शिवसेना शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, प्रसाद भाईशेट्ये, नगरसेविका दूर्वा भाईशेट्ये, नगरसेवक लहु कांबळे, , युवासेना पदाधिकारी सचिन लिंगायत यांच्यासह परवेश घारे, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, शिवाप्पा उकली, फिरोज नाईक, महेश सप्रे, मोहन तोडकरी, नौशाद नेवरेकर, हाशम दसूरकर, कुंदन गांधी, सिराज दसूरकर, राजू धावणे,भाई मराठे, अभिजित उपशेट्ये, वैभव जोईल, शरीफ लांजेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.