प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, एस. टी.चे निवृत्त अधिकारी प्रकाश साळवी यांचे निधन

रत्नागिरी : एस टी. चे माजी अधिकारी, रत्नागिरीतील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक (बिल्डर), पर्णिका कलेक्शन फर्निचरचे संचालक, पर्णिका असोसिएटचे मुख्य संचालक प्रकाश परशराम साळवी यांचे शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन बहिणी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. अचानकपणे हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याने अनेकांनी तीव्र दुखः व्यक्त केले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी रत्नागिरी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

दिवंगत प्रकाश साळवी यांनी १९६८ मध्ये राज्य परिवहन मंडळात रत्नागिरी येथे नोकरीस प्रारंभ केला. त्यानंतर ते बराच काळ एस. टी. मध्ये रिक्रुटीग
ऑफिसर म्हणून कार्यरत होते. १९९५ मध्ये काही व्यक्तिगत कारणामुळे त्यांनी निवृत्ती स्वीकारून आरोग्य मंदिर रत्नागिरी येथे स्वतःचा पर्णिका कलेक्शन नावाने फर्निचर विक्री व्यवसाय सुरू केला.रत्नागिरीतील एक विश्वासार्ह फर्निचर विक्रेते म्हणून त्यांनी नाव कमावले. त्यानंतर बारा वर्षापूर्वी त्यांनी इमारत बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. गृहसंकुल बांधकाम व्यवसायात दर्जेदार बांधकाम देणारे बिल्डर अशी त्यांनी आपली ओळख पर्णिका असोसिएटच्या नावाने निर्माण केली. शून्यातून विश्व निर्माण करावे तशी त्यांची ही वाटचाल होती. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांची पत्नी आणि मुलांची त्यांना व्यवसायात पूर्ण साथ होती. त्यानंतर मुलांच्या सोबतीने त्यांनी टी.व्ही.एस.रिक्षांची डीलरशिप घेऊन शोरुम सुरू केले. व्यवसाय वृद्धीच्या अनेक योजना त्यांच्यासमोर असताना आणि व्यवसायात झेप घेत असतानाच त्यांचे अचानक निधन झाल्याने दुःख व्यक्त होत आहे.

माणसे जपण्याचा छंद
प्रकाश साळवी यांना माणसे जपण्याचा छंदच होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तसेच विविध विषयांचे त्यांचे ज्ञान, अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांच्याकडे विविध विषयांच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा अनेकांची ये जा नेहमीच सुरू असायची. कोणत्याही विषयावर मुद्देसूद बोलण्यात, आपली ठाम मते मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचे मित्र मंडळही खुप मोठे आहे. या सर्वांनाच प्रकाश साळवी यांच्या अचानक जाण्याचा मोठा धक्का बसला आहे.